New Delhi, 23 July : नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठी पाठिंबा देऊन हातभार लावणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना अर्थसंकल्पातून ‘रिटर्न गिफ्ट’ देण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. बिहारमध्ये रस्ते उभारणी प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपये देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज लोकसभेच्या नव्या सभागृहात मांडला. त्यात शेतकरी, युवक आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर मोदी सरकारच्या (Modi Government) तिसऱ्या टर्मसाठी पाठिंबा देणारे ‘एनडीए’तील सहकारी यांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आंध्र प्रदेशला विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशला तब्बल 15 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. हे पंधरा हजार कोटी रुपये यावर्षीच आंध्राला देण्यात येणार आहेत. तसेच पुढील वर्षीही अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे.
आंध्र प्रदेशमधील पोलावरम सिंचन योजना पूर्ण करण्याची ग्वाहीही अर्थसंकल्पातून मोदी यांनी चंद्राबाबूंना दिली आहे. विशाखापट्टणम-चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील कोपर्थी भागात पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. आर्थिक विकासासाठी भांडवली गुंतवणुकीसाठी एक वर्षापर्यंत अतिरिक्त वाटप केले जाणार आहे. रायलसीमा, प्रकाशम आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशातील मागास भागांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबरच नीतिशकुमार यांनाही मोदी सरकारने खूष केले आहे. बिहारमधील रस्ते जोडणी प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. यातून पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर द्रुतगती मार्गाचा विकास केला जाणार आहे. बोधगया, राजगीर, वैशाली आणि दरभंगा रस्ते जोडणी प्रकल्पही विकसित केले जातील. बक्सरमधील गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल बांधण्यात येणार आहे.
सुमारे 21 हजार 400 कोटी रुपये खर्चून बिहारमध्ये ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पिरपेंटी येथे 2400 मेगावॉटचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालयांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. बँकांकडून बाह्य अर्थसाहाय्य घेण्याच्या बिहार सरकारच्या विनंतीवर तातडीने निर्णय केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.