58 वर्षांच्या काळात शिवसेनेने अनेक चढ-उतार पाहिले. प्रत्येक संघर्षातून शिवसेना अधिक उजळून निघाली. शिवसेनेला शह देण्याचे अनेक प्रयत्न झाले; पण ते निष्फळ ठरले. आज शिवसेनेचा 59वा वर्धापनदिन. त्यानिमित्त या पक्षाच्या घोडदौडीचा घेतलेला आढावा.
‘शिवसेना’ ही महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासातील एक सोनेरी पान आहे. एक स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, पत्रकार आणि प्रबोधनकार पित्याने आपल्या पुत्राच्या माध्यमातून पाहिलेलं उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न म्हणजे ‘शिवसेना’. शिवसेनेची स्थापना जरी 19 जून 1966 मध्ये झाली असली तरी त्याची पायाभरणी ही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झाली. महाराष्ट्र पुत्रावर होत असलेला अन्याय आणि सापत्न व्यवहार ठळकपणे समोर आला. मुंबईतील उद्योगपती हे मुंबई आपल्या मालकीची आणि वेगळं असं स्वतंत्र राष्ट्र असल्याच्या आविर्भावात वावरत. कारण सत्ताधारी राजकारणी, आघाडीचे नेते आणि पक्ष हे अशा उद्योगपतींच्या आशीर्वादावर चालत होते. त्यामुळे महाराष्ट्रापासून मुंबई गुजरातला द्यायची किंवा मुंबई स्वतंत्र केंद्रशासित राज्य म्हणून ठेवायची, हा घाट केंद्रातील नेहरू सरकारने घातला होता; मात्र आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे, कॉम्रेड अमृत डांगे, एस. एम. जोशी, शाहीर अमर शेख, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, शाहीर आत्माराम गव्हाणकर असे वेगवेगळ्या राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेत असणारे नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अन् विचारवंत एकत्रित आले. जनतेच्या या लढ्यापुढे सरकारला झुकावं लागलं. इंदिरा गांधी आणि त्यांचे पती फिरोज गांधी यांनी लोकमानस ओळखलं आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान नेहरू यांना राजी केलं. भारताच्या नकाशावर ‘महाराष्ट्र राज्य’ उदयास आलं. महाराष्ट्र पुत्रांचा विजय झाला.
महाराष्ट्र राज्य उदयास आलं, मुंबई महाराष्ट्राला मिळाली; मात्र मुंबई महाराष्ट्रात असली तरी महाराष्ट्राचं प्रतिबिंब मुंबईत नव्हतं. मराठी माणूस इथे उपऱ्यासारखा चाकरमानी म्हणून जगत होता. ‘मुंबई तुमची आणि भांडी घासा आमुची’ असं बिगर मराठी आणि परप्रांतीय खासगीत मराठी माणसाला हिणवत होता. त्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘फ्री प्रेस जर्नल’ या इंग्रजी दैनिकात व्यंगचित्र रेखाटण्याचं काम करत होते; मात्र आपलं स्वतःचं असं व्यंगचित्राला वाहिलेलं साप्ताहिक असावं, असं त्यांना वाटू लागलं. मराठीत असं कुठलं साप्ताहिक नव्हतं. शिवाय, ‘फ्री प्रेस’मध्ये व्यंगचित्र रेखाटन करताना बरीच बंधनं येत होती. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या बाळासाहेबांनी मराठीत व्यंगचित्रांचं साप्ताहिक काढण्याची कल्पना आपले वडील प्रबोधनकार ठाकरे यांना बोलून दाखवली. प्रबोधनकारांनीही लगेच संमती दिली. त्यावर बाळासाहेबांनी पुन्हा एक प्रश्न केला, ‘दादा, नाव काय द्यायचं?’ त्यावर प्रबोधनकार म्हणाले, ‘मार्मिक’... बाळासाहेबांनाही हे नाव फार आवडलं आणि ‘मार्मिक’चा जन्म होऊन ते प्रकाशित होणं सुरू झालं. मराठी पत्रकारविश्वातील हे पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक होतं.
शिवसेनाप्रमुखांतील पत्रकार, समाजसेवक आणि महाराष्ट्र स्वाभिमानी नेता ‘मार्मिक’च्या माध्यमातून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी, स्वाभिमानासाठी सरकारवर आणि खासगी उद्योगावर तुटून पडू लागला. बाळासाहेब मराठी माणसाच्या मनातलं बोलत आणि लिहीत असल्यामुळे अन्यायाने संतापलेला मराठी तरुण त्यांच्याभोवती जमू लागला. त्या वेळी प्रबोधनकार एके दिवशी बाळासाहेबांना म्हणाले, ‘हे असं केवळ जागृती आणि लिहिणं कुठपर्यंत चालायचं? एवढी माणसं दररोज येत आहेत, एवढ्यावर समाधान मानून नाही चालणार! याला संघटनात्मक आकार द्या.’ त्यावर बाळासाहेब वडिलांना म्हणाले, ‘हो संघटना काढायची आहे; पण नाव काय द्यायचं?’ त्यावर प्रबोधनकार म्हणाले ‘शिवसेना’. छत्रपती शिवाजी महाराजांची सेना. तेव्हापासून शिवसेनेचा जो झंझावात महाराष्ट्रात सुरू झाला तो आजपर्यंत सुरू आहे. आज शिवसेनेचा 59वा वर्धापनदिन. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे शिवसेना, असं समीकरण गेल्या 58 वर्षांत निर्माण झालं आहे.
शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानाला हाक दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पाला मावळ्यांनी साथ दिली तशी साथ शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिली. महाराष्ट्र आणि देशहिताच्या आड जो येईल त्याच्याशी बाळासाहेबांनी दोन हात केले. त्यासाठी त्यांनी ना जीवाची पर्वा केली ना सत्तेची. देशातील आणि बाहेरील दहशतवाद्यांच्या यादीवर पहिल्या क्रमांकावर असलेलं नाव म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा दिल्लीतून चालत असे. त्याला शिवसेनेने छेद देत महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्रात आणलं.
58 वर्षांच्या काळात शिवसेनेने अनेक चढ-उतार पाहिले; मात्र प्रत्येक संघर्षातून शिवसेना अधिक उजळून निघाली. शिवसेनेला शह देण्याचे अनेक प्रयत्न झाले. ते सर्व शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत झाले. पहिला प्रयत्न बंडू शिंगरे याने शिवसेनेच्या सुरुवातीलाच केला. त्यानंतर छगन भुजबळ, गणेश नाईक आणि नारायण राणे शिवसेना सोडून गेले. शिवसेनेला सर्वात मोठा धक्का हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा होता. तो केवळ संघटनात्मक धक्का नव्हता, तर कुटुंबाच्या पातळीवरही होता; मात्र तोही शिवसेनेने पचवला. शिवसेना पुन्हा महाराष्ट्रात उभी राहिली.
मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत सत्तेचा घरोबा केला. महाराष्ट्रातील बहुसंख्य शिवसैनिकांना ते पटलं नव्हतं; पण बोलणार कसं? कोरोनाचा काळ कठीण होताच; पण शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांवर प्रेम करणाऱ्या लाखो शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती; पण उद्धवजींना सांगणार कोण? कोण कोंडी फोडणार? अशा असंख्य अस्वस्थ व्यक्तींमध्ये एक नाव होतं एकनाथ शिंदे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेला एकनिष्ठ अनुयायी. तो हे सर्व बघत होता. सर्वांच्या सोबत बोलत होता. मत जाणून घेत होता आणि मग ठरलं... सत्ता गेली तरी बेहत्तर, कोण काय म्हणेल त्याची पर्वा करायची नाही; मात्र जगायचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी आणि मरायचंदेखील त्यांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी.
मनात प्रचंड काहूर होतं; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे स्मरण करत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उठाव केला. शिंदे यांनी पुन्हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या बाजूने आणली. राजकीय पक्ष अनेक आहेत; मात्र शिवसेना हा फक्त राजकीय पक्ष नाही. ती इथल्या सर्वसामान्यांसाठी झटणारी सामाजिक संघटना प्रथम आहे, त्यानंतर शिवसेना हे कुटुंब आहे. त्याचे कुटुंबप्रमुख हे शिवसेनाप्रमुख असून त्यांनी दाखवलेला मार्ग आणि दिलेला विचार ही शिवसैनिकांची आचारसंहिता आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून गरीब, शोषित, बेरोजगार असा मराठी माणूस शिवसेनेचा केंद्रबिंदू राहिला आहे.
त्यामुळे प्रचंड श्रीमंत, जमीनदार, सावकार शिवसेनेकडे नव्हते. गरीब मराठा, कुणबी, वंजारी, धनगर आणि दलित अशी लोकं शिवसेनेकडे होती. त्यामुळे पानटपरीवर बसणारा, रिक्षा चालवणारा, किराणा दुकान चालवणारा, शिक्षक, भाजीवाला आणि अशा गोरगरीब सर्वसामान्य बहुजन वर्गातील तरुणांना शिवसेनेने नेते केले, नगरसेवक केले, मंत्री आणि मुख्यमंत्री केले. 59 व्या वर्धापनदिनी शिवसेनेच्या नव्या, जोरदार घोडदौडीच्या पर्वाची सुरुवात होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीने विरोधकांना माघार घ्यायला लावली असून आता शिवसेना नव्या दमाने पुढे जाण्यास सज्ज आहे.
(लेखक शिवसेनेचे प्रवक्ते आहेत.)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.