NCP News :
NCP News :  Sarkarnama
ब्लॉग

NCP Anniversary News : 'पंचवीशी' राष्ट्रवादीची, आतुरता मुख्यमंत्री पदाची..! संधीचं सोनं करण्याचं..

संजय मिस्कीन

NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस आज (शनिवार) पंचविसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्ताने पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने पक्षाच्या जडणघडणीचा आढावा घेतला आहे.

राज्याच्या राजकारणात पक्षसंघठना अन् देशाच्या राजकारणात नेतृत्वाची छाप पाडणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या पंचवीस वर्षात राष्ट्रवादी सलग 1999 ते 2014 अशी सलग पंधरा वर्षे अन् 2019 ते 2021 कालावधीत अडीच वर्षे अशी राज्याच्या सत्तेत साडेसतरा वर्षे तर, तर 2004 ते 2014 अशी सलग दहा वर्षे केंद्रात सत्तेत राहिलेला पक्ष.

पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारा पक्ष..

अर्थात 25 वर्षातील साडेबावीस वर्षे राष्ट्रवादी राज्य अथवा केंद्रात सत्तास्थानी असलेला पक्ष आहे. परदेशी मुद्द्यावरून काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी 25 वर्षे पक्षाची धुरा एकहाती संभाळली. पण आजही या पक्षाला मुख्यमंत्रीपदावर आपला हक्काचा नेता बसवण्यात अपयश आले. 2004 मध्ये संधी असतानाही मुख्यमंत्रीपद नाकारणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पुरोगामी आणि लोकशाहीवादी विचारांचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून ओळख ठसवण्यात यशस्वी झाला आहे.

मुख्यमंत्री पदाचा सोपान सर करा..

या 25 वर्षाच्या काळात राष्ट्रवादीने अनेक चढउतार पाहिले. संकटे झेलली. आरोपांच्या गर्तेत विश्वासार्हतेवरील प्रश्नचिन्हे अधोरेखित केली. भाजप सोबत राजकीय एकोपा करण्याची संधी अन् आमंत्रण असतानाही फारकत घेत पुरोगामी विचारांचा पिंड कायम राहिल याची काळजी घेतली. कार्यकर्त्यांसह राज्यभरात नेतृत्वाची पिढी उभी करण्यात राष्ट्रवादीने आघाडी घेतली. पण मुख्यमंत्री पदाचा सोपान सर करावी, अशी भरारी राष्ट्रवादीला घेता आली नाही. पक्षसंघटनेचे मजबूत जाळे, राज्याचे नेतृत्व करतील असे अनेक मातब्बर अनुभवी नेते राष्ट्रवादीत आहेत. तरीही मुख्यमंत्रीपदाने या पक्षाला हुलकावणी दिली हे वास्तव आहे.

पवार हिम्मतीने उभे राहिले..

राष्ट्रवादीत अनेक नेते असले तरी नेता-कार्यकर्ता म्हणून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पक्षबांधणीची जिगर वयाच्या 82 वर्षानंतरही तसूभरपण कमी झालेली नाही ही या पक्षाची जमेची बाजू आहे. 2012 नंतर देशाच्या पातळीवर मोदीच्या रूपाने नवा आक्रमक अन् सर्वसमावेश चेहरा उभारत असताना राष्ट्रवादीची कोंडी करण्याचे प्रकार सुरू झाले. यामध्ये शरद पवारांच्या सोबतच्या अनेक मातब्बर नेत्यांना भाजपाने आकर्षित केले. पण शरद पवार हिम्मतीने उभे राहिल्याचे अनेक प्रसंग राज्यात घडले.

सोयीच्या हिंदुत्वालाच छेद देत आघाडीचा प्रयोग..

मोदी लाटेत नेतृत्वाची संधी लाभलेल्या भाजप नेत्यांनी पवारांचा काळ संपला, असा आत्मविश्वास व्यक्त करत पवार आणि राष्ट्रवादीची कुचंबना केली. पण 2019 च्या विधानसभेत काँग्रेस सोबत आघाडी करून दोन्ही पुरोगामी विचारांच्या 98 जागा जिंकल्या. तर, भाजप विरोधी शिवसेनेसोबत महाविकास आघाडीचा प्रयोग करत नवे राजकिय समिकरण जन्माला घातले. शरद पवार विरोधकांना हा 'धोबीपछाड' होता. तर, भाजपला इशाराही होता. पारंपारिक काँग्रेसी विचारांची घराणी सोबतीला घेत भाजपने 2014 ला सत्ता काबिज केली. पण शरद पवारांनी भाजपच्या राजकीय सोयीच्या हिंदुत्वालाच छेद देत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला.

...राष्ट्रवादी पक्ष आघाडीवर

वयाने ज्येष्ठ असलेले शरद पवार पक्षाच्या विशीनंतर महाराष्ट्रातील युवकांचे सर्वाधिक चाहते नेते बनले. सततचा जनसंपर्क अन् सक्रिय राजकारणाने राष्ट्रवादीचे ढासळते बुरूज पुन्हा नव्याने मजबूत बनवण्याचे काम सुरू केले. आज 25 व्या वर्षात पदार्पण करताना पक्षाची लोकशाहीवादी आणि पुरोगामित्वाची भूमिका अधोरेखित करण्यात शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आघाडीवर आहे.

शरद पवार हेच सर्व वादावरचे जालिम औषध..

पंचवीस वर्षात राष्ट्रवादीने सत्तेत सर्वाधिक कार्यकाळ घालवला असला तरी शरद पवार यांनी पक्षसंघठना आणि नव्या नेतृत्वाच्या संधी शोधण्याचा ध्यास सोडला नाही. याच कारणाने भाजपच्या मोदी लाटेत लहान पक्षाची वाताहात झालेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय किंमत कमी झालेली नाही हे वास्तव आहे. पक्षांतर्गत धुसफूस आणि नेतृत्वाच्या वादाचे अनेक कांगोरे राष्ट्रवादीला भेडसावत असले तरी, शरद पवार हे मात्र या सर्व वादावरचे अंतिम अन जालिम औषध आहे, हे या पक्षातील सर्वच नेते जाणतात. त्यामुळे 25 वर्षाच्या राष्ट्रवादीला पुढच्या निवडणुका लढण्यासाठीचा आत्मविश्वास वाढला आहे.

विरोधकांची मोट बांधणारा महत्वाचा दुवा..

महाविकास आघाडीच्या चाहत्यांची सोबत घेवून धर्मांध विचारांचा सामना करण्याचे मोठे आव्हान आता राष्ट्रवादी समोर आहे. अन् हे आव्हान राष्ट्रवादीने स्वीकारल्याचा आत्मविश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची भूमिका सत्तेच्या राजकारणा सोबतची असली तरी शरद पवार यांची ठाम भूमिका आणि युवा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास या सत्तातूर नेत्यांवर भारी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे 25 व्या वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देवाच्या राजकारणातही भाजप विरोधकांची मोट बांधणारा महत्वाचा दुवा ठरत आहे.

संधीचे सोने करण्याचे आव्हान..

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसमोर केद्रीय तपास यंत्रणाची टांगती तलवार असली तरी भाजपला शरण जायचे नाही, असा निर्धार शरद पवार यांनी केल्याचे मानले जाते. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुका हा राष्ट्रवादीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आव्हाने आणि संकटे कितीही असली तरी त्याचे संधीत रूपांतर करणे ही शरद पवार यांची ओळख आहे. पण, राज्याच्या मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादीचा नेता बसवून या संधीचे सोने करण्याचे आव्हान या पंचवीसाव्या वर्धापन दिनी पेलण्याचे दिव्य राष्ट्रवादीला पार पाडावे लागेल.

स्वतःची ओळख निर्माण करणे हे जिकरीचे..

राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला स्वतःची ओळख निर्माण करणे हे जिकरीचे आव्हान या पक्षासमोर आहे. केवळ सत्ता हेच साधन न ठेवता महाराष्ट्राचे मानवतावादी संस्कार आणि पुरोगामी विचारांचा वारसा संभाळून धर्मांधतेच्या गर्द अंधकारातून राज्याला संविधानात्मक लोकशाहीचा प्रकाश दाखवणारी मशाल चेतवण्याचे कार्य पार पाडण्याची कसरत राष्ट्रवादीला करावी लागणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT