Rajasthan Assembly Results 2023 News update : राजस्थानात दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा काँग्रेस पुनरागमन करून इतिहास निर्माण करील, अशी शक्यता वर्तवली जात होती. याचे कारण होते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नेतृत्व, त्यांनी राबवलेल्या योजना. मात्र प्रगल्भ, जादुई नेतृत्व समजल्या जाणाऱ्या गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्याशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. बंड केल्यामुळे काँग्रेसने राजेश पायलट यांचा अपमान केला होता आणि आता काँग्रेस सचिन पायलट यांनाही शिक्षा देत आहे, असे वक्तव्य प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून काँग्रेसचे पॅकअप केले. रविवारी मतमाेजणी सुरू झाली आणि त्याचा प्रत्यय आला.
सचिन पायलट यांनी मोदी यांचे वक्तव्य धुडकावून लावले होते. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. मात्र, सचिन पायलट यांच्या नाराजीचा फटका काँग्रेसला निश्चितपणे बसला आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचे संकेत मिळाले होते. निवडणुकीच्या आधी अशोक गेहलोत यांनी विविध मोफत, सवलतींच्या योजनांची घोषणा केली होती, त्याचा फायदा काँग्रेसला झाला नाही. काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, त्यावेळेसपासून सचिन पायलट यांची नाराजी होती. त्याकडे लक्ष देण्याऐवजी बहुमताच्या जोरावर गेहलोत यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. काँग्रेस पक्षश्रेष्ठीही गेहलोत यांच्यासमोर हतबल असल्याचे दिसून आले. गेहलोत यांच्या अहंकाराची किंमत काँग्रेसला मोजावी लागली आहे. याचे कारण असे की राजस्थान भाजपमध्ये एकवाक्यता नव्हती. गेहलोत-पायलट वाद झाला नसता तर काँग्रेस पक्ष राजस्थानात इतिहास रचू शकला असता. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी जी एकजूट दाखवली होती, ती गेहलोत-पायलट यांना दाखवता आली नाही.
गेल्या निवडणुकीत गुर्जर समाजाची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळाली होती. त्या निवडणुकीत सचिन पायलट यांनी वसुंधरा राजे यांच्या सरकारविरोधात आक्रमक मोहीम उघडली होती. गुर्जर समाज पायलट यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळे 21 जागांवरून काँग्रेसने शंभरी गाठली होती. असे असूनही गेहलोत यांनी पायलट यांना बाजूला सारले. या निवडणुकीच्या आधी पक्षश्रेष्ठींनी गेहलोत-पायलट यांची हातमिळवणी केली. मात्र, त्यांची मने जुळली नाहीत. गेहलोत आणि पायलट यांच्यातील वादाचे चित्र एक्झिट पोलमध्ये उतरले होते. रविवारी मतमोजणी सुरू झाली आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. 1989 नंतरची ही पहिली अशी निवडणूक होती, ज्यात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत यंदा एकट्या वसुंधरा राजे शिंदेच नव्हे तर खासदार दिया कुमारी, राज्यवर्धन सिंह राठोड, बाबा बालकनाथ यांचीही नावे आहेत. त्यामुळे वसुंधरा राजे नाराज होत्या. प्रचाराच्या सुरुवातीला त्या सक्रिय नव्हत्या. शेवटच्या टप्प्यात सक्रिय झाल्या. भाजपमधील या गटबाजीचा फायदा काँग्रेसला घेता आला असता, मात्र गेहलोत-पायलट वादात काँग्रेसने इतिहास घडवण्याची संधी गमावली.
सचिन पायलट यांना बंडाचा वारसा आहे. त्यांचे वडील राजेश पायलट यांनीही अनेक वेळा बंड केले होते. मात्र, त्यांनी काँग्रेस कधीच सोडली नाही. सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर काँग्रसने त्यांचे उपमुख्यमंत्रिपद आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले होते. त्यावेळी गेहलोत यांनी त्यांच्याविरोधात अतिशय खालच्या पातळीवरील टीका केली होती. पायलट यांनी त्यालाही संयमाने उत्तर दिले होते. मला कामाविषयी मुद्दे उपस्थित करण्याचा अधिकार आहे. ते काहीही बोलत असले तरी मी त्यांचा सन्मान करतो, असे उत्तर सचिन पायलट यांनी दिले होते. या प्रकरणानंतर राजस्थानमधून काँग्रेसचे सरकार जाणार हे जवळपास निश्चित झाले होते. कारण काँग्रेसने गुर्जर समाजाचा रोष ओढावून घेतला होता.
गुर्जर समाजाचे जवळपास ३२ मतदारसंघांत प्राबल्य आहे. गेल्या निवडणुकीत गुर्जर समाजाने काँग्रेसला एकगठ्ठा मतदान केले होते. मात्र, सचिन पायलट यांचे बंड आणि त्याला गेहलोत यांनी ज्याप्रकारे उत्तर दिले, त्यामुळे गुर्जर समाजाची एकगठ्ठा मते मिळण्याची शक्यता दुरावली होती. पंतप्रंधान नरेंद्र मोदी यांनी या परिस्थितीचा अचूक लाभ घेतला. राजेश पायलट यांनी बंड केले होते. त्यामुळे आता त्यांच्या मुलाचा, म्हणजे सचिन पायलट यांचा काँग्रेसकडून अपमान केला जात आहे, अशी टीका मोदी यांनी एका प्रचार सभेत केली. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. गुर्जर मतदार काँग्रेसपासून दुरावले. याचा परिणाम मतदानावर झाल्याचे दिसून येत आहे. दुपारी साडेबारापर्यंत भाजप ११० जागांवर आघाडीवर होता, तर काँग्रेस ७३ जागांवर आघाडीवर होता. अंतिम निकाल हाती येईपर्यंत हे आकडे थोडे पुढे-मागे होऊ शकतात, मात्र ही आघाडी मोडणे काँग्रेससाठी जवळपास अशक्य दिसत आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.