Supreme Court Hearing  Sarkarnama
देश

MLA Disqualification case : ...तर आम्हाला विधानसभा अध्यक्षांचे कान धरावे लागतील; सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Vijaykumar Dudhale

New Delhi : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (ता. १३ ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या कामाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशाचा कोणी अवमान करत असेल, तर आम्हाला त्यांचे कान धरावे लागतील, अशा कडक शब्दांत चंद्रचूड यांनी अध्यक्षांच्या वकिलांना सुनावले. (Decide MLA disqualification case before elections : Chief Justice)

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या सुनावणीत चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे वकील तथा देशाचे सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांना स्पष्ट शब्दांत आदेश दिले. विधानसभेचे अध्यक्ष न्यायालयाच्या निकालाची अशा प्रकारे अवहेलना करू शकत नाहीत. अध्यक्षांना कोणीतरी नीट समजावून सांगितलं पाहिजे. ते विवेकाने वागतील, असे आम्हाला मागील सुनावणीच्या वेळी वाटलं होतं. मात्र, ते हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत, असं दिसून येत नाही.

विधानसभेचे अध्यक्ष गेल्या जूनपासून हे प्रकरण फार गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. कारण तेव्हापासून या प्रकरणात कुठलीही हालचाल झालेली नाही. प्रकरण लांबणीवर टाकण्याचे कारण वेळापत्रक बनता कामा नये. आमदार अपात्रतेची सुनावणी म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडून केवळ फार्स बनू नये. त्यांनी या प्रकरणाची सुनावणी गांभीर्याने केली पाहिजे, अशी अपेक्षाही सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान व्यक्त केली.

राज्यांचे विधिमंडळ ही एक घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे आम्ही आमदार अपात्रतेप्रकरणी वेळापत्रक निश्चित करू शकलो नाही. विधानसभेचे अध्यक्ष जर नीट वागत नसतील, तर मात्र आम्हाला त्यांना जबाबदार धरावं लागेल. देशातील सर्व घटनात्मक व्यवस्थांचा आम्ही नितांत आदर करतो, पण कोणी जर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणार असतील, तर आम्हाला संबंधित व्यक्तीचे कान ओढावेच लागतील, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

आमदार अपात्रतेच्या प्रकरणाला विलंब लावून ते निष्प्रभ करणे योग्य नाही. निवडणुकीच्या अगोदरच या प्रकरणाचा निर्णय लागला पाहिजे. त्यामुळे पुढच्या सुनावणीच्या वेळी म्हणजेच येत्या मंगळवारी तुमच्या विधानसभा अध्यक्षांना निश्चित असे एक वेळापत्रक घेऊन यायला सांगा. कारण न्यायालयाच्या निकालाचा सन्मान राहिला पाहिजे. त्याचीच चिंता आम्हाला लागून राहिलेली आहे, असेही चंद्रचूड यांनी तुषार मेहतांना स्पष्ट केले.

दरम्यान, मागील सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, आमदाराचे म्हणणे एकत्रित ऐकून घ्यायचे, की प्रत्यकाचे स्वतंत्रपणे ऐकायचे, याबाबत नार्वेकर निर्णय घेणार होते, त्याआधीच सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांचे कान टोचले आहेत. आता तरी नार्वेकर तातडीने सुनावणी घेऊन निर्णय देतील का, अशी विचारणा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT