Samajwadi Party, Akhilesh Yadav Promises AI
देश

UP Election 2027: 10 लाख सरकारी नोकऱ्या, महिलांना 40 हजार पेन्शन; अखिलेश यादवांनी मतदारांसाठी उघडली आश्वासनांची तिजोरी!

Samajwadi Party, Akhilesh Yadav Promises: यूपी निवडणूक 2027 आधी अखिलेश यादवांची मोठी घोषणा! महिलांना 40 हजार पेन्शन, मुलीच्या जन्मावर 10 ग्रॅम सोने आणि 10 लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन.

Mangesh Mahale

Samajwadi Party Manifesto 2027: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आश्वासनांचा मोठा पाऊस पाडला आहे. महिला, बेरोजगार तरुण, शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक आणि व्यापारी अशा प्रत्येक घटकाला साद घालत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाचा अजेंडा मांडला आहे.

महिलांना वर्षाला 40 हजार रुपयांची पेन्शन, मुलीच्या जन्मानंतर 10 ग्रॅम सोने, तर सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 10 लाख सरकारी पदे भरण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात आश्वासनांची स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत.

अखिलेश यादव यांनी केवळ रोजगार आणि आर्थिक मदतीपुरती घोषणा मर्यादित ठेवलेली नाही. शिक्षण, आरोग्य, शेती आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांनाही त्यांच्या अजेंड्यात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या घोषणांमधून दलित आणि अल्पसंख्याक मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न दिसतो.

1. बेरोजगार तरुणांसाठी मोठी आश्वासने

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत 10 लाख सरकारी पदे भरण्याचा निर्णय, पाच वर्षांत 25 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या आणि 2 ते 3 कोटी लोकांना अन्य क्षेत्रांत रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पदवीधर बेरोजगारांना दरमहा 5 हजार रुपये भत्ता देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

2. विद्यार्थ्यांना पुन्हा लॅपटॉप

बंद पडलेल्या 26 हजार प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करणे, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणे आणि शाळांमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन आहे. शिक्षणासाठी राज्याच्या GSDP मधील 6 टक्के निधी खर्च करण्याचेही नियोजन आहे.

3. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि MSP

उत्तर प्रदेशातील 23 पिके आणि दुधाला कायदेशीर हमीसह किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत सिंचन वीज आणि ऊस उत्पादकांच्या थकीत बिलांसाठी 15 हजार कोटींचा निधी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

4. ग्रामीण भागाला मोफत वीज

ग्रामीण घरगुती ग्राहकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज, गावांच्या विकासासाठी दीड लाख कोटी रुपये आणि गरीबांसाठी पाच रुपयांत जेवण देणाऱ्या समाजवादी कॅन्टीन सुरू करण्याचे आश्वासन आहे. BPL कुटुंबांना 10 लाखांचे आरोग्य विमा संरक्षण देण्याची घोषणाही आहे.

5. महिलांना वर्षाला 40 हजार रुपये

महिलांच्या खात्यात दरवर्षी 40 हजार रुपयांची पेन्शन आणि मुलीच्या जन्मावेळी 10 ग्रॅम सोने देण्याचे आश्वासन अखिलेश यांनी दिले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस दल स्थापन करण्याचीही घोषणा आहे.

6. सामाजिक न्यायाचा मुद्दा

जातनिहाय जनगणना सुरू करणे, दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांच्या विकासाला प्राधान्य देणे तसेच त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

7. शिक्षक आणि शिक्षामित्रांना दिलासा

शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदे वर्षभरात भरणे, शिक्षामित्रांची संख्या दुप्पट करणे आणि त्यांच्या मानधनात दरमहा 5 हजार रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन आहे. तीन वर्षांत नियमित सरकारी सेवेत सामावून घेण्याचे धोरण आखण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

8. आरोग्य सुविधांचा विस्तार

राज्यातील 18 विभागीय मुख्यालयांमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारणे, जिल्हा रुग्णालयांत ICU आणि व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करणे तसेच कर्करोग रुग्णालयात मोफत उपचार देण्याचे आश्वासन आहे.

9. ज्येष्ठ नागरिक आणि स्थलांतरित कामगार

वृद्धांसाठी कल्याणकारी कायदा, वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी क्लब उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. परराज्यात कामासाठी जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याचेही आश्वासन आहे.

10. व्यापाऱ्यांसाठी संरक्षण कायदा

व्यापारी आणि दुकानदारांना माफिया व बाहुबलींपासून संरक्षण देण्यासाठी व्यापार संरक्षण कायदा आणण्याचे आश्वासन आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर युनिट स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

एकंदरीत, अखिलेश यादव यांनी निवडणुकीआधी समाजातील जवळपास प्रत्येक घटकाला आपल्या घोषणांच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. मात्र, 10 लाख सरकारी नोकऱ्यांपासून 40 हजारांच्या वार्षिक पेन्शनपर्यंतच्या या आश्वासनांची अंमलबजावणी कशी करणार, निधी कुठून उभारणार आणि मतदार या शब्दांवर किती विश्वास ठेवणार, हे 2027 च्या निवडणुकीत स्पष्ट होईल. सध्या तरी उत्तर प्रदेशात सत्तेच्या लढाईआधी आश्वासनांची लढाई सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT