Manoj Jarange Patil News  Sarkarnama
ब्लॉग

Manoj Jarange Patil Protest : मराठ्यांनो, हा माणूस तुमच्यासाठी दिवाळीतही घराचा उंबरा शिवणार नाही!

अय्यूब कादरी

Manoj Jarange Patil News : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. या सर्व उत्सवी वातावरणात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे अवघा मराठा समाज त्यांचा पाठीमागे एकवटला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी कशी होणार, याची चिंता व्यापाऱ्यांना, नागरिकांना होती. जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यामुळे ती चिंता आता मिटली आहे. दिवाळी तोंडावर आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने घराच्या बाहेर आहेत. या काळात ते एकदाही घरी आले नाहीत. (Latest Marathi News)

आणखी वाढीव कालावधी द्यावा, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने जरांगे पाटील यांना दिले. दिवाळी तोंडावर आल्यामुळे ते घरी येतील, अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांना होती. मात्र, ती आशाही फोल ठरली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय घराचा उंबरा शिवणार नाही, अशी प्रतिज्ञाच जरांगे पाटील यांनी गुरुवारी केली आहे. जरांगे पाटील यांचे वडील रावसाहेब, पत्नी सुमित्रा, मुलगा शिवराज आणि कन्या पल्लवी यांचे डोळे जरांगे पाटील यांच्या वाटेकडे लागले होते. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची कुटुंबीयांची इच्छा मात्र अधुरीच राहणार आहे.

जरांगे पाटील हे निर्धाराचे पक्के आहेत. यासह प्रामाणिकपणा, निस्पृहतेच्या बळावर त्यांनी मराठा समाजाचा विश्वास संपादन केला आहे. कोपर्डीच्या प्रकरणातील आरोपींवर कार्यकर्त्यांनी न्यायालयात हल्ला केला होता. त्यांच्यावर खटले दाखल झाले. दीड वर्षाचा कारावास झाला. हे कार्यकर्ते जोपर्यंत कारागृहात आहेत, तोपर्यंत मी घराचा उंबरा शिवणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी त्यावेळी केला होता. तो त्यांनी पूर्ण केला. कारावास संपवून कार्यकर्ते बाहेर आल्यानंतरच जरांगे पाटील घरी गेले. या दीड वर्षात त्यांनी एकदाही घराचा उंबरा शिवला नव्हता. सुरुवातीच्या काळात संघटना बांधणी करतानाचा त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या उंबरठ्यापर्यंत आणले आहे. मात्र, ते स्वतः आपल्या घराच्या उंबरठ्यापासून दूर आहेत.

अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा बेमुदत उपोषण सुरू केले होते. नवव्या दिवशी दोन नोव्हेंबर रोजी त्यांनी सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी ते स्थगित केले. नऊ दिवस उपाशी राहिल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. सडपातळ अंगकाठी असलेल्या जरांगे पाटील यांचे वजन घटले आहे.

उपोषण स्थगित केल्यानंतर ते उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, बोलताना त्यांना त्रास होत आहे, असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. चावरे सांगितले आहे. त्यांचा अशक्तपणा वाढला आहे, वजन आधीपेक्षाही जास्त कमी झाले आङे. त्यांची प्रकृती पूर्ववत व्ह्यला वेळ लागणार आहे. त्यांची प्रतिकारक्ती कमी झाली असून, किडनी आणि लिव्हरवर सूज आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

तसे पाहिले तर समाज, संघटनेसाठी काम करताना उपाशी राहणे हे त्यांच्यासाठी नवे नाही. सुरुवातीच्या काळात आणि आताही मराठा समाजाच्या कामासाठी फिरताना त्यांचे जेवणाकडे लक्ष नसते. कुठेतरी चहा घ्यायचा, काही मिळालेच तर खायचे, अन्यथा पुढच्या प्रवासाला लागायचे असा त्यांचा दिनक्रम असायचा. ते दिवाळीला घरी येणार नाहीत, याचे दुःख कुटुंबीयांना आहेच. आता त्यांच्या आरोग्याविषयीच्या बातमीमुळे कुटुंबीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT