R R Patil  Sarkarnama
ब्लॉग

R. R. Patil Jayanti: ‘चोरच तुम्हाला उचलून नेतील’ असे ऐकवून आरआर आबांना ‘वॉचमन’ची नोकरी नाकारली होती

NCP Leader News: उंचीमुळे वॉचमनची नोकरी नाकारल्या गेलेल्या आर आर आबांनी सर्वांत मोठी पोलिस भरतीही आपल्या कार्यकालात करून दाखवली.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News: रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर. आर. आबा हे नाव माहिती नाही, असा महाराष्ट्रात एकही माणूस शोधूनसुद्धा सापडणार नाही. आपल्या कर्तृत्वाने राज्यातील नागरिकांच्या मनात घर करणारा असा हा हळव्या मनाचा नेता. जिल्हा परिषद सदस्य ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अशी त्यांची दैदीप्यमान राजकीय कारकिर्द आहे. आबा फक्त पदे मिरवत बसले नाही तर आपल्या धडाकेबाज निर्णयाने त्यांनी त्यापदाला मोठे केले. ग्रामविकास खात्यात केलेल्या कामामुळे तर त्यांना महाराष्ट्राचे आधुनिक गाडगेबाबाच म्हटले जातंय. अशा या कर्तृत्वान आर आर पाटील यांची आज (ता. १६ ऑगस्ट) जयंती. त्यानिमित्त.... (R R Patil was denied the job of 'watchman')

आर. आर. पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील अंजनी या गावी शेतकरी कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत खडतर अशी होती. मात्र, सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आबांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. प्राथमिक शिक्षण तासगावला झाल्यानंतर आबा हे उच्च शिक्षणासाठी सांगलीला आले. माजी आमदार प्राचार्य पी. बी. पाटील यांनी सुरू केलेल्या शांतिनेकतनमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.

विज्ञान शाखेचा खर्च परवडणार नाही; म्हणून आबांनी कला शाखेला प्रवेश घेतला. कला शाखेसाठी येणारा खर्च आपण स्वतःच उभारायचा, या हेतूंनी त्यांनी ’कमवा आणि शिकवा’ योजनेत काम करण्यास सुरुवात केली. घरची गरिबी असल्यामुळे आबा अत्यंत साधे राहत होते. पायात स्लिपर, एखादी-दुसरी वही घेऊन ते महाविद्यालयात जात असे. शालेय जीवनापासून ते फर्डे वक्ते होते, त्यामुळे ते वक्तृत्व स्पर्धा गाजवायचे. त्या स्पर्धेच्या बक्षीसातून ते शालेय खर्चही भागवायचे.

त्याचवेळी सांगलीतील एका साखर कारखान्याची वॉचमन आणि क्लार्क भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. शिक्षण घेत नोकरी करण्याचा त्यांचा इरादा होता. मात्र, त्यांना क्लार्कच्या जागा नाहीत, असे कारखान्यातून सांगितले गेले. त्यावेळी आबांनी ‘मी वॉचमनसाठीही अर्ज केला आहे,’ असे सांगितले. त्यावेळी त्या व्यवस्थापकाने आबाकडे पाहत ‘चोरच तुम्हाला उचलून नेतील’ अशी टिपण्णी केली हेाती. कमी उंचीमुळे आबांना त्यावेळी वॉचमनची नोकरी नाकारली होती.

अत्यंत हालाखीच्या परिस्थिती आबांनी एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी नेमकी जिल्हा परिषदेची निवडणूक लागली होती. सांगली जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संपतराव माने यांच्याकडे ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट मागायला गेले. विशेष म्हणजे त्यांना तिकिट मिळाले आणि निवडून आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. तब्बल ११ वर्षे त्यांनी सांगली जिल्हा परिषद गाजवली.

आर आर आबा १९९० च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. त्यानंतर ते सर्व महाराष्ट्राचे आबा झाले. पुढील काळात ते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू बनले. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे विधानसभेबरोबरच अख्ख्या महाराष्ट्रात गाजली. उत्कृष्ट संसदपट्टू, अभ्यासू आमदार, उत्कृष्ट वक्ता अशी त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. आबांनी १९९० मध्ये प्रथम विधानसभेत पाऊल टाकले. तेव्हापासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत ते अपराजित राहिले.

महाराष्ट्र विधानसभेत १९९० पासून काँग्रेसचे आमदार म्हणून काम करणारे आर. आर. पाटील यांनी १९९९ मध्ये शरद पवारांची साथ देत राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पवारांनीही आबांच्या कार्यकर्तृत्वाला दाद देत १९९९ मध्ये राज्याच्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. त्यावेळी त्यांनी राबविलेले उपक्रम हे मैलाचे दगड ठरले. आबांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू करून स्वच्छतेची चळवळ उभारली. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे आधुनिक गाडगेबाबा असेही म्हटले जाते.

राष्ट्रवादीने त्यांना २००३ मध्ये गृहमंत्री बनविले. गृहमंत्री बनताच त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीचे पालकमंत्रिपद मागून घेतले आणि त्या ठिकाणी भरीव असे काम केले. तेथील बदल आज आपण अनुभवत आहोत. त्याचवेळी त्यांनी डान्सबार बंदी, गुटखा बंदी यासारखे थेट समाजमनावर परिणाम करणारे निर्णय घेतले. पुढे २००४ मध्ये ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि राज्यातील सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. उंचीमुळे वॉचमनची नोकरी नाकारल्या गेलेल्या आर आर आबांनी सर्वांत मोठी पोलिस भरतीही आपल्या कार्यकाळात करून दाखवली. अशा या अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेल्या आर आर पाटील यांची आज जयंती. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिनंदन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT