Covid-19 Vaccine Sarkarnama
देश

आता कोरोना लस मोफत नाही; तिसऱ्या डोससाठी मोजावे लागणार पैसे

देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर केंद्र सरकारने नागरिकांसाठी पहिले दोन डोस मोफत दिले आहेत.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाला (Vaccination) सुरूवात झाल्यानंतर केंद्र सरकारने नागरिकांसाठी पहिले दोन डोस मोफत दिले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांत पैसे देऊन डोस घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. पण आता तिसरा म्हणजे प्रिकॉशन डोस (Precaution dose) घेण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहे. मोफत लसीकरणाची सुविधा सध्यातरी बंद करण्यात आली आहे. तिसरा डोस केवळ खासगी लसीकरण केंद्रांमध्येच घेता येणार आहे, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (Corona vaccine)

खाजगी लसीकरण केंद्रांवर 18 वर्षांवरील वयोगटासाठी कोविड (Covid 19) प्रतिबंधक लसींची खबरदारीचे (प्रिकॉशन डोस) डोस उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी लसीकरण केंद्रांवर 10 एप्रिल पासून 18 वर्षांवरील वयोगटाला खबरदारीचे डोस देण्यास सुरुवात होईल. 18 वर्षांहून अधिक वय असलेले आणि दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेले सर्वजण यासाठी पात्र असतील. ही सुविधा सर्व खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

तिसरा डोस यांना मिळणार मोफत

देशातील 15 वर्षांवरील वयोगटापैकी सुमारे 96 टक्के लोकांना किमान एक तर सुमारे 83 टक्के लोकांना आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आरोग्यसेवा कर्मचारी, आघाडीवर कार्यरत कर्मचारी आणि 60 वर्षांवरील लोकांना 2.4 कोटींहून अधिक खबरदारीच्या लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

12 ते 14 वयोगटातील 45% लोकांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. सरकारी लसीकरण केंद्रांद्वारे पात्र लोकसंख्येसाठी पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी तसेच आरोग्यसेवा कर्मचारी, आघाडीवर कार्यरत कर्मचारी आणि 60 वर्षांवरील वयोगटासाठी खबरदारीचा डोस देण्याचा मोफत लसीकरण कार्यक्रम सुरुच राहील तसेच त्याला गती दिली जाईल, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात लं आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या प्राथमिक अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 185.38 कोटींचा टप्पा पार केला आहे. वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत 2.11 कोटींपेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक डोस दिले आहेत. गेल्या 24 तासात 1 हजार 109 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकूण 4 लाख 53 हजार 582 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 79.29 कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.23 टक्के तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.24 टक्के आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT