गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या दोन घटना घडल्या. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. परभणी येथे न्यायालयानी कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा 15 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघालं. यादरम्यान लोकांना आबा या नावाने ओळखले जाणारे माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांची आठवण येऊ लागली.
समाजमाध्यमांवर आणि एकमेकांशी बोलतानाही लोक आबांचे दाखले देऊ लागले. सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याचं नाव आलं. त्यामुळं धनंजय मुंडे यांनी राजीनमा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून सुरू झाली, मात्र मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे त्यांच्या पाठिशी उभा राहिला. दोषी सिद्ध होईपर्यंत मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी भूमिका पक्षानं घेतली. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांच्या विरोधात रान पेटवलं. विविध शहरांत आक्रोश मोर्चे काढले जाऊ लागले.
परभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची विविध नेत्यांनी भेट घेतली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीला जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोमनाथ हे राज्यघटनेचे संरक्षण करत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. सरकारवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. सोमनाथ यांच्या मृत्यूबाबत भाजपचे आमदार सुरेश धस हे आक्रोश मोर्चांमध्ये बोलत आहेत, मात्र त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, हे ते सांगत नाहीत. सरपंच देशमुख यांच्या हत्येला जबाबदार कोण, याकडे त्यांनी अंगुलनिर्देश केला, मात्र सोमनाथ यांच्या बाबतीत तसं झालं नाही.
या परिस्थितीत लोकांना आबांची आठवण का येत असेल? कारण सोपं आणि साधं आहे. आबा साधे, सरळ होते, निष्कलंक होते. संकटकाळात त्यांच्या तोंडून एक आक्षेपार्ह वाटावं असं विधान निघालं आणि त्यानंतर त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. याची आठवण आता लोकांना येऊ लागली आहे. मुंबईवर 26-11 चा दहशतवादी हल्ला झाला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्याबाबत 'बडे शहरों मे ऐसी छोटे बातें होती रहेती हैं...' असं विधान त्यांच्या तोंडून गेलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली आणि आबांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
गेल्या महिनाभरापासून राज्यात गोंधळाची परिस्थिती आहे. सरपंच देशमुख यांची ज्या क्रूरतेने हत्या करण्यात आली, ती संवेदनशील माणसाला अंतर्बाह्य हादरवून टाकणारी आहे. भविष्य अंधःकारमय दिसत आहे. देशमुखांची हत्या ही राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे. न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? सरपंच देशमुख यांच्या हत्येला जबाबदार कोण आहे, हे त्यांचे कुटुंबीय, आमदार सुरेश धस आणि लोक ओरडून सांगत आहेत. मात्र संबंधितांनी नैतिक जबाबदारी म्हणून अद्यापही राजीनामा दिलेला नाही.
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची 10 डिसेंबर रोजी मोडतोड करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ परभणीसह राज्यभरात बंद पाळण्यात आला. त्या दरम्यान परभणीत जाळपोळ, दगडफेक झाली. या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली होती. 15 डिसेंबर रोजी त्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीमुळं मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय करत आहेत. सोमनाथ यांच्या मृत्यूला जबाबादार कोण आणि राजीनामा कुणी द्यायचा? हा प्रश्न अनुत्तरित आहे. या एकंदर परिस्थितीमुळे लोकांना आबांची आठवण येऊ लागली आहे.
आता आबा गृहमंत्री असते तर त्यांनी राजीनामा दिला असता.... लोकांची अशी भावना झाली आहे, समाजमाध्यमांत, खासगीत लोक अशी चर्चा करू लागले आहेत. आबांच्या साधेपणाचे किस्से पुन्हा चर्चेत येऊ लागले आहेत. जिल्हा परिषद सदस्य ते गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास, मात्र ते अखेरपर्यंत आबाच राहिले, आबांच्या समोर साहेब हा शब्द कधीच लागला नाही. त्यांनी पदाचा कधीही दुरुपयोग केला नाही. साधेपणा हा त्यांच्या स्थायीभाव. ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी राबवलेलं ग्रामस्वच्छता अभियान प्रचंड लोकप्रिय झालं होतं.
आबांचे चाहते गावागावात आहेत. असेच एक चाहते असलेले उमरगा तालुक्यातील राजकीय अभ्यासकस, पेशाने शिक्षक असलेले विक्रम चव्हाण हे आबांच्या आठवणी सांगताना म्हणतात, ''गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राची गोंधळलेली व अंधारलेली राजकीय परिस्थिती पाहता आर. आर. आबांची प्रकर्षानं आठवण येत आहे. पालकमंत्रिपद म्हणजे जणू मलिद्याचा गोळा समजून ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर आबांनी स्वतःहून घेतलेलं गडचिरोलीचं पालकमंत्रिपद आठवतं. त्यांनी नुसती जबाबदारीच घेतली नाही तर उनाड मुलाला सद्वर्तनाने वागायला प्रेरित केल्यासारखं गडचिरोलीला सांभाळलं.''
आबांचा साधेपणा, सच्चेपणा उठून तर दिसतो. लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर उठून दिसणारा चेहरा म्हणजे आबा, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आबा आमदार झाले, नामदार झाले, तरीही त्यांच्या पत्नी सुमनकाकी या जमीन शेणानं सारवत असत. दंतकथा वाटावं, असे निष्कलंक चरित्र आज कुठंही पाहायला मिळत नाही. गुत्तेदाली, जमीन बळकावणे, कारखाने देशोधडीला लावून हजारो कोटींची संपत्ती जमवणाऱ्या राजकारण्यांच्या काळात आबांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली, हे पाहून कुठेतरी हा माणूस आपला वाटायचा,'' अशीही भावना चव्हाण व्यक्त करतात.
सध्या महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडत आहेत, अशा परिस्थितीत आबा हयात असते, पक्षात महत्वाच्या पदार असते, महत्वाचे मंत्रिपद त्यांच्याकडं असतं, तर त्यांनी काय केलं असतं? विक्रम चव्हाण सांगतात, तासगाव भागातील त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्यानं वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आदी आरोपींसारखं वर्तन केलं असतं तर त्यांनी कार्यकर्त्यांना अजिबात दयामाया दाखवली नसती. आरोपींना जामीन मिळणार नाही, याची काळजी घेतली असती, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला असता. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय, असं लोकांना वाटलं असतं तर ते मंत्रिपदावरून पायउतार झाले असते. मुळात आबांकडे असे कार्यकर्तेच नव्हते. 2004च्या विधानसभा निवडणुकीत ते प्रचंड अडचणीत सापडले होते, तरीही गैरमार्गाचा अवलंब न करता त्यांनी विजय मिळवला होता.
आता आबांची राजकीय कारकीर्द पाहू. सांगली जिल्ह्यातीस तासगाव तालुक्याच्या अंजनी गावात 16 ऑगस्ट 1957 रोजी झाला. भागीरथी पाटील आणि रामराव पाटील हे आबांचे आई-वडील. आबांचे कुंटंबीय शेतकरी होते, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळं 'कमवा आणि शिका' या योजनेतून काम करून त्यांनी आपल्या शिक्षणाचा खर्च भागवला. सांगलीतील शांतीनिकेतन महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी मिळवली. त्यानंतर एलएलबी करून ते कायद्याचे पदवीधर झाले. आबांच्या स्वच्छ, निष्कलंक चारित्र्याची पायाभरणी त्यांच्या शालेय, महाविद्यालयीन जीवनातच झाली होती.
गरीब, शेतकरी कुटुंबातील या तरुणाचे नेतृत्वगुण सुरुवातीला वसंतदादा पाटील यांनी हेरले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आबांची वक्तृत्वशैली लोकांच्या मनाला भिडणारी होती. सावळज गटातून 1979 मध्ये आबांनी पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून 1990 ते 2014 या काळात आबा सलग विजयी झाले. तासगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आबा 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. 1995 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाले, तेव्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. आबांनी त्यावेळी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता.
शरद पवारांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. आबांनीही त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. आबांच्या यशाचा चढता आलेख पाहून त्यांचे विरोधक निर्माण झाले. म्हणूनच 2004 ची निवडणूक आबांसाठी अटीतटीची ठरली. 1999 मध्ये राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडीचं सरकार स्थापन झालं. आबांना पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचं कॅबिनेटमंत्रिपद मिळालं. पदभार घेतल्यानंतर आबांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केलं. गावं स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. हे अभियान खूप नावाजलं गेलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली.
ग्रामविकास मंत्री असल्यामुळं मतदारसंघाकडे आबांचंदुर्लक्ष झालं होतं. त्यांना राज्यभरात दौरे करावे लागत असत. आबांनी दुसऱ्या फळीतील नेत्यांवर मतदारसंघातील कामांची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क कमी झाला. आबांना भेटायचं असेल तर लोकांना काहीवेळा मुंबई गाठावी लागायची. सांगली जिल्ह्याला 2002 पासून दुष्काळाच्या झळा सहन करावा लागत होत्या. तासगाव मतदारसंघ दुष्काळी पट्ट्यात येत असल्यानं पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळं आबांना मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्याचा फायदा आबांचे त्यावेळचे विरोधक व काँग्रेस नेते संजयकाका पाटील यांनी उचलला. त्यांनी जोरदार आंदोलन करीत आबांना अडचणीत आणलं.
मतदारसंघात आबांचा जनसंपर्क कमी होत असताना सप्टेंबर 2004 मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली. आबा प्रदेशाध्यक्ष असल्यानं त्यांना केवळ मतदारसंघापुरतं पाहून चालणार नव्हतं. त्यांचे राज्यभरात दौरे सुरू झाले. तिकीट वाटपापासून स्टार प्रचारक अशी भूमिका बजावत असल्यानं आबा फक्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच तासगावात दाखल झाले होते. संजयकाका यांनी तासगावमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळं ही निवडणूक अटीतटीची झाली होती. आबा 70,483 मतं मिळवून विजयी झाले. संजयकाका पाटील यांना 64,179 मतं मिळाली होती.
2004 च्या निवडणुकीतील एक रंजक किस्सा सांगितला जातो. आबा अडचणीत होते. आबांचे जिल्ह्याबारेचे पक्षांतर्गत विरोधकही संजयकाकांच्या पाठिशी होते, असं सांगितलं जातं. मतदारसंघात काही ठिकाणी पैशांचं वाटप करण्यात आलं होतं. त्या नोटांच्या बंडलवर सोलापूर जिल्हा बँकेचे शिक्के आहेत, हे आबांनी पुराव्यानिशी लोकांना दाखवून दिलं होतं, असा तो किस्सा. आबांनी गुंड पाळले नव्हते, बूथ कॅप्चरिंगही केली नव्हती. पराभव झाला असता तर त्यांनी तो खुल्या मनाने स्वीकारला असात, मात्र सध्या जसे प्रकार होतात, तसे त्यांनी केले नसते. त्यामुळं गेल्या महिनाभरापासूनच्या सामाजिक, राजकीय गोंधळाक अनेकांना आबांची आठवण येत आहे.
आबांच्या कुटुंबीयांना कधीही सत्तेचा दर्प चढला नाही. त्यांचे एक बंधू राजाराम पाटील हे पोलिस दलात होते. सख्खा भाऊ गृहमंत्री आहे म्हणून त्यांनीही कधीही बडेजाव केला नव्हता. आबा गृहमंत्री, उपमुख्यमंत्री असताना त्यांचे दुसरे बंधू सुरेश पाटील हे गावी शेती करत. पत्नी सुमनकाकी, मुलगा रोहित, स्मिता आणि सुप्रिया या कन्या, असा आबांचा परिवार. आबांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनकाकी विजयी झाल्या. 2019 च्या निवडणुकीतही त्या विजयी झाला. आबांचे पुत्र रोहित पाटील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
वयाच्या 58 व्या वर्षी 16 फेब्रुवारी 2015 रोजी आबांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक इतिहासात नोंद होईल, अशी कामे आबांनी केली आहेत. डान्सबारव बंदीचा निर्णय त्यांनीच घेतला होता. त्यांच्या तासगाव मतदारसंघातील अनेक तरुण पनवेल, रायगड येथील डान्सबरमध्ये येत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. गावाकडची पिढी वाया जात असल्याचं लक्षात आल्यानंतर आबांनी डान्सबारबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयात ती बंदी उठली आणि डान्सबार पुन्हा सुरू झाले. सध्याच्या परिस्थितीत लोकांना आबांची आठवण येण्याचं हेही एक कारण असावं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.