ED Action On Sanjay Singh Sarkarnama
देश

ED Action On Sanjay Singh : सकाळ सकाळी आप खासदार संजय सिंहांच्या घरी ईडी दाखल; मद्य घोटाळाप्रकरणी छापेमारी!

Chetan Zadpe

Delhi News : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पथक आज सकाळीच आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या निवासस्थानावर पथक छापे टाकत आहे. दिल्लीतील हिंदुस्तान टाईम्स या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात संजय सिंह यांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात येत आहेत. यापूर्वी संजय सिंह यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले होते. मद्य घोटाळ्याच्या आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव होते.

वित्त सचिवांना पत्र लिहिले -

या वर्षाच्या सुरुवातीलाच खासदार संजय सिंह यांनी वित्त सचिव टी. व्ही. सोमनाथन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, 'ईडी संचालक आणि सहायक संचालकांनी जाणूनबुजून कथित मद्य घोटाळ्याशी त्यांचे नाव जोडले, त्यांची सार्वजनिक प्रतिमा डागाळली आणि त्यांची बदनामी झाली.' सिंह म्हणाले होते की, 'दिनेश अरोरा यांच्या विधानाच्या आधारे त्यांचे नाव जोडण्यात आले आहे. अधिकार्‍यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांची सार्वजनिक प्रतिमा खराब केल्याचा आरोप सिंग यांनी केला होता. इतकेच नाही तर त्यांच्यावर खटला चालवण्याची मागणी केली होती.

सिंग यांनी पत्रात म्हटले आहे की, 'त्यांनी आधीच अधिकार्‍यांना उघड आणि जाहीर माफी मागण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आप नेत्याचे नाव ईडीच्या आरोपपत्रात चार वेळा आले आहे, त्यापैकी एक संदर्भ चुकीचा होता आणि अनवधानाने टाइप करण्यात आला होता. एके ठिकाणी राहुल सिंह यांच्याऐवजी संजय सिह यांचे नाव होते, जे त्यावेळी उत्पादन शुल्क आयुक्त होते. सध्या ईडी संजय सिंह यांच्या निवासस्थानाची झडती घेत आहे.

संजय सिंहांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी -

ईडीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, "सिंग यांच्याशी संबंधित काही लोकांचा परिसरदेखील शोध घेतला जात आहे. या प्रकरणी ईडीने सिंह यांचे कर्मचारी आणि त्यांच्याशी संबंधित लोकांची चौकशी केली. दिल्ली सरकारच्या 2021-22 मद्यविक्री धोरणाने मद्य व्यापाऱ्यांना परवाना देण्यासाठी परवानगी दिली आणि त्यासाठी लाच दिल्याचा आरोप करणाऱ्या काही डीलर्सची बाजू घेतली, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाचे आप ने जोरदार खंडन केले. नंतर हे धोरण रद्द करण्यात आले आणि दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरने सीबीआय चौकशीची शिफारस केली, त्यानंतर ईडीने पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवला.

सत्येंद्र जैन आणि सिसोदिया यांच्यावरही ईडीचे छापे -

ईडीने आप नेत्याच्या घरावर छापा टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक पक्षाचे नेते केंद्रीय एजन्सीच्या रडारखाली आले आहेत. ईडीने गेल्या वर्षी मे महिन्यात तत्कालीन आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. आजारपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सध्या अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य धोरणात कथित घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अटक झाल्यापासून सिसोदिया तुरुंगात आहेत.

काय आहे मद्य दारू घोटाळा?

दिल्ली सरकारच्या 2021-22 च्या नवीन मद्य धोरणाशी हा घोटाळा जोडला गेला आहे. केजरीवाल सरकारने 17 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्लीत नवीन मद्य धोरण लागू केले होते. या धोरणांतर्गत मद्य व्यवसाय पूर्णपणे खासगी हातात गेला. सरकारने नवीन धोरण आणण्यासाठी माफिया राजवट संपवण्याचा युक्तिवाद केला होता. त्यामुळे महसुलात वाढ होईल, असा दावाही करण्यात आला.

मात्र, हे धोरण लागू झाल्यानंतर त्याचे परिणाम सरकारच्या दाव्याच्या उलट झाले आहेत. महसूल बुडाल्याने दिल्ली सरकार चौकशीच्या फेऱ्यात आले. यानंतर केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी यात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांना कळवले. अहवालाच्या आधारे, एलजीने 22 जुलै 2022 रोजी सीबीआय चौकशीची मागणी केली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT