Sudhakar Naik Sarkarnama
ब्लॉग

Sudhakar Naik : जलसंधारणाचे प्रणेते, 'पंचायत राज'लाही बळकटी

Sarkarnama Podcast : माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची ओळख राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते अशी आहे. सुधाकररावांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ केवळ दीड वर्षाचा होता. या कमी कालावधीतही त्यांनी छाप पाडली होती. ते उत्तम प्रशासक होते.

अय्यूब कादरी

त्यांना राजकारणाचा मोठा वारसा होता. त्यांचे काका सलग 11 वर्षं मुख्यमंत्री होते. असं असतानाही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. स्वतःच्या कर्तृत्वावर एकेक पायरी चढत त्यांनी मुख्यमंत्रिपद गाठलं, पुढं राज्यपालही झाले. आपण बोलतोय माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्याबद्दल. पंचायत राज व्यवस्थेला नाईक यांनी नवा आयाम दिला. जलसंधारण विभागाची निर्मिती त्यांच्याच मुख्यमंत्रिपदाच्या काळात झाली. मुंबईतील माफियाराज संपवण्यातही सुधाकरराव नाईक यांनी महत्वाची भूमिका बजावली.

सुधाकरराव नाईक हे राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक. त्यांचे काका वंसतराव नाईक हे महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. वसंतराव नाईक हे सलग 11 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. वसंतरावांची ओळख हरितक्रांतीचे जनक अशी तर सुधाकररावांची ओळख जलक्रांतीचे प्रणेते अशी आहे. सुधाकररावांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ केवळ दीड वर्षाचा होता. या कमी कालावधीतही त्यांनी छाप पाडली होती. ते उत्तम प्रशासक होते.

सुधाकरराव नाईक यांचा जन्म 21 ऑगस्ट 1934 रोजी झाला. त्यांचा विवाह 9 सप्टेंबर 1959 रोजी मांडवी येथील सुमनताई यांच्याशी झाला. बंजारा समाजातील जुन्या पिढीतील समाजसुधारक बळीराम पाटील यांच्या त्या कन्या. सुधाकरराव यांचे माध्यमिक शिक्षण यवतमाळ येथे तर महाविद्यालयीन शिक्षण अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात झालं. नाईक कुटुंबाला राजकरणाचा मोठा वारसा आहे. सुधाकररावांची कारकीर्द सरपंचपदापासून सुरू झाली. ते गहुली या गावाचे सरपंच बनले. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.

पक्षातील संघटनात्मक पदांवरही त्यांनी काम केलं. विधानसभेत पोहोचण्याआधी ते काँग्रेसचे जिल्हा सचिव होते. त्यानंतर 1978 ते 1995 दरम्यान ते सलग पाचवेळा पुसद मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर मुंबईत दंगल उसळली होती. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993 दरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. शरद पवार यांना 1991 मध्ये केंद्रात जावं लागलं होतं. त्यामुळे रिक्त झालेल्या मुख्यमंत्रिपदावर त्यांची वर्णी लागली होती. 1998 मध्ये ते वाशीम लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

गेल्या 72 वर्षांपासून पुसद विधानसभा मतदारसंघावर नाईक कुटुंबीयांचं वर्चस्व आहे. या मतदारसंघातून नाईक कुटुंबातील सदस्यच आतापर्यंत आमदार झाले आहेत. महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या आधीपासून ते आतापर्यंत म्हणजे 2024 पर्यंत एका घराण्यातील आमदार देणारा हा मतदारसंघ आहे. या कुटुंबानं महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले आहेत. सुधाकरराव नाईक यांचे काका वसंतराव नाईक हे सलग 11 वर्षे मुख्यमंत्रिपदावर होते. त्यानंतर सुधाकरराव यांनीही मुख्यमंत्रिपद भूषवलं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुसद मतदारसंघातून इंद्रनील नाईक निवडून आले आहेत. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांना राज्यमंत्रिपद मिळालं आहे.

1952 च्या पहिल्या निवडणुकीत वसंतराव नाईक पुसद विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर 1957 पासून 1972 पर्यंत तेच येथून विजयी होत गेले. त्यांच्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी पाचवेळा पुसद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 1995 च्या निवडणुकीत मनोहर नाईक निवडून आले. पुढे 2004 ते 2014 दरम्यानच्या तीन निवडणुकांमध्ये तेच विजयी झाले होते. इंद्रनील नाईक 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. ते नाईक कुटुंबाच्या पिढीचं प्रतिनिधित्व करत आहेत.

सुधाकरराव नाईक हे काका वसंतराव नाईक यांच्याप्रमाणेच दूरदृष्टी असलेले राजकीय नेते होते. त्यांनी राज्यात जलक्रांतीचे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. त्यातूनच ते मुख्यमंत्री असताना जलसंधारण विभागाची स्थापना झाली. पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठीही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. महिला व बालविकास विभागाची स्थापनाही त्यांच्याच काळातली. जलसंधारण मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी 'पाणी अडवा - पाणी जिरवा' ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरलेली योजना सुरू केली होती. शेतकऱ्यांच्या घरी समृद्धी नांदावी, या विचारातून त्यांनी ही योजना आणली होती.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक यांनी घेतला. शेतकऱ्यांना दहा टक्के व्याजदरानं पीककर्ज मिळत होतं. व्याजदराचा हा आकडा त्यांनी सहा टक्क्यांवर आणला. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा ठरला, एेतिहासिक ठरला. शेतकऱ्यांसह त्यांचं लक्ष शिक्षणाकडेही होतं. त्यातूनच त्यांनी अमरावती विद्यापीठ आणि रामटेक येथे संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली. अभियांत्रिकीचे आधुनिक शिक्षण, महिला आयोगाची स्थापना आदी क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतले. त्यांची ही पावलं दूरगामी परिणाम करणारी ठरली आहेत.

मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा सुधाकरराव यांच्या काळातच सुरू झाली. मुली शिकल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, असं त्यांना वाटत असे. विनाअनुदानित तत्त्वावरील अभियांत्रिकी महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पाहता त्यांनी महिला व बालकल्याण या स्वतंत्र विभागाची स्थापना केली. मुख्यमंत्री म्हणून सुधाकरराव यांना फक्त दीड वर्षाचा कालावधी मिळाला. इतक्या कमी कालावधीत त्यांनी अनेक समाजोपयोगी, एेतिहासिक निर्णय घेतले.

राज्यात 1990 मध्ये काँग्रेसची सत्ता आली होती. शरद पवार मुख्यमंत्री बनले. पुढे 1991 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली. काँग्रेसला बहुमताचा जवळ जाणारा आकडा मिळाला होता. शरद पवार पंतप्रधान होणार, अशी चर्चा सुरू झाली, मात्र पंतप्रधानपद पी. व्ही. नरसिंहराव यांना मिळालं. त्यांच्या मंत्रिमंडळात पवार यांना स्थान मिळालं. शरद पवार पहिल्यांदाच केंद्रात मंत्री झाले. त्यामुळं रिक्त झालेल्या मुख्यमंत्रिपदासाठी इकडे महाराष्ट्रात मोठी चुरस निर्माण झाली होती. शरद पवार यांनी सुधाकरराव नाईक यांना पसंती दिली.

सुधाकरराव आपल्या ऐकण्यात राहतील, असे पवारांना वाटत होतं, मात्र झालं उलटंच. एखादं सावज टप्प्यात आलं की मी लगेच टिपतो, असे विधान त्यावेळी सुधाकरराव यांनी एका जाहीक सभेत केलं होतं. त्यामुळे पवार आणि त्यांच्यातील ताणले गेलेले संबंध समोर आले होते. दोघांतील मतभेद वाढतच गेले. छगन भुजबळ यांच्यासह शरद पवार यांच्या अन्य काही समर्थक मंत्र्यांना सुधाकररावांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिला. नाईक यांनी पवारांचं ऐकणं बंद केलं होतं, हे यावरून सिद्ध झालं. याद्वारे नाईक यांनी शरद पवार यांची नाराजी ओढवून घेतली होती.

त्या काळात देशभारत टोकाच्या धार्मिक ध्रुवीकरणाची सुरुवात झाली होती. राममंदिर उभारणीसाठी आंदोलन सुरू झालं होतं. लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती. देशभरातील वातावरण ढवळून निघालं होतं. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर देशभरात धार्मिक दंगली सुरू झाल्या होत्या. महाराष्ट्राची राजधानी मुंबईही या दंगलीत होरपळून निघाली. दंगल नियंत्रणात आणण्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून सुधाकरराव नाईक यांना अपयश आलं होतं. ते ठळकपणे दिसत होतं. त्यामुळं स्वपक्षातील नेत्यांसह विरोधकांनीही सुधाकरराव यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

सुधाकराव नाईक यांनी शरद पवार यांची नाराजी आधीच ओढवून घेतली होती. दंगल नियंत्रणात आणण्यासाठी अपयश आल्यामुळंही ते अडचणीत आले होते. त्यामुळं अखेर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. त्यानंतर शरद पवार केंद्रातून राज्यात परत आले आणि मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्रिपदाच्या दीड वर्षाच्या कालावधीत सुधाकरराव नाईक यांनी दूरगामी परिणाम करणारे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बनवण्यात आलं. शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी सुधाकररावही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते.

मुंबईतील माफियाराज संपवण्यात सुधाकरराव नाईक यांचा मोठा वाटा होता. मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्या बेकायदेशीर इमारतीवर कारवाई सुरू केली होती. सुधाकररावांनी खैरनार यांच्या या कारवाईत कोणत्याही प्रकारचा अडथळा आणला नाही. प्रचंड दबाव, आमिषांना झुगारून खैरनार यांनी दाऊदची ती अवैध इमारत जमीनदोस्त केली होती. नाईक यांनी अन्य माफिया आणि गुंडांवरही कारवाईचा बडगा उगारून त्यांची दहशत संपवली होती. यात पप्पू कलानी, छोटा राजन आदींचा समावेश होता.

जलक्रांतीचे प्रणेते, अशी सुधाकररावांची ओळख आहे. त्यांनी राज्यात जलसंधारण चळवळीचा पाया रचला. त्यांनी जलसंधारण परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. ते जुलै 1994 ते सप्टेंबर 1995 या दरम्यान हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. राज्यपलापदाचा राजीनामा देऊन त्यांनी जलसंधारण चळवळीत स्वतःला झोकून दिलं. जलसाक्षरता वाढण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी 10 मे रोजी जलसंधारण दिन साजरा केला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हा निर्णय घेतला होता.

सुधाकरराव मुख्यमंत्री झाले त्यावेळीही शेतीमध्ये सुधारणांची मोठी गरज होती. ही बाब हेरून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. पिकांचे उत्पादन वाढणे, ही सुधारणा आहेच, मात्रे केवळ तेवढ्यावरच भागणार नाही. जिरायती शेती ओलिताखाली आणावी लागेल, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर त्यांनी जलसंधारणाची चळवळ सुरू केली होती. यासाठी त्यांनी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये खास दौरे केले. जलसंधारणाच्या स्वतंत्र कामांना गती दिली. पाणलोट क्षेत्र विकास हा उपक्रम त्यांचाच. त्यामुळेच छोटे बंधारे, पाझर तलावांच्या उभारणीला गती मिळाली.

सुधाकरराव नाईक यांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम केलं. 'पाणी अडवा- पाणी जिरवा' हा मंत्र त्यांनी देशाला दिला. राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी या कामात स्वतःला झोकून दिलं होतं. जलसंधारण चळवळीसाठी दौऱ्यावर असतानाचा त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यातच 10 मे 2001 रोजी त्यांचं निधन झालं. मुख्यमंत्री व्हायच्या आधी त्यांनी मंत्रिमंडळात उद्योग, महसूल, दुग्धव्यवसाय आदी महत्वाची खाती सांभाळली होती. मुख्यमंत्रिपदाच्या कमी कालावधीत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे मुख्यमंत्री अशी त्यांची इतिहासात नोंद झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT