India announces tough decision against Pakistan : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून केल्या गेलेल्या भ्याड हल्ल्याने देशभरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. जगभरातून या हल्ल्याचा निषेध नोंदवला जात आहे. त्यानंतर आता भारतानेही या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज(बुधवारी) कॅबिनेट सुरक्षा समितीची(CCS) बैठक जवळपास अडीच तास चालली. यामध्ये मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती ही बैठक संपल्यानंतर परराष्ट्र विभागाकडून पत्रकारपरिषदेतून देण्यात आली.
-सिंधू जल कराराला स्थगिती
-पाकिस्तानी नागरिकांना आता व्हिसा मिळणार नाही.
-अटारी-वाघा बॉर्डर तत्काळ प्रभावाने बंद करणार
-पाकिस्तान हायकमिशनच्या अधिकाऱ्यांना परत जाण्याचे आदेश
-पाकिस्तानी नागिरकांनी ४८ तासांत भारत सोडावा
पंतप्रधान मोदींच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या या सीसीएस बैठकीत मोठे निर्णय घेतले गेले. ज्यामध्ये पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करणे, सिंधू जल करार स्थिगती, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद करण्यासारख्या निर्णयांचा समावेश आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती देताना सांगितले की, सीसीएसने या बैठकीत या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आणि सीमेपलीकडील संबंधांच्या मुद्य्यावर सखोल चर्चा केली. त्यांनी सांगितले की, बैठकीत अनेक निर्णय घेतले गेले, ज्यामध्ये सिंधू जल करार स्थगित करण्यात आला आहे. शिवाय, अटारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय झाला आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यास बंदी असणार आहे आणि त्यांना व्हिसाही मिळणार नाही. जे कुणी पाकिस्तानी भारतात आहेत, त्यांच्याकडे परत जाण्यासाठी केवळ ४८ तासांचा कालावधी आहे.
१.१९६०चा सिंधू जल करार स्थगित राखला जाईल. जोपर्यंत पाकिस्तान विश्वसनीय आणि अपरवर्तनीयरित्या सीमेपलीकडील दहशतवादास पाठिंबा देणे थांबवत नाही.
२. अटारी बॉर्डर तत्काळ प्रभावाने बंद केली आहे. जी लोकं वैध आधारासह पलीकडे गेले आहेत, ते १ मे २०२५च्या आधी त्याच मार्गाने परत येऊ शकतात.
३. सार्क व्हिसा एक्झेम्पशन स्कीम व्हिसाखाली पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना भूतकाळात जारी केलेले कोणतेही SVES व्हिसा रद्द मानले जात आहेत. सद्यस्थितीस SVES व्हिसाखाली भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांचा कालावधी असणार आहे.
४. नवी दिल्लीत पाकिस्तानी उच्चआयुक्तलायातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना अनावश्यक व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्याकडे भारत सोडण्यास एका आठवड्याचा कालावधी आहे.
५. भारत इस्लामाबादेतील आपल्या भारतीय उच्चआयुक्तालयातील संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना परत बोलावणार. संबंधित उच्चआयुक्तालयातील पदं रद्द मानली जातील.
याशिवाय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, सीसीएसने संपूर्ण सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला आणि सर्व सैन्य दलांना उच्च सतर्कता राखण्याचे निर्देश दिले. या हल्ल्यातील गुन्हेगारांना न्यायाच्या चौकटीत आणले जाईल आणि त्यांच्या प्रायोजकांना जबाबदार धरले जाईल असा निर्णय घेण्यात आला. तहव्वूर राणाच्या अलिकडील प्रत्यार्पणाप्रमाणेच भारत दहशतवादी कृत्ये करणाऱ्या किंवा ते शक्य करण्यासाठी कट रचणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सतत प्रयत्न करेल.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.