Chhattisgarh Assembly Election-2023  Sarkarnama
देश

Chhattisgarh Assembly Election-2023 : छत्तीसगडमध्ये ‘या पाच’ गोष्टींनी भाजपला पोचवले विजयापर्यंत!

BJP News : एकरी २१ क्विंटल धान खरेदी 3100 रुपये प्रतिक्विंटल दराने केले जाईल. शेतकऱ्यांना एकरकमी मोबदला दिला जाईल.

Vijaykumar Dudhale

Raipur News : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. विधानसभेच्या ९० जागांपैकी ५३ जागांवर भारतीय जनता पक्ष, तर काँग्रेसही ३६ ठिकाणी आघाडीवर आहे. बहुमताच्या कल चाचणीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविल्याचे दिसत आहे. त्यामुळे छत्तीसगडमधून काँग्रेसची सत्ता जाणार, हे स्पष्ट होत आहे. भाजपच्या या अनपेक्षित विजयामागे ‘छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमी’ महत्त्वाची ठरली आहे. तसेच जाहीरनाम्यातील काही आश्वासने कामी आली आहेत.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 2023 साठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याला 'छत्तीसगडसाठी मोदींची हमी-2023' असे नाव दिले. जाहीरनाम्यात रोजगार, महागाई यांसह अनेक मुद्द्यांवर विशेष आश्वासने देण्यात आली होती. छत्तीसगडच्या जनतेने भाजपच्या विशेषतः मोदींच्या आश्वसनावर विश्वास व्यक्त होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छत्तीसगडमधील भाजपच्या विजयाची पाच कारणे

धान खरेदी आणि शेतकऱ्यांना बोनस

छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आले तर एकरी २१ क्विंटल धान खरेदी केले जाईल. ती धान खरेदी 3100 रुपये प्रतिक्विंटल दराने केली जाईल. शेतकऱ्यांना एकरकमी मोबदला दिला जाईल. काँग्रेस सरकार एकरी 20 क्विंटल धान घेत होते आणि 2800 रुपये दर देत होते. शेतकऱ्यांना एकरकमी मोबदला दिला जाईल, या आश्वासनाचा भाजपला मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे.

धार्मिक मुद्दे

छत्तीसगडमध्ये हिंदुत्व आणि आदिवासी भागात धर्मांतर हा मोठा मुद्दा होता. हिंदुत्व, धर्मांतर, लव्ह जिहाद या मुद्द्यांवर भाजपने काँग्रेस सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला. त्याला जनतेचा पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

महिलांसाठीच्या योजना ठरल्या महत्त्वपूर्ण

भाजपने महतारी वंदन योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. विवाहित महिलांना वार्षिक 12 हजार रुपये देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्याचवेळी 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासनही दिले.

भूपेश बघेल सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप

भूपेश सरकार यांच्यावर कोळसा वाहतूक, दारू घोटाळा, डीएमएफ, शेणखरेदी आणि गोठाण योजनेत भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजपने तापवला. त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाल्याचे दिसत आहे. महादेव बेटिंग ॲपवरूनही काँग्रेसला टीकेला सामोरे जावे लागले.

काँग्रेसमधील कलह

छत्तीसगड काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी होती. मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि उपमुख्यमंत्री टी. एस. सिंह देव यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला होता. मुख्यमंत्रिपदासाठी टी.एस. सिंह देव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम आणि प्रदेश प्रभारी कुमारी शैलजा यांच्यातील प्रचंड वादामुळे काँग्रेसला नुकसान सहन करावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT