Robert Vadra's Controversial statement : जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. ज्यामुळे अवघा देश हादरला आहे, शिवाय सर्वचस्तरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला जात असून, संतप्त भावना उमटत आहेत. भारतानेही या हल्ल्याचा बदला घेतला जाईल असा सूचक इशारा दिलेला आहे.
दरम्यान, हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पर्यटकांना हल्लेखोर दहशतवाद्यांनी आधी त्यांचे नाव, धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्याचे समोर आले आहे. ही बाब समोर आल्यानंतर देशभर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावाई आणि खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरणही अधिकच तापलं आहे. भाजपने रॉबर्ट वाड्रांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसला धारेवर धरत, जाब विचारला आहे.
रॉबर्ट वाड्रा यांनी एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, मी आपल्या सरकारबाबत अतिशय चिंतेत आहे. सर्वात आधी या हल्ल्यात जीव गमावलेल्या २८ जणांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. याचबरोबर अनेकजण जखमी देखील झाले आहेत, मी त्यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त करतो आणि अपेक्षा करतो की ते लवकरात लवकर बरे होतील.
पुढे वाड्रा म्हणतात, आपला आवाज उठवण्यासाठी दहशतवादी हल्ले करणे कमकुवत पद्धत आहे. असं मला वाटतं. यामुळे त्यांचा मुद्दा समोर येत नाही, तर ते निष्पाप लोकांना मारत आहेत. ही एक कमकुवत पद्धत आहे. मला वाटतं की सर्व सरकाराना एकत्र येवून अशाप्रकारच्या घटना आणि संघटनांविरोधात लढायला हवं. तथापि याबद्दल माझे जरा वेगळे मत आहे. ही काँग्रेस आणि माझ्या कुटुंबाची विचारसरणी नाही.
रॉबर्ट वाड्रा म्हणाले, आपण बघतो की आपल्या देशात सरकार हिंदुत्वाबाबत बोलते. जेव्हा तुम्ही मशिदीबाबत बोलतात किंवा तुम्ही अशी किंवा तशी प्रार्थना करू शकत नाही, असं म्हणतात तेव्हा अल्पसंख्याकांना अस्वस्थ वाटते. अशाप्रकारची गोष्टी अराजकता, सांप्रदायिकता वाढवतात. जर तुम्ही ही दहशतवादी घटना बघितली तर ते लोक पर्यटकांचे आयडी चेक करत होते. ते असं का करत होते, कारण आपल्या देशात हिंदू , मुस्लीम आणि ख्रिश्चनांमध्ये एक विभाजन झालेलं आहे.
याशिवाय, मी व्हिडीओ फुटेज बघितले आहेत की, चर्च जाळली गेली आहेत. काय घडत आहे? आपल्या देशात सांप्रदायिक भावना का दुखावल्या जात आहेत? हे फूट निर्माण करत आहेत. अशा संघटनांना वाटत आहे की मुस्लिमांसाठी हिंदू धोका आहेत. आपल्याला हे नकोय. तुम्ही बहुतांश हिंदू-मुस्लिमांना विचारा, ते एकमेकांची मदत करतात. कोविडमध्ये त्यांनी असं केलंय. ते राजकारण नाही समजत. निवडणूक जिंकणारं राजकारण त्यांना नाही समजत. आयडी बघून मारण्याचा मेसेज आहे. हा मेसेज पंतप्रधानांसाठी आहे. मुस्लिम आणि अल्पसंख्याकांना कमकुवत वाटत आहे. दोन आठड्यांआधी मला ईडीने बोलावलं होतं, कारण मी मुस्लिमांच्या बाजूने बोललो होतो. असंही रॉबर्ट वाड्रांनी म्हटलेलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.