kolhapur News : कोल्हापूर भाजपमध्ये सुरू असलेला नव्या-जुन्याचा वाद प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर संपुष्टात आला आहे. जुन्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन होऊन पुन्हा पक्षबांधणीसाठी जिल्ह्यात दौरे आयोजित केले आहेत. तालुका स्तरावरील निष्ठावंत जुन्या पदाधिकाऱ्यांचा वाद संपुष्टात आणण्यासाठी आता भाजपचे जुनेच कार्यकर्ते कंबर कसणार आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात नवे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवत प्रदेशाध्यक्षांवर छाप टाकण्याचा प्रयत्न केला. एकंदरीतच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना जिल्ह्यातील भाजपचा वाद संपुष्टात आणण्यात यश आले आहे. (Chandrashekhar Bawankule settled the dispute in Kolhapur BJP)
भारतीय जनता पक्षाने कोल्हापूर जिल्ह्याची नवी कार्यकारिणी निवडल्यानंतर पक्षांतर्गत वाद उफाळला होता. जुने निष्ठावंत आणि नवे कार्यकर्ते यांच्यात संघर्ष सुरू होता. त्यावरून भाजपचे माजी संघटन मंत्री बाबा देसाई यांनी आजरा गडहिंग्लज आणि शिरोळ तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर भाजपमधील जुन्यांची बैठक बावनकुळे यांनी घेतली. जुन्या पदाधिकाऱ्यांची भूमिका लक्षात घेतल्यानंतर बावनकुळे यांनी सर्व काही सुरळीत होईल, अशी ग्वाही जुन्या पदाधिकाऱ्यांना दिली. सोबत जुन्या पदाधिकाऱ्यांवर पक्ष संघटनेची जबाबदारी देत जिल्हाभर दौरे करण्याची सूचनाही केली.
नव्यांचा ताकद दाखवण्याचा प्रयत्न
मनोमिलनाच्या बैठकीनंतर जुने पदाधिकारी पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून कामाला लागले आहेत. पुढील काही काळात ते जिल्ह्यात दौरा करून जुन्या पदाधिकाऱ्यांचा वाद कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात जुने पदाधिकारी कमी आणि नव्या पदाधिकाऱ्यांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. गडहिंग्लज आणि कोल्हापूर शहरात झालेल्या कार्यक्रमात नव्या पदाधिकाऱ्यांनी, विधानसभा आणि महापालिकेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.
चंद्रकांतदादा, समरजितसिंह 'टार्गेट'वर
कोल्हापूर भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर जुन्या पदाधिकाऱ्यांनी थेट उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना टार्गेट केले होते. मंत्री पाटील यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना आमच्या डोक्यावर बसवले, तर समरजितसिंह घाटगे हे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून कोल्हापुरातील पक्ष मोडकळीस निघाला आहे, असा आरोप माजी संघटन मंत्री बाबा देसाई यांनी केला होता. जुन्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणी निवडीत नगण्य स्थान देताना जे पार्टीचे लोकं नाहीत, ते पदाधिकारी बनले आहेत. नवीन कार्यकरिणी निवड रद्द करून जिल्ह्यात यावे, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना केली होती.
दुफळी कायम
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कोल्हापूर भाजपमधील अंतर्गत वाद संपुष्टात आणला असला तरी जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांची मने अजूनही जुळलेली नाहीत. काही ठरावीक दोन व्यक्तींमुळे भाजपमधील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नेहमी डावललं जात असल्याचा आरोप आजही आहे. भाजपवरून एकसंघ दिसत असला तरी कार्यकर्त्यांमध्ये आजही दुफळी पाहायला मिळते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यापूर्वी भाजपचे काही कार्यकर्ते इतर पक्षांच्या मदतीला धावून जातात, असा आरोपही त्यावेळी करण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.