India Alliance Sarkarnama
देश

Election Results 2023 : काँग्रेसच्या पराभवाने 'इंडिया'तील घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढणार

INDIA Alliance : चार राज्यांतील पराभवाने काँग्रेसची इंडिया आघाडीतही पीछेहाट होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Assembly Elections Vote Results 2023 : लोकसभा निवडणुकीआधी झालेल्या चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशाचा मूड भाजपसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा काँग्रेससह इंडिया आघाडीला मोठा झटका मानला जात आहे. या निकालांमुळे काँग्रेस बॅकफूटवर गेल्याने इंडिया आघाडीची लोकसभेची गणिते बदलणार असून, घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. काँग्रेसला एक पाऊल मागे जात प्रादेशिक पक्षांना अधिक बळ द्यावे लागणार असल्याची चर्चा आहे. (Five State Assembly Elections Result in Marathi)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत होती, तर तेलंगणातून भाजपला फारशी अपेक्षा नव्हती. तिथे काँग्रेस (Congress) आणि बीआरएस अशी थेट लढत होती. आजच्या निकालांमुळे तेलंगणाने काँग्रेसला काहीसा दिलासा दिला असला तरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा झटका मानला जात आहे. या राज्यांचे निकाल काँग्रेसच्या बाजूने आले असते तर लोकसभेसाठी इंडिया आघाडीच्या नेतृत्वाचा दावा अधिक बळकट झाला असता.

चार राज्यांतील पराभवाने काँग्रेसची इंडिया आघाडीतही पीछेहाट होणार आहे. मागील काही निवडणुकींचे निकाल तसेच काही राज्यांमधील प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व पाहता काँग्रेसला या पक्षांना बळ देण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. भाजप आणि काँग्रेस थेट लढत असेल तिथे कौल भाजपच्या बाजूने जात असल्याचे लोकसभेच्या निवडणुकीतील चित्र आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या सहा डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. प्रादेशिक पक्ष अधिक आक्रमक होतील, यात शंका नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्य प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसशी जागावाटपाचा प्रस्ताव ठेवला होता, पण काँग्रेसने हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यावरून या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव प्रचंड नाराज झाले होते. आघाडीच्या बैठकीत ही नाराजी उघडपणे मांडली जाऊ शकते. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बिहारमध्ये जेडीयू, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, दिल्ली, पंजाबमध्ये आप, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना ( उद्धव ठाकरे) यांंसह इतर पक्षांना झुकते माप द्यावे लागणार आहे.  

महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसला अधिक जागा लढवायला मिळतील अशी स्वप्नं पडत आहेत, पण चार राज्यांतील निकालाने काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. उत्तर प्रदेशातही अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, बिहारमध्ये नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांना झुकते माप देण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र निर्माण होईल, असा जाणकारांचे म्हणणे आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT