sachin pilot : Ashok Gehlot News Sarkarnama
देश

Sachin Pilot : काँग्रेसचं सरकार सत्तेत येण्यापूर्वीच राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून पायलटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

Deepak Kulkarni

Telangana : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या पाच ते सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांकडे लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. 3 डिसेंबरला या पाचही राज्यांच्या निकालानंतर भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची लोकसभेसाठीची रणनीती ठरणार आहे.

त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. राजस्थानमध्ये काँग्रेससह भाजपकडूनही विजयाचा दावा केला जात आहे. याचवेळी काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी मुख्यमंत्रिपदावरून सूचक वक्तव्य केलं आहे.

राजस्थानमध्ये आजपर्यंत एकाच पक्षाचे सलग दुसऱ्यांदा सत्ता आणण्यात यश आलेले नाही, पण आता काँग्रेस हा पायंडा मोडणार असून, तिथे पुन्हा काँग्रेसच सत्तेत परतणार असल्याचा दावा नेतेमंडळींकडून केला जात आहे, पण काँग्रेससाठी राजस्थानमधील गेहलोत - पायलट हा पुन्हा कायमच डोकेदुखी ठरणारा वाद यावेळेस परत उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Rajasthan Assembly Election)

निवडणुकीपूर्वी एकत्र प्रचारात दिसलेले अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोन्हीही नेते निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून जोरदार खटके उडाल्याचे समोर आले होते. तसेच पायलट यांनी अनेकदा आपल्याच सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. याच पार्श्वभूमीवर आता पायलट यांनी मुख्यमंत्रिपदावरून केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Ashok Gehlot)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी तेलंगणात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी राजस्थानमध्ये काँग्रेस यंदा परंपरा मोडणार असून, पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच राजस्थानच्या संभाव्य मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद पक्षातील नेत्यांमध्ये नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सचिन पायलट म्हणाले, राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नाही. काँग्रेसमध्ये नेता निवडीची एक प्रथा आणि परंपरा आहे. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांची बैठक होते. या बैठकीत आमदारांचे मत जाणून घेतले जाते. त्याची माहिती पक्षश्रेष्ठीला दिली जाते. त्यानंतर नेता निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. हा निर्णय सर्वांना मान्य असतो. त्यामुळे कोणताही वाद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी तेलंगणात काँग्रेस सत्तेवर येणार असून, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने लोकांमध्ये तीव्र संताप असल्याचेही विधान केले आहे.

...तर मी मुख्यमंत्रिपदाची दावेदारी का सोडेन?

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदाबाबत काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, 'मुख्यमंत्रिपदावर सध्या बोलण्याची गरज नाही. आमच्या पक्षाची भूमिका हायकमांड ठरवते. हायकमांड जेव्हा कोणाच्या बाजूने निर्णय घेते. तेव्हा भविष्यात त्याला कोणी आव्हान देत नाही. मुख्यमंत्रिपदाचा दावा केला नाही, तरी मुख्यमंत्रिपदच मला सोडणार नाही.' या विधानासंदर्भात गेहलोत यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले, "पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हे मी कसे सांगू? माझं यापूर्वीचं विधान हे पक्षाच्या हितासाठी होते, असेही त्यांनी सांगितले.

तसेच कोणाला मत द्यायचे हे लोकांना कळेल तेव्हाच पक्षाचा विजय होईल. मी काम केले आहे आणि राज्य सरकारने चांगले काम केले आहे, असे लोक म्हणत असतील आणि ते माझ्या नावावर मत देत असतील, तर मी दावेदारी का सोडेन? मी जरी मुख्यमंत्रिपदाचा दावा केला नाही तरी मुख्यमंत्री हे पद मला सोडणार नाही, असे मी जबाबदारीने म्हटले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT