Anil Deshmukh Sarkarnama
देश

Anil Deshmukh News : देशमुख कुटुंबीय अडचणीत; कन्या, सुनेवर CBIचा कट रचल्याचा आरोप

Anil Deshmukh Extortion Case CBI Clean Chit Report Leak : कन्या पूजा देशमुख आणि सून राहत देशमुख यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत...

Sachin Fulpagare

NCP Leader Anil Deshmukh News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. सीबीआयने देशमुख यांची कन्या आणि सुनेवर आरोपपत्र दाखल केले आहे. 'क्लीन चिट' दिल्याची माहिती कथितरीत्या फोडल्याप्रकरणी सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

2021 मध्ये सादर केलेल्या अहवालात 'क्लीन चिट' दिली, अशी माहिती त्यावेळी दिली गेली. या प्रकरणी सीबीआयने सोमवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांची कन्या पूजा आणि सून राहत यांची नावं आहेत. या दोघींवर कट रचल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे.

पूजा आणि राहत यांनी अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांच्या माध्यमातून सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देऊन त्यांच्याकडून अहवालाचा मसुदा मिळवला, असा आरोप सीबीआयने केला आहे.

काय आहे पुरवणी आरोपपत्रात?

अनिल देशमुख यांची कन्या पूजा यांनी सीबीआयच्या तपासाविरोधात सोशल मीडियाचा वापर केला. घोषणा, व्हिडिओ कंटेट, ट्विट आणि फोटो बॅनर तयार करण्याच्या सूचना पूजा यांनी व्हॉटसअॅप चॅटवरून दिल्याचा आरोप आहे.

पूजा यांनी देशमुख यांचे वकील आनंद डागा यांची पिंपरी-चिंचवडमधील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या अतिथीगृहात जाण्यासाठी प्रवास व्यवस्था करून दिली. तपासकामासाठी तिवारी तिथे उतरले होते. डागा यांनी तिवारीकडून अहवालाचा मसुदा मिळवला. त्याबदल्यात तिवारीला 95 हजार रुपयांचा आयफोन 12 प्रो देण्यात आला, असं ग्रुप चॅटद्वारे समजल्याचं सीबीआयने म्हटलं आहे.

समांतर मीडिया ट्रायल चालवता येईल, यासाठी अनिल देशमुख यांचं सोशल मीडियाचं काम पाहणारे वैभव तुमाने यांना सीबीआयच्या अहवालाचे मुखपृष्ठ, प्रिंटिंग प्लॅन आणि साहित्य पाठवण्यास पूजा यांनी सांगितल्याचं सीबीआयने आरोपपत्रात म्हटलं आहे.

खंडणी वसुली प्रकरण आणि तपास

मुंबईतील हॉटेल्स आणि बारचालकांकडून खंडणी गोळा करण्यास अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केला होता. या आरोपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तपासाचे आदेश सीबीआयला दिले होते. सीबीआयने तपासानंतर अहवाल न्यायालयात सादर केला होता.

अनिल देशमुख यांच्याकडून कोणताही दखलपात्र गुन्हा घडलेला नाही, असं अहवालात म्हटल्याची माहिती त्यावेळी फुटली होती. त्यानंतर सीबीआयने अभिषेक तिवारी आणि आनंद डागा यांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.

याच प्रकरणात सीबीआयने सोमवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांची कन्या पूजा आणि सून राहत देशमुख यांच्यासह आणखी दोघांची नावं आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT