Thalapathy Vijay political strategy  Sarkarnama
देश

Joseph Vijay: ठरलं! जोसेफ विजय यांचा उद्या शपथविधी; स्टेडियममध्ये येणार गर्दीचा महापूर? 'या' तारखेला बहुमत करावं लागणार सिद्ध

बहुमताच्या आकड्याचं पत्र घेऊन जोसेफ विजय यांनी शनिवारी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं.

Amit Ujagare

Joseph Vijay Swearing in Ceremony : तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे सर्वोसर्वा जोसेफ विजय यांचा उद्या (१० मे) शपथविधी पार पडणार आहे. बहुमताच्या आकड्याचं पत्र घेऊन त्यांनी शनिवारी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं. त्यानुसार, आता उद्या विजय यांचा शपथविधी पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा भव्य स्वरुपात होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यासाठी तसं भव्य ठिकाणंही निश्चित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर राज्यपालांनी विजय यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचं आवाहनही केलं आहे.

राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची जोसेफ विजय यांनी आज चौथ्यांदा भेट घेतली. संपूर्ण बहुमताचा आकडा तुमच्याकडं असल्याचं अधिकृत पत्र माझ्यासमोर आणावं तेव्हाच तुम्हाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं जाईल, अशी भूमिका राज्यपालांनी घेतली होती. त्यासाठी गेल्या चार दिवसांपासून जोसेफ विजय यांनी टीव्हीके या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून चार वेळा राज्यपालांसमोर सत्तास्थापनेचा दावा केला. पण तीन वेळा त्यांच्या पदरी निराशाच पडली, कारण त्यांच्याजवळ पूर्ण बहुमताचा आकडा नव्हता. पण आता अखेर ११८ या बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव झाल्यानं आणि ती राज्यपालांनी मान्य केल्यानं आता जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, १० मे रोजी सकाळी १० वाजता म्हणजेच उद्या तमिळनाडूची राजधानी चेन्नईतील स्टेडियममध्ये हा जोसेफ विजय यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा भव्य स्वरुपात होण्याची शक्यता आहे. कारण तमिळनाडूमधील ही ऐतिहासिक घटना असून राज्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच कुठल्या द्रविडी पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्ष इथं सत्ता स्थापन करणार आहे. त्यातची अभिनेता असलेल्या आणि नंतर राजकारणी बनलेल्या जोसेफ विजय यांनी ही किमया साधली आहे. त्यामुळं विजय यांची जनसामान्यातील लोकप्रियता पाहता त्यांच्या शपथविधीसाठी मोठा जनसमुदाय लोटण्याची शक्यता आहे. त्यामुळेच स्टेडियममध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

त्याचबरोबर राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर त्याचवेळी जोसेफ विजय यांना येत्या १३ मे रोजी अर्थात येत्या बुधवारी तमिळनाडूच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यामुळं १३ मे रोजी तामिळनाडू विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल. यानंतर सभागृहात नियमानुसार, बहुमत चाचणी पार पडेल, त्यानंतर राज्यात स्थिर सरकार स्थापन झाल्यावर शिक्कामोर्तब होईल.

टीव्हीकेला सत्तास्थापनेसाठी काँग्रेस, भाकप, माकप, व्हीसीके या पक्षांनी अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये टीव्हीकेकडं १०७, काँग्रेस -५ , भाकप - २, माकप - २ आणि व्हीसीके - २ अशा ११८ जागांचं बहुमत प्राप्त झालं आहे. तामिळनाडूत सत्तास्थापनेसाठी २३४ जागांच्या विधानसभेसाठी ११८ इतकं बहुमताचा आकडा पार गाठावा लागतो.

SCROLL FOR NEXT