Mahua Moitra News Sarkarnama
देश

Lok Sabha : ‘त्यांनी वस्त्रहरण सुरू केलंय, आता महाभारत..!’ महुआ मोईत्रा प्रकरणी मोठी घडामोड

Rajanand More

Ethics Committee Report : पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणी शिस्तपालन समितीचा अहवाल आज लोकसभेत सादर करण्यात आला. या वेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ घातला. त्यानंतर लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, अहवाल सादर करण्यापूर्वी मोईत्रा यांनी माध्यमांशी बोलताना ‘उन्होंने वस्त्रहरण शुरू कर दिया है और अब आप महाभारत का रण देखेंगे,’ अशी भावना व्यक्त केली होती.

शिस्तपालन समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी विरोधकांच्या गदारोळातच अहवाल सादर केला. मागील अनेक दिवसांपासून या अहवालावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. अहवाल लोकसभेत (Lok Sabha) सादर करण्यापूर्वीच तो माध्यमांपर्यंत सरकारने पोहाेचवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. (Mahua Moitra Ethics Committee Report Tabled)

अहवालामध्ये मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस  केल्याचे समजते. मात्र, समितीने नेमकी काय शिफारस केली आहे, हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही; पण खासदारकी रद्द करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. तसे संकेत विरोधी पक्षातील काही नेत्यांनीही दिले आहेत. (Cash for query case)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अहवाल लोकसभेत सादर केल्यानंतर तृणमूलच्या सदस्यांसह विरोधी बाकांवरील सर्व खासदारांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. महिलांचा अपमान बंद करा, अशा घोषणा देण्यात आल्या. तृणमूलचे सदस्य अध्यक्षांसमोरील जागेत पोहाेचले. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

अहवाल सादर होण्याआधी माध्यमांशी बोलताना महुआ मोईत्रा म्हणाल्या, ‘मां दुर्गा आ गई है, अब देखेंगे...जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है. उन्होंने वस्त्रहरण शुरू कर दिया है और अब आप महाभारत का रण देखेंगे,’ असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT