Mamata Banerjee, Rahul Gandhi, Arvind Kejriwal Sarkarnama
देश

India Alliance : पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून राहुल गांधींना हटवण्यासाठी केजरीवाल अन् ममतांचा चक्रव्यूह!

Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी हा दावा केला आहे.

Rajanand More

Rahul Gandhi : इंडिया आघाडीची मंगळवारी महत्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण, याबाबत चर्चा झाल्याचे समजते. तसेच राज्य पातळीवर जागावाटपाबाबत निर्णय घेण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. या बैठकीत पंतप्रधान पदासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव पुढे केल्याची चर्चा आहे. त्यावरून भाजपने टोला लगावला आहे.

खर्गे हे देशाचे पहिले दलित पंतप्रधान (Prime Minister) असतील, असे दोन्ही नेत्यांनी म्हटल्याचे समजते. पण यावर सविस्तर चर्चा झाली नाही. बैठकीत खर्गे यांचे नाव सुचविण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाजूला करण्यासाठीच खर्गे यांचे नाव सुचविण्यात आल्याचा दावा गिरीराज सिंह यांनी केला आहे.

इंडिया आघाडीतील या घडामोडींवर बोलताना गिरीराज सिंह म्हणाले, ‘राहुल गांधी असताना खर्गे हे पंतप्रधान पदाचे दावेदार नसतील, याची जाणीव केजरीवाल आणि बॅनर्जी यांना आहे. या दोघांनी राहुल गांधी यांना या शर्यतीतून हटविण्यासाठी चक्रव्यूह केला आहे. यामध्ये त्यांनी खर्गे आणि गांधी या दोघांनाही अडकविले आहे.’

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही खर्गे यांच्या नावाची चर्चा झाल्याचे बुधवारी मान्य केले. याबाबत त्यांनी काँग्रेसमध्ये आधी चर्चा होईल, असे म्हटले आहे. इंडिया आघातील नेत्यांतसह खर्गे यांनीही बैठकीनंतर बोलताना पंतप्रधान पदाबाबत आताच निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आधी निवडणूक जिंकण्याला प्राधान्य असेल. त्यानंतर सर्व गोष्टी ठरविल्या जातील, असेही खर्गे यांनी सांगितले आहे.  

दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली. ते म्हणाले, देशाची विकास रोखण्यासाठी इंडिया आघाडीच्या बैठका होत आहेत. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. पण मोदींना हरवणे पोरखेळ नाही. मोदी हे देश आणि लोकांसाठी काम करत आहेत, असे आठवले यांनी सांगितले.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT