
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सामजिक कार्यकर्ते रविराज साबळे यांनी केला आहे. जाहिरात करून दिवाळी किटचे वाटप का करता, असा प्रश्न साबळे यांनी उपस्थित केला होता. त्यावर शिवसेनेचे भूम तालुकाप्रमुखाने मला फोन करून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला होता की, तुम्ही भूम परांडा तालुक्यातील शेतीला पाणी देणार होता. पण तुम्ही पाच किलो साखर देऊन येथील शेतकऱ्यांची बोळवण करता, ही शेतकऱ्यांची थट्टा नाही का, असा सवाल केला होता. अशी धमकी चार वेळा देण्यात आली आहे, असे साबळे यांनी म्हटले आहे.
हेक्टरी एक लाख रुपये भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी मोर्चा अडविला असून पोलिस आणि देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू आहे. पोलिसांनी सध्या आमदार नितीन देशमुख यांना ताब्यात घेतले आहे. तसेच, कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तीन जागा बिनविरोध होणार हे आता निश्चित झाले आहे. यात सोसायटी मतदारसंघातील मोहोळ, मंगळवेढा आणि बार्शी तालुक्याचा समावेश आहे.
jalgaon bank : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या मंत्री रक्षा खडसे यांना एकनाथ शिंदे शिवसेनेकडूनच आव्हान देण्यात आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात रक्षा खडसे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. माझ्याविरुद्ध तर कोणी निवडणूक लढवेल तर मी त्याला कसं काय लढू देईन. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला तर मी काय करू, या शब्दात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या मंत्री रक्षा खडसे यांना आव्हान दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या तुर्भे येथील उड्डाणपुलाचे काम तात्काळ पूर्ण करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. तर ठाणे बेलापूर महामार्ग शिवसैनिकांनी रोखून धरला आहे उड्डाणपूल झाले पाहिजे याच मागणीसाठी आक्रमक आहे.
एकनाथ शिंदेंची शिवसेना फोडण्यात येणार असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात पुन्हा एकदा ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यात आली होती. त्यानंतर महायुती करण्यात आली होती. त्या महायुतीची 'महाफोड' होणार आहे अशी माहिती मिळत आहे. आता शिंदेसेनाही फोडण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत १ हजार ९३७ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये सुमारे ४.३४ लाख शेतकरी सध्या या योजनेसाठी पात्र आहेत. दरम्यान, गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावली. यावेळी राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी, कृषी संचालक श्री उदय देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे उपस्थित होते.
गडकिल्ले संवर्धनासाठी डीपीडीसीमधून 3 टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी निर्णय घेतला आहे. मंदिरे, ऐतिहासिक स्मारके यांच्या संवर्धनासाठी ही मिळणार निधी.
हसन मुश्रीफ म्हणाले, ' गोकुळच्या मागील कार्यकाळात अरुण डोंगळे राजीनामा देण्यासाठी टाळाटाळ करत होते. तेव्हा कोणाला अध्यक्ष करावे. याबाबत माजी आणि सतेज पाटलांची चर्चा झाली होती. त्यावेळेस सतेज पाटील यांनी बाबासाहेब चौगुले यांचं नाव सांगितलं होतं. त्या वेळेस त्यांनी शशिकांत पाटील चूयेकर यांचं नाव सांगितलं नव्हतं.'
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या पराभवानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर जातीयवादी प्रचाराचा आरोप केला होता. काँग्रेस खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी मुश्रीफ यांचा मुद्दा खोडून काढला आहे. गोकुळमध्ये जातिवाद आणि धर्मवादाचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले.
पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधात जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी, परिसरातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता आज हस्तांतरीत करण्यात आला. देशभरातील ९.३४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १८ हजार ६९० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे जमा करण्यात आली.
नागपुरात म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू असताना क्रेन कोसळली. या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला असून दोन मजूर जखमी झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार गजानन लवटे यांच्या दर्यापूर येथील जनसंपर्क कार्यालयातच मध्यरात्री चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर बॉक्स चोरट्यांनी लंपास केला असून, काही शासकीय दस्तऐवजही चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे.
रोजगार देतो म्हणून 42 परप्रांतीय मजुरांना डांबून ठेवल्याचा प्रकार धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कौडगाव येथे उघडकीस आला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील मजुरांसह महाराष्ट्रातील विविध भागातील मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या मजुरांची सुटका केली आहे. कामगार अधिकारी देखील प्रकरणाची चौकशी करत कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. रोजगार देतो म्हणून पुणे मुंबई ठाणे या रेल्वे स्टेशन वरून परप्रांतीय मजूर उचलून आणत त्यांना डांबून ठेवत बळजबरीने ऊस तोडी करून घेतल्याचे मजुरांचे म्हणणे आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात समृद्धी महामार्गावरील रस्ता रोको आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले असून त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात बुलढाण्यातील शिवसैनिक आहेत. शेतकरी संकटात असताना सरकारने फक्त पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. आम्ही वारंवार शेतकऱ्यांसंबंधी प्रश्नावर लढत आहोत. मात्र सरकार त्याला कुठलाही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आज आम्ही समृद्धी महामार्ग रोखू आम्हाला अटक झाली तरी चालेल असे यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी म्हटले आहे.
शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल माझ्या विधानाचा विर्पयास केला आहे. शेतकऱ्यांच्या भावना दुखवण्याचा विषय नव्हता. मी हडाचा शेतकरी आहे. माझे वडील मजुरी म्हणून काम करायचे. शेतकऱ्यांविषयी वेळोवेळी मदत केली आहे. मी शेतकऱ्यांविषयी खूप संवेदनशील आहे. 55 शेतकऱ्यांना घरे देखील बांधून दिली आहेत. काही दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघात आत्महत्या झाली. काही जण नेशबाजातून, प्रेमभंगातून आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. त्याअनुषंगाने माझे विधान होते, असा खुलासा एकनाथ शिंदे शिवसेनेचे बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी केली.
हवामान विभागाने पाच राज्याला अर्णब चक्रीवादळाचा इशारा दिला होता. ठाण्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने ठाणेकरांची तारांबळ उडाली आहे. हवेत गारवा असून सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाली आहे. उष्णतेपासून हैराण झालेले ठाणेकर यामुळे सुखावला आहे. अर्णब चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस कोसळणार असल्याने हवामान विभागाने अलर्ट दिला होता.
वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आज समृद्धी महामार्ग बंद करणार आहे. आंदोलनसाठी आमदार नितीन देशमुख आता अकोल्यावरून रवाना झाले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने 1 लाखाची मदत न दिल्याच्या निषेधार्थ विदर्भातील शेतकऱ्यांना सोबत घेत आंदोलन समृद्धी महामार्ग रोखण्यात येणार आहे. आंदोलनास्थळी 150 पोलिस अधिकारी आणि दीड हजारवर पोलिस कर्मचारी तैनात आहे.
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर, जिंदालजेटी, चौथी मुंबई, रिफायनरीसह विविध विनाशकारी प्रकल्पांविरोधात आज भूमिपुत्रांचा जनआक्रोश पाहायला मिळणार आहे. पालघर जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली वरोर येथे सकाळी जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, मच्छिमार आणि आदिवासी संघटनांसह तब्बल 52 संघटना सहभागी होणार आहेत.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती. वसई फाटा हद्दीत गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर चालत्या टेम्पोतून अचानक साहित्य पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सकाळपासूनच वाहनांची गर्दी वाढल्याने वाहनचालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला.
रस्त्यावर कचरा टाकणं रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कचरा टाकण्याच्या ठिकाणी एआय आधारित कॅमेरे बसवण्यात येणार असून, पहिला प्रयोग माहीम येथील गजानन वाटिका परिसरात करण्यात आला आहे. या कॅमेऱ्यांद्वारे कचरा टाकणाऱ्या व्यक्तींची हालचाल टिपली जाणार असून, ध्वनिक्षेपकाद्वारे तात्काळ स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे. नागरिकांच्या सवयींमध्ये बदल घडवणे आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा या प्रयोगाचा उद्देश असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
पुण्यात दिवाळीत गुरुवारची पाणी कपात रद्द पुणेकरांची पाण्यावर गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी पुणेकरांना पाणी कपातीपासून दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका फुटल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या आयोगाच्या कामकाजाला अखेर गती मिळाली आहे. नऊ परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांशी संबंधित परीक्षार्थी, विद्यार्थी, संस्था आणि नागरिकांना १६ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे निवेदने व पुरावे सादर करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
सांगलीत पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत माजी खासदार संजयकाका पाटलांचा रौद्ररूप पाहायला मिळाला, कृष्णा नदीचे पाणी अडवण्यावरून संजयकाका पाटलांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर संताप व्यक्त केला. संजयकाका पाटलांनी भर बैठकीमध्ये कृष्णा नदीचा पाणी अडवल्याच्या कारणातून संताप व्यक्त करत पाणी अडवणारे हे कोण ? असा निशाणा मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर साधला.
बीएमसी अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांना दीपावली सणानिमित्त प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याबाबत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लेखी निर्देश दिलेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.