Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या खासदारांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत, आम्ही ठाकरेंची वज्रमूठ आहोत. कोणी-कोणाच्या संपर्कात नसून, ठाकरेंबरोबर राहणार आहोत, असे सांगताना भाजपच्या हिंदुत्वावर जोरदार टीकास्त्र सोडलं.
"अमेरिका लष्कराचं विमान भारतीयांना बेड्या ठोकून, आपल्या विमानतळावर उतरत होतं, त्यावेळी हे इकडं डुबकी घेत होते. ही डुबकी कशाला? तर दिल्लीत निवडणुका आहेत. निवडणुकींसमोर यांना हिंदुत्व काहीच नाही. फक्त सत्ता", असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता लगावला.
शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार सावंत म्हणाले, "पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे आहे, ते तरी कळू देत, आम्हाला. बांगलादेशांमध्ये काल पुन्हा हिंदूंवर हल्ले झाले. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. अमेरिकेने काल हिंदुस्थानातील लोकांना बेड्या ठोकून 45 तास कशापद्धतीने देशात आणलं, हे सर्व दिसत आहे". अमृतसरमध्ये अमेरिकेचं विमान उतरणं हाच देशाचा अपमान आहे. अमेरिकेच्या लष्कराचं विमान, आपल्या विमानतळावर उतरत आहे. त्यावेळी हे इकडं डुबकी घेत आहेत. ही डुबकी कशाला, तर दिल्लीत निवडणुका आहेत. निवडणुकीशिवाय यांना हिंदुत्व काहीच नाही. फक्त सत्ता, असा टोला खासदार सावंत यांनी लगावला.
'नोकरशाही दावणीला बांधली आहे. यातूनच हे घडत असतं. छोट्या-छोट्या देशांनी अमेरिकांना डोळे दाखवले आहेत. आम्ही आमचं विमान घेऊन येऊ, आणि माणसं घेऊन जाऊ, असं सांगितले. पण आपण तसं केलं नाही', याकडे देखील खासदार सावंत (Arvind Sawant) यांनी लक्ष वेधलं.
'उद्धव ठाकरे आणि आम्ही, हिंदुत्व सोडलेलं नाही, हे सांगताना आमचं हिंदुत्व बावन्नकशी आहे. ढोंगी नाही. सर्वसमावेशक आहे. देशाशी आहे. राष्ट्रशी आहे. राष्ट्राच्या मातीशी आहे. जो-जो या राष्ट्रसाठी प्राण देईल, तो आमचा हिंदू आहे, असे आम्ही समजतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा विचार घेऊन आम्ही पुढं चाललो आहोत', असेही खासदार सावंत यांनी सांगितले.
'केंद्रात भाजपच्या मोदी सरकारबरोबर असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या जाहिरनाम्यात मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्या, अशी मागणी आहे. वक्फ बोर्डात ज्या सुधारणा आल्या, त्याच्याशी चंद्राबाबू नायडू सहमत नाही. तिथं काहीतरी गोंधळ आहे. मग आपल्याला कोणीतरी हवं आहे. यातून हा फुटणार, तो फुटणार, असल्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत. चंद्राबाबू नायडू खूश नाहीत', असे सांगून केंद्रातील एनडीएमध्ये धुसफूस सुरू असल्याचा दावा खासदार सावंत यांनी केला.
काँग्रेससोबत आहोत, म्हणजे काय? 25 वर्षे आम्ही भाजपबरोबर होतो. मग आम्ही भाजपवासी झालो का? असा प्रतिसवाल करताना, आम्ही काँग्रेस सोबत आहोत, म्हणजे लगेच आम्ही काँग्रेसवासी झालो का? शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसेनाप्रमुखांना काँग्रेसला एकदा पाठिंबा दिला आहे. शेखावत, प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होताना, मुंबईमध्ये मुरली देवरा यांना महापौर करताना शिवसेनाप्रमुखांची भूमिका तात्विक राहील आहे. शिवसेनाप्रमुखांनी हा पाठिंबा तात्विक विचारावर दिला होता. पण विचारधारा सोडलेली नाही, याची आठवण खासदार सावंत यांनी करून दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.