New Dehli News : बिहारमधील विधानपरिषद निवडणूक होताच मोठी राजकीय घडामोड घडली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी खेळी केल्याने विधानपरिषद निवडणुकीत जेडीयूच्या उमेदवारांचा पराभव करून दोन अपक्ष आमदार विजयी झाले होते. हे दोघेजण शनिवारी भाजपमध्ये दाखल झाले होते. सारण मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले राहुल राज आणि तिरहुत पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवलेले बंशीधर ब्रजवासी यांचा समावेश होता. मात्र, या भाजपमधील प्रवेश सोहळ्याला 24 तास पूर्ण होण्याआधीच या दोघांनी यू-टर्न घेतला आहे. या दोन अपक्ष आमदारांनी पक्षांतर बंदी कायद्यावरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आपण पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला नसून केवळ पाठिंबा दिला असल्याचे सांगत माघार घेतली आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.
बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक व उत्तरप्रदेशात या चार राज्यात विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे निकाल समोर आले असून त्यामध्ये भाजपने मोठी मुसंडी जरी मारली होती. बिहार विधान परिषद निवडणुकीत जेडीयूच्या उमेदवारांचा पराभव करून भाजपमध्ये दाखल झालेल्या दोन अपक्ष आमदारांनी अवघ्या 24 तासांतच यू-टर्न घेतला आहे. पक्षांतर बंदी कायद्यावरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आपण पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला नसून केवळ पाठिंबा दिला असल्याचे सांगत माघार घेतली आहे.
तिरहुत पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले बंशीधर ब्रजवासी आणि सारण शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले डॉ. राहुल राज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या दोन्ही अपक्ष उमेदवारांनी विधान परिषद निवडणुकीत भाजपचा एनडीए मित्रपक्ष असलेल्या जेडीयूच्या उमेदवारांचा पराभव केला होता. त्यांनी शनिवारी एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले होते. त्यानंतर हा पक्ष प्रवेश घटनात्मक वादात सापडला. पक्षांतरबंदी कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर दोन्ही आमदारांनी भाजपात सामील होण्याबाबत भूमिका बदलली आहे.
बंशीधर ब्रजवासी आणि डॉ. राहुल राज यांनी विजयानंतर भाजपच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्याठिकाणी ते भाजपमध्ये सहभागी होताना दिसले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री सम्राट चौधरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी आणि बिहार भाजपचे प्रभारी हरीश द्विवेदी हेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर दोन्ही विधान परिषद सदस्य बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे संगितले. पण त्यांच्या सदस्यत्वावरून आणि पक्षांतरबंदी कायद्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी भाजपला फक्त पाठिंबा दिला आणि औपचारिकपणे पक्षात सामील झाले नव्हते, असे सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनीही त्यांच्या स्पष्टीकरणाला पाठिंबा दिला.
दरम्यान, राहुल राज आणि बंशीधर ब्रजवासी यांनी भाजपमध्ये (BJP) औपचारिकपणे प्रवेश केला की फक्त पाठिंबा दिला, अशी चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सिद्ध झाल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. पण केवळ राजकीय पक्षाला पाठिंबा दिल्याने आपोआप अपात्रता येत नाही.
बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी संविधानाच्या दहाव्या अनुसूचीच्या कलम 2(2) चा हवाला देत दोन्ही विधान परिषद सदस्यांच्या अपात्रतेची मागणी केली आहे. या तरतुदीनुसार सभागृहात निवडून आलेला अपक्ष सदस्य निवडणुकीनंतर राजकीय पक्षात सामील झाल्यास अपात्र ठरतो. तेजस्वी यांनी भाजपवर संविधान आणि लोकशाहीची थट्टा केल्याचा आरोप केला. तसेच दोन्ही विधान परिषद सदस्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली. दरम्यान, घटनेनुसार, बिहार विधान परिषदेच्या अध्यक्षांना दहाव्या अनुसूचीअंतर्गत अपात्रतेच्या प्रकरणांवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे. दोन्ही आमदारांची सुरुवातीची वक्तव्ये आणि त्यांनी सोशल मीडियावर दिलेले स्पष्टीकरण, तसेच इतर उपलब्ध पुराव्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.