R. Ashok-Siddaramaiah Sarkarnama
देश

Land Scam : मुख्यमंत्र्यांनी 4000 कोटींचा जमीन घोटाळा केला; विरोधी पक्षनेत्यांचा खळबळजनक आरोप

Vijaykumar Dudhale

Bangalore, 02 July : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भारतीय जनता पक्षाने गंभीर आरोप केला आहे. म्हैसूर विकास प्राधिकरणामध्ये सिद्धरामय्या यांनी तब्बल चार हजार कोटी रुपयांची जमीन लाटली, असा खळबळजनक आरोप भाजपचे नेते तथा विधान सभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने (BJP) केलेला हा जमीन गैरव्यवहाराचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी फेटाळून लावला आहे. भाजपच्या काळातीलच हा प्रकार आहे. माझ्या पत्नीच्या नावाने एक एकर 15 गुंठे जमीन आहे. ही जमीन माझ्या पत्नीच्या मेव्हण्याने घेतली आणि माझ्या पत्नीच्या नावाने केली आहे. ही जमीन खरेदी मी सत्तेत असताना केलेली नाही, असे स्पष्टीकरण सिद्धरामय्या यांनी दिले आहे.

सिद्धरामय्या यांच्यावर यापूर्वी वाल्मिकी विकास महामंडळात 187 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलेला आहे. विरोधी पक्षनेते अशोक यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, चार हजार कोटींच्या गैरव्यवहाराबाबत सिद्धरामय्या यांच्याकडे उत्तरे आहेत का? मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी, जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण तुमच्या पत्नीच्या नावाने झाले आहे. त्याचे समर्थन तुम्ही कसे करता?

आरोपी असलेल्या मुडा अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित केले नाही, तर त्यांची फक्त बदली करून तुम्ही हात धुवून घेतले आहेत, तुम्ही कोणाचे रक्षण करणार आहात? याची दखल घेण्यात आली आहे, असा सवालही अशोक यांनी विचारला आहे.

अशोक म्हणाले, जमीन गैरव्यवहाराचे चार हजार कोटी रुपयांचे प्रकरण सीबीआयकडे अथवा निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाकडे तुम्ही सोपवले पाहिजे. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन आयएएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात यावी. या गैरव्यवहारात तुमचा हात आहे की नाही?

भाजपचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, जमिनीचा व्यवहार हा भाजप सरकारच्या काळात झालेला आहे. मुडाने त्यावेळी कायद्यानुसार 50 :50 टक्के जमीन दिली जाईल, असे सांगितले हेाते. मुडाच्या अधिकाऱ्यांनी जमीन निश्चित करून त्याचे वाटप केलेले आहे. त्यावेळी मुडाने आम्हाला 50:50 च्या प्रमाणात जमीन देण्याचे कबूल केले होते, त्यांच्या कायद्यानुसार आम्हाला जमीन दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT