New Delhi News: देशभरात खळबळ उडवून दिलेल्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणात सुरू असलेल्या सीबीआयच्या तपासात दिवसागणिक रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. या प्रकरणामुळे शिक्षणव्यवस्था,यंत्रणांच्या कार्यपध्दतीवरच शंका उपस्थित करण्यात येऊ लागली आहे. तसेच केंद्र सरकारवरही विरोधकांकडून आरोपांचे शिंतोडे उडवण्यात आले. नीट पेपरफुटी प्रकरणाची झळ बसल्यानंतर आता मोदी सरकार धाडसी निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची समजले जाणारी 'नीट'ची फेरपरीक्षा येत्या 21 जून रोजी होत आहे. पेपरफुटीमुळे होरपळलेल्या केंद्र सरकारनं आता ही फेरपरीक्षा पारदर्शक,सुरक्षित आणि तितकीच योग्य पद्धतीनं पार पाडण्यासाठी सरकारनं थेट भारतीय लष्करासह वायुदलाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह शैक्षणिक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ही बैठक पार पडली. याच बैठकीत नीटची परीक्षेचा पेपरफुटीसारखा गंभीर प्रकार टाळण्यासाठी भारतीय लष्कर आणि वायुदलाची मदत घेण्याबाबतचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.
नीटच्या फेरपरीक्षा नियोजनासंदर्भात दिल्लीत गुरुवारी (ता.28) अत्यंत उच्चस्तरीय आणि महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान,केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया,एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह,सीबीएसईचे वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी हजर होते.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. नीटसारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेतील वाढते गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आली आहे.
गृह आणि संरक्षण खात्यानं 'नीट'सारख्या परीक्षेसाठी लक्ष घातलं आहे. लष्कर आणि वायुलाच्या मदतीनं परीक्षा केंद्रांवर पेपर पोहोचण्यापासून ते परीक्षा संपेपर्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याची शक्यता आहे. 21 जूनला होत असलेल्या फेरपरीक्षेच्या पेपर वाहतुकीदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठीच लष्करासह वायुदलाच्या विशेष विमानांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.
सीबीआयकडून नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई सुरू असून आणखी दोन आरोपींना अटक केली आहे.त्यामुळे शिवराज मोटेगावकरसह आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 वर पोहोचली आहे.
सीबीआयच्या पथक या लॉकर्समध्ये मोठी रोख रक्कम, बेकायदेशीर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि बँक व्यवहारांची माहिती शोधत आहे. या आंतरराज्यीय पेपर लीक रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज सीबीआयच्या हाती लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.