Charanjit Singh Channi
Charanjit Singh Channi Sarkarnama
देश

भैय्या'वरून चेन्नी सापडले कोंडीत...

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री चरनजीतसिंग चेन्नी (Charanjit Singh Channi) यांनी उत्तर प्रदेश-बिहार व दिल्लीच्या लोकांना भैय्या संबोधल्याने सुरू झालेला राजकीय वाद वाढत चालला असून शिवसेनेनेही (Shivsena) यात उडी घेतली आहे. खुद्द पंतप्रधानांनी चेन्नी यांना घेरताना, यूपी-बिहार मध्ये जन्मलेले व पंजाबी बांधवांना पूजनीय असणारे संत रविदास व गुरू गोविंदसिंग (Govindsingh) यांनाही पंजाबमध्ये बंदी करणार का, असा सवाल कॅाग्रेसला (Congress) विचारला व त्यासाठी त्यांनी त्याच राज्यातील सभेचीच निवड केली.

चेन्नी यांच्या भैय्या विधानावरून चेन्नी व कॅाग्रेसवर निशाणा साधणाऱयांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आदींची यादी वाढत चालली आहे. याप्रकरणी, आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला हा चेन्नी यांचा खुलासा विरोधकांनी फेटाळला आहे.

मोदी यांनी सांगितले की, अशा विधानांनी हे लोक (कॅाग्रेस) कोणाचा अपमान करत आहेत? येथे एक गाव असे नाही जेथे यूपी-बिहारचे आमचे बांधव रहात नाहीत. संत रविदास यांचा जन्म वाराणसीत तर गुरू गोविंदसिग यांचा जन्म पाटणा साहिब येथे झाला होता. जर त्या राज्यांतील लोकांना पंजाबात येऊ नका, ही तुमची भाषा असेल तर या दोन्ही महान व्यक्तिमत्वांनाही तुम्ही धुडकावणार? त्यांचे नामोनिशाण मिटवून टाकणार का?, असा सवाल विचारला आहे.

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही चेन्नी यांच्यावर घणाघाती टीका करताना, हा अभद्रपणा असल्याचे म्हटले. बिहारचे लोक किती मेहेनती असतात व त्यांनी आपल्या कष्टाळूपणामुळे पंजाब व देशाच्या विकासाला कसा हातभार लावला आहे हे चेन्नी यांना कळते का, हेही त्यांनी सांगितले. चन्नी यांची टिप्पणी हा भारताच्या राष्ट्रीय एकतेवरील अपवित्र हल्ला आहे व त्याबद्दल त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी जाहीर माफी मागावी, असे सांगून बिहार सरकारने अधिकृतरीत्या चेन्नी यांचा निषेध केला.

बसपा नेत्या मायावती यांनी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे हे विधान अत्यंत लाजिरवाणे आहे व दोन्ही राज्यांच्या जनतेने कॅाग्रेसला धडा शिकवावा, असे आवाहन केले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चेन्नी यांचे विधान भारतीयतेच्या भावनेच्या विरोधात असल्याचे सांगून म्हटले की, भाजपने लोकांना एकजूट केले व काँग्रेसने त्यांच्यात फूट पाडली. हे कॅाग्रेसचे तुकडे-तुकडे राजकारण असल्याची टीका आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केली.

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही चेन्नी यांच्या विधानावर हल्ला चढविला असून, आम्ही सारे सर्वात आधी भारतवासी आहोत. मात्र राजकीय पक्षांनी यूपी-बिहारच्या लोकांना आपलेच राज्य सोडण्यास विवश केले असा टोलाही लगावला आहे. असे स्थलांतरित श्रमजीवी, व्यावसायिक, उद्योजक, खासदार व नोकरशहांच्या रूपात अन्य राज्यांत जातात व त्या त्या राज्याच्या विकासात , अर्तव्यवस्थेत महत्वाचे योगदान देतात. या राज्यांतील या लोकांची चेष्टा करणे बंद करा असेही चतुर्वेदी यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT