BJP candidate news : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा बालेकिल्ला असलेल्या बिहारमधील बांकीपूरमध्ये पक्षावर मोठी नामुष्की ओढविली आहे. नबीन यांच्या राजीनाम्यामुळे बांकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपच्या उमेदवाराने गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण काही तासांतच या उमेदवाराने अर्ज मागे घेत पक्षाला झटका दिला आहे.
बांकीपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने अभिषेक सिन्हा (बंटी) यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी गुरूवारी (ता. १०) उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, त्यांनी शुक्रवारी अचानक आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यासाठी त्यांनी कौटुंबिक कारण दिले आहे. आपण ही निवडणूक लढवू शकणार नाही. मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत राहीन, असे सिन्हा म्हणाले आहेत.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संजय सरोगी यांना काही वेळापूर्वीच याबाबत पत्र दिल्याचे सांगत सिन्हा म्हणाले, भाजपने मला एनडीएचा उमेदवार म्हणून संधी दिली होती. त्याबद्दल मी पक्षनेतृत्वाचे आभार मानतो. पण कौटुंबिक कारणामुळे मी निवडणूक लढवू शकत नाही, असे या पत्रात म्हटल्याची माहिती सिन्हा यांनी दिली आहे.
सिन्हा यांच्या या माघारीमुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी अर्ज दाखल कर्याची मुदत १३ जुलैपर्यंत आहे. त्यामुळे भाजपकडे नवा उमेदवार शोधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अद्याप तीन दिवसांचा कालावधी आहे. असे असले तरी उमेदवाराने घेतलेली माघार पक्षासाठी नामुष्की ठरली आहे.
बांकीपूर हा नितीन नबीन यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा भाजपचे कमळ फुलविण्यासाठी भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणुकीत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी भाजपसमोर आव्हान उभे केल्याचे मानले जात आहे. राष्ट्रीय जनता पक्षानेही उमेदवार दिला आहे. त्यामुळे तिरंगी लढतीची शक्यता आहे.
आता भाजपकडून कुणाला संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सिन्हा यांची माघार मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासाठीही धक्का आहे. कारण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यातही राष्ट्रीय अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यातील उमेदवारानेच माघार घेतल्याने चौधरी यांच्या रणनीतीवरही आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.