Administration news : प्रशासनातील वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांमधील वाद अनेकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. काही वाद थेट कोर्टापर्यंत गेले आहेत. अशाच एका वादाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. एका महिला तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना मानसिक छळाचा आरोप केला आहे. तसेच आपल्याकडून त्यांनी एक आयफोन आणि महागडं घड्याळ लाच म्हणून स्वीकारल्याचा आरोपही केला आहे.
एवढेच नाही तर संबंधित तहसीलदारांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. पत्रकार परिषद घेत या महिला जिल्हाधिकाऱ्यांनी हा वाद चव्हाट्यावर आणला. त्यानंतर मात्र महिला तहसीलदाराची तातडीने उचलबांगडी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आहे उत्तर प्रदेशातील.
तहसीलदार राखी शर्मा या मागील आठवड्यात बदलीची कारवाई होईपर्यंत टूंडला येथे कार्यरत होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी रमेश रंजन यांच्यावर गंबीर आरोप केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ एप्रिलला शर्मा यांची बदली शिकोहाबाद तहसील कार्यालयात केली होती. त्यानंतर शर्मा यांनी आरोपांचा धडाकाच लावला.
बदलीचे आदेश येताच शर्मा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून एक व्हिडीओ जारी केला होता. त्यामध्ये रमेश रंजन यांच्यावर गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शर्मा यांनी तहसील कार्यालयातच पत्रकार परिषद घेत जिल्हाधिकाऱ्या पावणे दोन लाख रुपयांचा आयफोन आणि आयवॉच लाच म्हणून दिल्याचा आरोप केला.
तहसील कार्यालयात तिघांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप असलेली तक्रार आली होती. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते. त्यानंतर त्यांनी मलाच त्रास देण्यास सुरूवात केली. आठ महिने माझे वेतन रोखले. याच काळात माझ्याकडून आयफोन घेतला. पण त्यानंतरही त्यांच्या मागण्या थांबल्या नाहीत. त्यांचे काही नैतिक आणि अनैतिक आदेश आहे, त्याचे पालन मी करावे, असा दबाव टाकला जात होता, असे आरोपही शर्मा यांनी केले आहेत.
दरम्यान, शर्मा यांच्या या आरोपांनंतर त्यांच्यावर प्रशासकीय गैरवर्तनाचा ठपका ठेवत तातडीने लखनौ येथील महसूल परिषद मुख्यालयात बदली करण्यात आली. या बदलीनंतर त्या सुटीवर गेल्या आहेत. रविवारी आपल्या खासगी चालकाचे अपहरण केल्याचा आरोपही शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांमधील वाद चांगलाच भडकला असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.