Rashid Engineer And Amritpal Singh Sarkarnama
देश

Rashid Engineer And Amritpal Singh : राशिद यांना शपथेचा मार्ग मोकळा; अमृतपाल यांचं काय होणार ? खासदारकी रद्द होणार?

Sandeep Chavan

New Delhi News : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राशीद इंजिनिअर आणि अमृतपाल हे दोन्ही उमेदवार निवडून आले खरे पण ते दोघेही तुरुंगात असल्यानं त्यांना अद्यापही लोकसभा सदस्यत्वपदाची शपथ घेता आलेली नाही. हे दोन्ही खासदार शपथ घेण्यासाठी तुरुंगाबाहेर येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राशीद इंजिनिअर यांना तर शपथ घेण्यास परवानगी मिळाली पण अमृतपालचं काय होणार? 60 दिवसांच्या आत शपथ न घेतल्यास खासदारकी जाणार?

जेलमधून निवडणूक लढली, माजी CM ओमर अब्दुल्लांना पाडलं

2024 च्या लोकसभा निवडणुकीत शेख अब्दुल राशीद ऊर्फ राशीद इंजिनिअर काश्मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांना पराभूत केलं. दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली 2019 पासून ते दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. त्यांना NIA कडून लोकसभा सदस्यत्वपदाची शपथ घेणाची परवानगी मिळाली आहे.

आधी इंजिनिअरिंगची पदवी मग सरकारी नोकरी आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केलेल्या राशीद इंजिनिअर (Rashid Engineer) यांनी 2008 मध्ये कुपवाड्यातील लंगेट विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. 2013 मध्ये त्यांनी अवाम इत्तेहाद पक्षाची स्थापना केली.

2014 मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार बनले. 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा बारामुल्ला येथून लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. 2024 मध्ये मात्र त्यांनी याच बारामुल्लामधून विजय मिळवला तेही तुरुंगातून निवडणूक लढवून! राशीद इंजिनिअर यांना शपथ घेण्यास परवानगी मिळाली आहे.

आसामच्या तुरुंगातून लढवली पंजाबची निवडणूक

‘वारिस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंह यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे कुलबीर सिंह जीरा यांचा पराभव केला. ते 2023 पासून आसामच्या डिब्रुगढ येथील तुरुंगात आहेत. त्यांनी पंजाबमधील खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकलेसुद्धा! 23 फेब्रुवारी 2023 मध्ये अमृतसरमधील अजनाला पोलिस ठाण्यावर जमावानं चढवलेल्या हल्ल्याचं नेतृत्व अमृतपाल सिंह यांनी केलं होतं.

यावेळी जमाव आणि पोलिसांत झटापट झाली होती. त्यानंतर फरार झालेल्या अमृतपाल यांना पुढच्याच महिन्यात अटक करण्यात आली. त्यांना अटक करून आसामच्या डिब्रुगढ येथील तुरुंगात पाठवण्यात आलं. अमृतपाल यांना आसाममधून पंजाबच्या तुरुंगात हलवण्यात यावं, अशी मागणी त्यांच्या कुटुंबांकडून वारंवार करण्यात येतेय. दरम्यान, अमृतपाल यांना पंजाबमध्ये आणण्यात येईल, या उद्देशानं त्यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा!

राशीद यांचा शपथेचा मार्ग मोकळा...

तिहार तुरुंगात असलेल्या राशीद इंजिनिअर यांना लोकसभा सदस्यत्वपदाची शपथ घेण्यास परवानगी मिळाली असली तरी आसामच्या तुरुंगात असलेल्या अमृतपाल सिंह यांच्यासमोरील अडचणी अजून दूर झाल्या नाहीत. त्यांना अद्याप तरी NIA कडून परवानगी मिळालेली नाही. त्यांच्या अंतरिम जामिनावरील निर्णय येणं अजून बाकी आहे. नव्या लोकसभेसाठी 60 दिवसांच्या आत शपथ घेणं आवश्यक आहे. शपथ घेतली न गेल्यास लोकसभा सदस्यत्व रद्द होऊ शकते.

राशीद इंजिनिअर यांना शपथ घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर आता अमृतपाल सिंह यांचं काय होणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT