Rajasthan Assembly election Sarkarnama
देश

Rajasthan Election 2023: राजस्थानमध्ये बहुमत न मिळाल्यास, हा असेल भाजपचा "बी" प्लॅन

Vasundhara Raje Plan : वसुंधराराजे मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी खेळणार ही खेळी ! 

Sudesh Mitkar

 Pune News : भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचे असलेल्या राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणीचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे नेत्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वसुंधरा राजेंची चर्चा सुरू झाली आहे. सत्तेसाठी दोन्ही पक्षांनी निवडणुकीत पूर्ण ताकद पणाला लावली, पण काही कारणास्तव दोन्ही पक्ष सत्तेपासून काही पावले दूर राहिले, तर भाजपला सत्तेत आणण्यात वसुंधरा राजे यांचा बी "प्लॅन " तयार असल्याचे समजते. 

 राजस्थान विधानसभा 2018 च्या निवडणुकीत अपक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी काँग्रेसकडे सरकार स्थापन करण्यासाठी काही आमदारांची कमतरता होती. अशा स्थितीत अशोक गेहलोत यांना अपक्षांना आपल्या बाजूने वळवून घेण्यात यश मिळाले होते. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. या वेळीही दोन्ही प्रमुख पक्षांच्या बंडखोर उमेदवारांची संख्या वाढली आहे. भाजपमधील 32 बंडखोर आणि काँग्रेसच्या 22 बंडखोरांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. यातील अनेक बंडखोर उमेदवार आपापल्या भागातील त्यांची उंची लक्षात घेऊन विजयी होतील अशी अपेक्षा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वसुंधरा राजे यांचे लक्ष या अपक्षांवर 

या वेळी राजस्थान विधानसभा निवडणुकीत अपक्षांची संख्या गेल्या वेळेपेक्षा जास्त असू शकते, असे मानले जात आहे. अशा स्थितीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विजयी होण्याची शक्यता असलेल्या अपक्षांशी आतापासूनच अंतर्गत संपर्क सुरू केला आहे. भाजपच्या ३२ बंडखोरांपैकी बहुतांश वसुंधरा राजे यांचे कट्टर समर्थक आहेत. भाजपने या वेळी वसुंधरा समर्थक कैलाश मेघवाल यांना तिकीट दिले नाही. अशा परिस्थितीत अनेक वेळा मंत्री आणि खासदार राहिलेले कैलाश मेघवाल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून शाहपुरा निवडणूक लढवली. त्याचप्रमाणे भवानी सिंग राजावत हे लाडपुरा मतदारसंघातून, युनूस खान दिडवानामधून, चंद्रपाल सिंग हे चित्तोडगडमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत भाजपच्या वसुंधरा राजे यांचे लक्ष या अपक्षांवर आहे.

असं आहे वसुंधरा राजे यांचे गणित

या वेळी वसुंधरा राजे यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला, परंतु त्यांचे समर्थक अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या जागांवर प्रचाराला गेले नाहीत. या वेळी वसुंधरा राजे यांनी अशोक गेहलोत यांचा 2018चा 'खेळ' डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण 'गेम प्लॅन' तयार केल्याचे मानले जात आहे. 2018 मध्ये अशोक गेहलोत कॅम्पच्या सुमारे 17-18 समर्थकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. निकाल आले तेव्हा ना काँग्रेसला सत्ता मिळाली ना भाजपला.

अशा परिस्थितीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकलेल्या गेहलोत यांच्या समर्थकांनी केवळ अशोक गेहलोत मुख्यमंत्री असतील, या एका अटीवर काँग्रेसला पाठिंबा दिला होता.  या वेळी असाच काहीसा वसुंधरा राजे यांचा गेम प्लॅन आहे. वसुंधरा राजे यांच्या समर्थकांनी निवडणुकीत विजय मिळवला आणि भाजप-काँग्रेस सत्तेपासून दूर राहिल्यास हे अपक्ष केवळ एका अटीवर भाजपसोबत एकत्र येऊ शकतात, ती अट म्हणजे वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री करण्याची, अन्यथा हे बंडखोर काँग्रेसशी हातमिळवणी करू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT