Scindia Family Dispute: देशाच्या सर्वात मोठ्या शाही संस्थानांपैकी एक असलेल्या मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचं सिंधिया अर्थात शिंदे कुटंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या कुटुंबाच्या ४० हजार कोटींच्या वडिलोपार्जित संपत्तीबाबत ग्वाल्हेर हायकोर्टानं सर्वात मोठा आदेश काढला आहे. हायकोर्टाच्या ग्वाल्हेर खंडपीठाच्या एकल पीठानं शुक्रवारी आदेश दिला की सिंधिया कुटुंबाचे सर्व सदस्य ९० दिवसांच्या आत परस्पर सहमतीनं संपत्तीच्या वादाचा निपटारा करावा. हा वाद गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून कोर्टामध्ये प्रलंबित आहे.
सुरुवातीला या खटल्यामध्ये माधवराव सिंधिया हे पक्षकार होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य सिंधिया हे पक्षकार झाले. आता कोर्टानं आदेश दिला आहे की, ज्योतिरादित्य सिंधिया, वसुंधराराजे, यशोधराराजे आणि उषाराजे यांनी मिळून या संपत्तीच्या वादावर तोडगा काढावा. हायकोर्टाच्या या अल्टिमेटमनंतर आता सिंधिया कुटुंबाच्या मालमत्तेचा वाद मिटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. ग्वाल्हेरचं सिंधिया कुटुंब हे स्वातंत्र्यावेळी देखील देशातील सर्वात श्रीमंत संस्थानांमध्ये गणलं जायचं. जिवाजीराव सिंधिया आणि महाराणी विजयाराजे सिंधिया यांचे वारसदार म्हणून त्यांचे पुत्र माधवराव आणि तीन मुली वसुंधराराजे, यशोधराराजे आणि उषाराजे यांची नावं निश्चित झाली. आजचा हा वाद या वारसदारांमधलाच आहे.
सिंधिया कुटुंबाच्या संपत्तीत ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक जयविलास पॅलेसचा समावेश आहे. हा पॅलेस ४० एकरांमध्ये पसरला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील श्रीगोंदा आणि लिंबन गावात जमीन, मुंबईचा समुद्र महल आणि ग्वाल्हेरमध्ये राणी महल, हिरणवन कोठी, विजयभवन, शांतीनिकेतन आणि इतर अनेक आलिशान मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे. याची अंदाजे किंमत हजारो कोटी रुपये इतकी आहे, हायकोर्टाच्या आदेशानंतर आता आशा आहे की, अनेक वर्षांपासून सुरु असलेली कायदेशीर लढाई संपणार आहे तसंच कुटुंबात परस्पर तोडगा काढला जाईल.
वकील चेन सिंह यांनी सांगितलं की, हायकोर्टानं दिलेला आदेश हा या खटल्यातील सर्व पक्षकारांना दिलासा देणारा आदेश आहे. यातून वादावर कायमचा तोडगा निघू शकेल. राजकीय दृष्टीनं देखील हे प्रकरण महत्वाचं आहे कारण सिंधिया कुटुंबाच्या शाखा विविध राज्यांच्या राजकारणात सक्रीय आहेत. यांपैकी वसुंधराराजे या राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. यशोधराराजे मध्य प्रदेशच्या मंत्री राहिल्या आहेत. तर ज्योतिरादित्य सिंधिया हे सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.