VijaySingh Mohite Patil
VijaySingh Mohite Patil Sarkarnama
ब्लॉग

VijaySingh Mohite Patil : विजय नावाच्या 'सिंहा'चा दरारा आजही कायम...

Anand Surwase

महाराष्ट्र राज्याच्या राजकीय इतिहासाची पाने उलटली असता हे लक्षात येते, की येथील पुरोगामी विचारसणीचे राजकारण सहकारातून समृद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात सहकाराची पाळेमुळे घट्ट रुजलेली आहेत आणि ती रुजवण्याचे काम यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते-पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, राजारामबापू पाटील, विखे-पाटील, विलासराव देशमुख अशा एक ना अनेक नेत्यांनी केले.

ज्यांच्या राजकारणाचा पिंडाचा सहकाराचा होता, अशी कित्येक घराणी आजही राजकारणात सक्रिय आहेत. त्यापैकीच सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचे मोहिते-पाटील हे घराणे आहे. शंकरराव मोहिते-पाटील यांनी सहकाराच्या चळवळीतून जिल्ह्यात विकासाची गंगा वाहती केली. पुढे हीच विकासाची गंगा विजयसिंह मोहिते-पाटील यांनी गाव खेड्यापर्यंत पोहोचवली. सहकाराच्या माध्यमातूनच मोहिते-पाटील हे घराणे राज्याच्या राजकारणातील एक बलशाली राजकीय घराणे म्हणून उदयास आले. यामध्ये शंकरराव मोहिते-पाटील यांच्यानंतर विजयदादांचा 'सिंहां'चा मोठा वाटा आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटील कुटुंबाचे कायम एकछत्री वर्चस्व राहिले आहे. मग ते जिल्हा परिषद असो..जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो ...दूध संघ... अथवा कृषी उत्पन्न बाजार समिती, यावर विजयसिंह मोहिते-पाटील या नावाची जरब कायम होती. त्यामुळे विजयदादांना दुखावून आपल्याला राजकारणात टिकता येणार नाही, अशी एक राजकीय दहशतच जिल्ह्यातील आमदार, तसेच सहकारातील नेत्यांच्या मनात निर्माण झालेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनचे सदस्य राहिलेले मोहिते-पाटील 1980 पासून राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तत्पूर्वी त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, अशी स्थानिक स्वराज्य संस्थांची धुरा सांभाळली. याच काळात त्यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात ठसा उमटवत आपला दबादबा निर्माण केला. पुढे शंकरराव मोहिते-पाटील यांच्या निधनानंतर 1980 मध्ये माळशिरस या मतदारसंघातून विजयदादा पहिल्यांदा आमदार झाले आणि तेथून सुरू झालेला राज्याच्या राजकारणातला प्रवास थेट उपमुख्यमंत्रिपदापर्यंत जाऊन पोहोचला.

या काळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, पर्यटन विभाग, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, साखर संघाचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यामुळे साहजिकच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा वाढतच गेला. तब्बल 29 वर्षे आमदार म्हणून विधानसभेत माळाशिरसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विजयदादांचा जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघासह निम्म्याहून अधिक विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव होता. तो प्रभाव इतका होता, की सोलापूर जिल्ह्यातच ‘मोहिते-पाटील गट’ नावाची एक स्वतंत्र राजकीय यंत्रणा उभी राहिली. एक काळ तर असा होता की, जिल्ह्यात दररोज मोहिते-पाटील आणि अकलूज हे नाव नसेल, असे एकही वर्तमानपत्र सापडणे मुश्कील होते. इतकी मजबूत पकड जिल्ह्याच्या राजकारणावर आणि सहकारी संस्थांवर विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांच्या घराण्याने निर्माण केली होती.

पवारांना विजयी करण्यात सिंहाचा वाटा...

1980 च्या दशकापासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात विजयसिंह मोहिते-पाटील या नावाचा दबदबा कायम राहिला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी 1995 च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटलांचे मत विचारात न घेता उमेदवारी जाहीर केल्या. त्यात करमाळा मतदारसंघात जयवंत जगताप यांना आणि माढ्यात पांडुरंग पाटील, तर बार्शीत प्रभाताई झाडबुके या तिघांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र हे तिन्ही उमेदवार पडले आणि या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले होते. यामध्ये बार्शीत दिलीप सोपल, करमाळ्यात दिगंबर बागल आणि माढ्यात बबनदादा शिंदे विजयी झाले होते. त्यावेळी मोहिते-पाटील गटाला विचारात न घेतल्यानेच त्यांनी आपल्या ताकदीची जाणीव पवारांना करून दिल्याची चर्चा आजही होते.

पुढे 2009 मध्ये शरद पवारांना माढा मतदारसंघातून सुरक्षितपणे लोकसभेत पाठवण्याचे श्रेयदेखील विजयसिंह मोहिते-पाटलांनाच द्यावे लागेल. सुप्रिया सुळे यांना लोकसभेत पाठविण्यासाठी शरद पवार यांनी बारामती मतदारसंघ सोडून स्वत:साठी दुसऱ्या मतदारसंघाची चाचपणी सुरू केली. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात पक्षाच्या बरोबरीने कार्यरत असलेल्या मोहिते पाटील गटाचा पवारांना आधार मिळाला आणि पवारांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघात मोहिते-पाटील घराण्याचे वर्चस्व होते. पक्षाचे अध्यक्षच आता माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार म्हटल्यावर विजयदादांनीही आपली ताकद पणाला लावून शरद पवारांना भरघोस मतांनी विजयी केले होते. तसेच ज्याप्रमाणे पवारांना विजयी करण्यात मोहिते-पाटलांचा सिंहाचा वाटा होता. त्याचप्रमाणे रामदास आठवले यांना पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार करण्यात मोहिते-पाटलांचाच हातभार होता... हेही विसरून चालणार नाही...

साखर संघाचे दुसऱ्यांदा अध्यक्षपद...

2014 च्या निवडणुकीत देशात मोदीलाटेचा जोर होता. त्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाची चिंता होती. राष्ट्रवादीने यावेळी माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटलांना संधी दिली होती. विजयदादा त्यावेळी साखर संघाचे दुसऱ्यांदा अध्यक्षपद सांभाळत होते. त्यामुळे साखर पट्ट्यात विजयसिंह मोहिते-पाटील विजयी होतील, याची सर्वांनाच खात्री होती. स्थानिक स्वराज्यसंस्था आणि मंत्रिमंडळात काम करत असताना विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात आपला चांगला जम बसवला होता. त्यातच खुद्द शरद पवार ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते, तिथले जनमत हे प्रति राष्ट्रवादी पक्ष समजल्या जाणाऱ्या मोहिते-पाटील गटासाठी अनुकूलच होते. त्यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याविरोधात सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली. मात्र मोदीलाटेतही अकलूजच्या सिंहांनी विजयाचा गुलाल उधळला होता. यावेळी सदाभाऊ खोत यांचा 25000 मतांनी पराभव झाला होता.

राजकीय वजन आणि प्रशासनावरची पकड...

कामगिरी दमदार आणि स्वभाव दिलदार असे राजकीय व्यक्तीमत्व असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांचा जनाधार खूप मोठा आहे. मुळातच मोहिते-पाटील कुटुंबावर प्रेम करणारा मतदार वर्ग बहुसंख्य आणि बहुजातीय आहे. मतदारसंघातील असो किंवा सोलापूर जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती विजयदादांना सहज भेटू शकत होता. म्हणजेच मतदारांसाठी 24 तास उपलब्ध राहणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच विजयदादांच्या कामाचा धडाकाही तितकाच वेगवान आहे. शिवाय विजयदादांचा दराराच इतका होता की प्रशासकीय अधिकारीदेखील त्यांनी सांगितलेले काम वेळेच्या आत पूर्ण करीत असत.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना जिल्हा परिषद प्रशासन दादा आले म्हटले, की डोक्यावर टांगती तलवार घेऊन काम करीत असे. खासदार म्हणून निवडून गेल्यावरही त्यांची ती जरब कायम होती. एकदा मतदारसंघातील एका गावात सत्काराच्या कार्यक्रमाला विजयदादा गेले होते. त्यावेळी आयोजकांनी भाषणातच गेल्या अनेक वर्षांपासून गावच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याचे सांगत त्याच्या कामासाठी झेडपीकडून निधी मंजूर करण्याची विनंती केली. त्यावेळी कसलाही उशीर न करता विजयदादांनी स्टेजवरूनच जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक विभागाच्या सभापतींना फोन लावला आणि दीड ते दोन कोटी रुपयांचा निधी त्याच क्षणाला मंजूर करून घेतला होता. एवढेच नाही, तर राष्ट्रवादीचे खासदार असूनदेखील त्यांनी मतदारसंघातील फलटण - पंढरपूर रेल्वेमार्गाची मंजुरी मिळवण्यात यश मिळवले होते. कुर्डुवाडी येथील रेल्वे डबेनिर्मितीच्या कारख्यान्याचा विस्तार आणि निधी मिळवण्यातही कसर सोडली नव्हती. त्यांच्या या कामातूनच त्यांचे राजकीय वजन आणि प्रशासनावरची पकड सहज अधोरेखित होते.

विधान परिषदेवर संधी...

1980 पासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या विजयसिंह मोहिते-पाटलांना 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र पराभवाला सामोरे जावे लागले होते. याचं कारण म्हणजे 2009 ला राज्यातील मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानं माळशिरस हा मतदारसंघ राखीव झाला होता. त्यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील हे विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यामुळे शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर जाण्याचा सल्ला दिला. पण विजयदादांना विधानसभेत जायचे होते. त्यावेळी माढ्यात बबनदादा शिंदे उमेदवार असल्याने त्यांना अखेर पंढरपूरचा पर्याय निवडावा लागला. मात्र या ठिकाणी सुधाकरपंत परिचारक यांचा पत्ता कट करावा लागला. साहजिकच पंतांच्या गढीमध्ये त्यांचाच पत्ता कट झाल्यावर त्याचा फटका विजयदादांना बसणार, हे अपेक्षितच होते.

त्यावेळी विजयदादा यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार भारत भालके हे मैदानात उतरले होते. तसं तर भालके हेही राजकारणात शरद पवारांचा पठ्ठ्या म्हणूनच ओळखले जात होते. याच काळात अजित पवार मोहिते-पाटील गटाचा वाढता प्रभाव कमी करण्याची संधी शोधत होते आणि ती संधी 2009 मध्ये चालून आली. त्याचाच फायदा घेत अजित पवारांनी मोहिते-पाटलांच्याविरोधात भालकेंनाच रसद पुरवल्याचे गुपित निकालानंतर उघड झाले. या निवडणुकीत विजयदादांचा पराभव करीत भालके जॉईंट किलर ठरले आणि मोहिते-पाटील घराण्याला राजकारणातील पहिला पराभव पंढरपुरात पाहावा लागला. अजित पवारांची खेळी यशस्वी झाली असली तरी पक्षप्रमुख म्हणून शरद पवारांना भविष्यात याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते, याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी विजयदादांना विधान परिषदेवर संधी दिली. तसेच साखर संघाच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही त्यांच्याकडे सोपवला होता.

मात्र पुढे अजित पवार गटाकडून मोहिते-पाटील गटाला शह देण्यासाठी पक्षांतर्गत होत असलेल्या कुरघोड्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाच्याविरोधात दिलेली ताकद, यांसह अन्य काही पक्षांतर्गत कुरबुरी वाढतच गेल्या. त्यातच 2019 ला रणजिंतसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यास झालेला नकार या सर्व घटनांची परिणती अखेर पक्षांतरामध्ये झाली आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून राजकारणातील या मातब्बर घराण्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातच मोहिते-पाटील घराण्याचा मान-सन्मान भाजपमध्ये कधीही कमी होऊ देणार नाही, असे मधाळ वक्तव्य करीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मोहिते-पाटील घराणे आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांना आपलंसं करून घेण्यात कोणतीच कसर सोडली नाही.

राजकारणात विजय नावाच्या 'सिंहा'ची दहशत...

सध्या माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्येच यादवी युद्ध रंगले आहे. याला कारण म्हणजे या मतदारसंघातील मातब्बर राजकारणी घरातल्या आणखी एका सिंहाने माढा लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे, तर दुसरीकडे भाजपाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. पंरतु माढा म्हणजे मोहिते-पाटील घराण्याचे नाव आणि ताकद आलीच.

आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर मोहिते-पाटील हे घराणे ज्याच्या पाठीशी उभे राहील, तोच येथील खासदार असे समीकरण प्रचलित झाले आहे. संदीपान थोरात, रामदास आठवले, शरद पवार असोत किंवा आताचे विद्यमान खासदार रणजिंतसिंह नाईक-निंबाळकर या सर्वांच्या जिंकण्यामध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या जनाधाराचा मोठा वाटा आहे. आज घडीला जरी मोहिते-पाटलांच्या विरोधकांचे बळ वाढले असले तरी मागील तीन दशकांनंतरही अकलूजच्या या 'सिंहां'विरोधात लढा देण्यासाठी अथवा त्यांच्याविरोधात टीका करण्याची कोणा "एकट्याची" हिंमत झाली नाही, हेही तितकेच सत्य आहे आणि याच गोष्टी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात विजय नावाच्या 'सिंहा'ची दहशत अधोरेखित करतात. त्यामुळे भाजपलाही मोहिते-पाटलांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

दरारा कायम...

विजयसिंह मोहिते-पाटील यांनी एक मातब्बर राजकारणी म्हणून वाटचाल करीत असताना केवळ राजकारणावर भर दिलेला नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राच्या विकासातही त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे. राज्याचे पर्यटनमंत्री असताना त्यांनी छत्रपती शिवरायांचे विचार तरुणाईला समजावेत, म्हणून राज्यातील ऐतिहासिक स्थळांच्या विकासकामासाठी निधी उपलब्ध करून दिला.

अकलूजमध्ये शिवसृष्टी उभी केली. राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात वावरत असताना लोककलांकारांना राजाश्रय दिला. त्यासाठी त्यांनी अकलूज लावणी स्पर्धांचे आयोजन केले. पंढरपूरच्या धर्तीवर अकलूजमध्ये घोडेबाजार भरण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या मुलांना चागंले शिक्षण मिळावे, म्हणून अकलूजमध्येच दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थांचे जाळे निर्माण केले. अशा प्रकारे एक ना अनेक विकासाच्या कामांमुळेच आजही विजयदादा आणि मोहिते-पाटील घराण्याचा राजकारणातील दरारा आजही कायम टिकून राहिला आहे.

Edited by: Mangesh Mahale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT