Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi is Leader of Opposition : राहुल गांधींची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड; I.N.D.I.A आघाडीकडून शिक्कामोर्तब!

Mayur Ratnaparkhe

Loksabha News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी आज निवड झाली आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.

लोकसभा अध्यक्ष निवडीच्या अवघ्या एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने तातडीची बैठक बोलावली गेली आणि विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय घेतला. या बैठकीत सर्वानुमते राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. याशिवाय लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांना या निर्णयाबाबत कळवण्यातही आले आहे.

राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने आता, आगामी पाच वर्षे संसदेत पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी जुगलबंदी देशावासीयांना बघायला मिळणार आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात सत्तेत जरी पुन्हा एनडीए आघाडीचे मोदी सरकार आले असले, तरी विरोधकांनीही चांगल्या जागा मिळवल्या आहेत. विशेषकरून काँग्रेसची कामगिरी सुधारल्याने विरोधकांचा उत्साह वाढलेला आहे. राहुल गांधींच्या राजकीय जीवनासाठी सुद्धा ही एक मोठी जबाबदारी असणार आहे.

दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांनी उमेदवार उतरवल्याने पुन्हा एकदा एनडीए विरुध्द इंडिया आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. एनडीएने माजी अध्यक्ष व खासदार ओम बिर्ला तर विरोधकांनी खासदार के. सुरेश यांना मैदानात उतरवलं आहे.

निवडणूक  बिनविरोध करण्यासाठी भाजपने शर्थीचे प्रयत्न केले होते. पण विरोधकांनी घातलेल्या एका अटीमुळे इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यालाही अपयश आले. आता बुधवारी सकाळी ही निवडणूक होईल.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT