Sarkarnama Podcast : राजकारण हे महिलांचे काम नाही, असे वाक्य आता पुण्यात कोणीही उच्चारण्याचे धाडस करणार नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी, महिलांनी चूल आणि मूल यांच्या पलीकडं जायचं नसतं, अशी विचारसरणी काही पुरुष मंडळींच्या डोक्यात ठासून भरलेली होती. डोक्यावरचा पदर चुकून खाली पडायला नको, अशी भावना त्याकाळी समाजात रुजली होती. मात्र, पुण्यातील महिला हा पदर कंबरेला खोचत राजकारणात यशस्वी झाल्या आहेत.
अनेकदा महिला लोकप्रतिनिधींच्या घरची पुरुष मंडळीच सारी सूत्रे हाती ठेवत असल्याने महिलांच्या नेतृत्वगुणाबाबत गैरसमजच खूप आहेत. मात्र, पुणे शहरातील अनेक महिलांनी हा समज खोटा ठरवत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतंत्र ओळख प्रस्थापित केली आहे. विशेषतः पुण्यातील पाच माजी महापौरांनी आपली राजकारणातील वाघिणी अशी वेगळी ओळख निर्माण करीत या महिला लोकप्रतिनिधींनी राज्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. महिला सक्षमीकरणात पुणे जिल्ह्याने नेहमीच एक पाऊल पुढे ठेवले आहे. या घडीला पुण्यातून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, अश्विनी जगताप, उमा खापरे यांनी राजकारणात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
1952 मध्ये झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 65 वॉर्डांपैकी एकाच जागेवर महिला प्रतिनिधी निवडून येऊ शकल्या. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये पुण्यात महिलांचा राजकीय प्रवास काहीसा थांबलेला दिसला. पालिकेच्या 1992 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच 35 महिला निवडून आल्या. त्यापैकी अनेक महिला पुण्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. या पाच वर्षांत महिलांना महापौर होण्याचा मान मिळाला. कमल व्यवहारे या पुण्याच्या पहिल्या महिला महापौर झाल्या. त्यानंतर वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दीप्ती चवधरी आणि रजनी त्रिभुवन व राजलक्ष्मी भोसले या महिलांनी हे पद समर्थपणे भूषवले. पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर आमदारपदापर्यंत पोहोचण्याची किमया काही महिलांनी साधली आहे.
गेल्या वीस वर्षांत महिलांचा राजकारणातला सहभाग लक्षात येईल इतक्या प्रमाणात वाढला आहे. झगडत, संघर्ष करत, स्वत:ला सिद्ध करत महिलांनी महिलासाठी तरी राजकारणात जागा निर्माण केली आहे. राजकारणातल्या आरक्षणासाठी तिने संघर्ष केला आणि त्याचं फळ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांवर ती ‘राजकारण’ करू लागली आहे. पाणी, आरोग्य, विकासाच्या योजना, पायाभूत सुविधा, स्वच्छतागृहे, बचत गट, महिला सुरक्षितता, स्त्री-भ्रूणहत्या, भाजी मंडई व त्यातील स्वच्छता, दिव्यांचा अभाव यांसारख्या प्रश्नांवर लक्ष वेधले आहे.
गेल्या वीस वर्षांतील पुणे महापालिकेतील कारकीर्द गाजवताना माजी महापौर कमल व्यवहारे, वंदना चव्हाण, दीप्ती चवधरी, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले या पाच वाघिणींनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी राजकारणातील कारकीर्द कर्तृत्वाने गाजवत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केलं आहे. या पाच जणींनी वक्तृत्व, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता, दूरदृष्टी, हजरजबाबीपणा, लोकांचे प्रश्न मुळापासून जाणून घेऊन त्यांवर काम करण्याची वृत्ती याच्या जोरावरच यशस्वी महिला राजकारणी अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वंदना चव्हाण यांचा जन्म 6 जुलै 1961 रोजी पुण्यात झाला. त्यांचे बालपण पुण्यातच गेले. त्यांचे वडील विजयराव मोहिते हे नावाजलेले वकील होते. तर त्यांचे पती हेमंत चव्हाणही मोठे वकील आहेत. त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली होती. नगरसेवकपदापासून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. महापौर, आमदार, खासदार असा प्रवास करत वंदना चव्हाण या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. विशेषतः त्यांना तालिका सदस्य म्हणून राज्यसभा चालवण्याचा बहुमान मिळाला.
वडील विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरू असताना काँग्रेसच्या नेत्यांनी वंदना चव्हाण यांना महापालिका निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात वंदना चव्हाण नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानंतर पुन्हा निवडून येऊन 1997-98 मध्ये त्या पुण्याच्या महापौर झाल्या. सुरेश कलमाडी हे त्यांचे मार्गदर्शक होते. 1998 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या शरद पावर यांच्याशी एकनिष्ठ आहेत. पुणे महापालिकेची 2012 आणि 2017 ची निवडणूकही राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखाली लढविली होती. तत्पूर्वी त्यांनी पर्वतीमधून विधानसभेची निवडणूक लढविली होती.
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना वंदना चव्हाण यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाली. त्यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणूनही काम केले. स्वच्छ प्रतिमा आणि सर्व प्रकारच्या वादापासून दूर राहिलेल्या वंदना चव्हाण यांना 2012 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले.
राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या वंदना चव्हाण या नगरसेवक पदापासून महापौर, विधान परिषदेच्या आमदार, राज्यसभेच्या खासदार अशी एक एक पायरीवर चढत आल्या आहेत. गेल्याच वर्षी वंदना चव्हाण यांची राज्यसभेच्या हंगामी सभापतिपदी निवड झाली होती. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर लोकसभा किंवा राज्यसभेच्या सभेचे कामकाज चालविण्याची संधी पुण्याच्या खासदाराला वंदना चव्हाण यांच्या रूपाने मिळाली होती. त्यांना मिळालेल्या या संधीमुळे पुणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
पुणे (Pune) शहर काँग्रेसच्या सक्रिय महिला नेत्या म्हणून दीप्ती चवधरी यांची वेगळी ओळख आहे. महिला उन्नती केंद्रामार्फत सामाजिक कार्यात असणाऱ्या चवधरी या सुरुवतीच्या काळात 1997, 2000 मध्ये पुणे महापालिकेच्या सदस्य होत्या. त्यांनी त्या काळात प्रभागातील प्रश्न आक्रमकपणे सभागृहात मांडले. त्यांनी त्या काळात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत विविध कामे मार्गी लावली.
सलग दोन वेळा महापालिका निवडणुकीत त्या निवडून आल्याने 2002-2005 दरम्यान त्या पुणे शहराच्या महापौर होत्या. त्यांना काँग्रेसकडून (Congress) महापौर पदाची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत पुणे शहरासाठी विविध लोकाेपयोगी कामे करीत त्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली. महापौरपदाच्या काळात त्यांनी महात्मा फुले स्मारक, सावित्रीबाई फुले स्मारक, मौलाना कलाम आझाद स्मारक आणि पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी केली. त्यांच्याच काळात महापौरांसाठी महापौर निवासस्थान बांधण्यात आले. या कामामुळे त्यांची काम करणाऱ्या महापौर अशी प्रतिमा निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
त्यांनी केलेल्या या कामांची बक्षिसी त्यांना 2010 मध्ये मिळाली. त्यांना काँग्रेसकडून विधान परिषद सदस्य होण्याची संधी मिळाली. सुरेश कलमाडी यांच्या गटाच्या असल्याने त्यांना ही संधी मिळाली. त्या काळातही त्यांनी विधान परिषदेत नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. त्या सध्या पुणे शहर काँग्रेसच्या सक्रिय नेत्या आहेत.
पुणे शहर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या आणि पुणे मनपाच्या पहिल्या महिला महापौर म्हणून कमल व्यवहारे (Kamal Vyavhare) ओळखल्या जातात. विशेष म्हणजे त्या पाच वेळा पालिकेच्या सदस्य राहिलेल्या आहेत. त्या सलग पाचवेळा पालिका निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्या 1992 मध्ये त्या पुण्याच्या पहिल्या महापौर होत्या. महापौरपदी असताना त्यांनी महिलांना स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. विशेषतः प्रभागातील समस्या सोडवताना पालिकेच्या सभागृहात नागरिकांच्या समस्या पोटतिडकीने मांडत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचा पालिका सभागृहात दबदबा निर्माण जाला होता.
कमल व्यवहारे यांनी प्रदेश काँग्रेस संघटनेत सरचिटणीस, उपाध्यक्ष, काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ( 2010 ) म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. जिजाऊ मार्केटिंग महिला सहकारी संस्थेमार्फत महिलांना स्वयंपूर्ण करण्याचे काम त्यांनी केले आहे. काँग्रेसची संघटनात्मक जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळत पुणे शहरात काँग्रेसला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केलं आहे.
कमल व्यवहारे यांचे संघटनात्मक काम पाहून त्यांची काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदावरही त्या काही काळ कार्यरत होत्या. विविध पदांवर काम करण्याचा अनुभव त्यांना आहे. पुरुषप्रधान राजकारणाच्या क्षेत्रात त्यांनी गेल्या 25 वर्षांपासून अधिक काळ काम करीत त्या राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी प्रेरणास्राेत आहेत.
राजलक्ष्मी भोसले (Rajlaxmi Bhosale) या आधी माहेर आणि लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून मिळालेल्या राजकीय संस्कारच्या शिदोरीवर राजकारणात यशस्वी ठरलेल्या आहेत. पती मालोजी भोसले यांच्या पाठिंब्याने सुरुवातीला त्या काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या. त्यानंतर 1997 च्या महापालिका निवडणुकीत त्या पहिल्यांदा निवडून आल्या. पुढे 2002 मध्ये आणि 2007 च्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या.
त्यानंतर 2007 मध्ये राजलक्ष्मी भोसले या पुणे शहराच्या पहिल्यांदा महापौर झाल्या. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदाची संधी दिली. या संधीचे सोने करताना त्यांनी पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याला प्राधान्य दिले. विशेषतः त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध संकल्पना राबवत मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यांच्या कारकीर्दीत केला.
विशेषतः काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून त्या काळात केलेले काम, पुढे नगरसेवक, महापौर आणि आता राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. विशेषतः 1992 च्या महापालिका निवडणुकीपासून सुरू झालेली भोसलेविरुद्ध विठ्ठल तुपे ही राजकीय लढाई तुपे यांचे पुत्र, पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे यांच्यापर्यंत कायम आहे. जेव्हा राजलक्ष्मी भोसले महापौर होत्या. त्यावेळी चेतन यांना सभागृहात नेहमीच डावलण्यात आल्याचे सांगितले जाते. तुपेंमुळे तेव्हा त्यांचे नुकसान झाले. मात्र पुढे तेवढाच फायदाच झाला, असेही म्हटले जाते.
राजलक्ष्मी भोसले राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी पोल्ट्रीचा व्यवसाय करीत होत्या. हा व्यवसाय त्यांची काम करण्याची जिद्द व चिकाटीही दर्शवतो. पोल्ट्रीसारख्या व्यवसायात पाऊल टाकताना, तो चालवताना आलेले अनुभव व्यवसाय नेटाने कसा करावा, याचा मार्गदर्शक दाखला आहे. त्या काम करताना कधीच लाजल्या नाहीत. वेळप्रसंगी त्यांनी न डगमगता ट्रकमध्ये कोंबड्यासुद्धा भरल्या आहेत. त्यामुळेच माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांचा सामाजिक, राजकीय प्रवास राजकारणात नव्याने येणाऱ्या मंडळींसाठी दिशादर्शक असाच आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या कार्यकाळात पुण्याला सर्वाधिक महिला महापौर मिळाल्या. यात कमल व्यवहारे, वंदना चव्हाण, दीप्ती चवधरी, वत्सला आंदेकर, रजनी त्रिभुवन यांचा समावेश होता. त्याचबरोबर स्थायी समितीच्या अध्यक्ष म्हणून नीता राजपूत यांच्यासह अन्य महिलांना संधी मिळाली. रजनी त्रिभुवन या 2004 ते 2006 दरम्यान त्या पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. त्यांनी महापौरपदाच्या कार्यकाळात विविध समस्या सोडवल्या. त्यांनी महापौर असताना अनेक लोकोपयोगी व धाडसी निर्णय घेतले. त्यासोबतच त्यांची दूरदृष्टी, हजरजबाबीपणा यामुळे शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागले. पालिका सभागृहात ज्येष्ठ सदस्या या नात्याने त्यांनी दबदबा निर्माण केला.
शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुणे शहरातील माजी महापौरांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली आहे. वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यावरील खड्डे हे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संघटनेत रजनी त्रिभुवन यांचा समावेश आहे. शहराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, प्रथमच अशा प्रकारे माजी महापौर एकत्र आले आहेत. रजनी त्रिभुवन यांनी कॉंग्रेस पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
Edited BY : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.