

Kolhapur News: 'मुख्यमंत्री साहेब, करवीर तालुक्याची ताकद पाहायची असेल तर मोजणी अधिकाऱ्यांना पाठवून द्या. आम्ही काय आहोत ते दाखवून देऊ!' असा थेट इशाराच कोल्हापुरातील संतप्त शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप आता रस्त्यावरच नाही, तर थेट बांधावर पोहोचला आहे. हातात चटणीच्या बरण्या, उसाचे बुडके आणि चाबूक घेऊन महिला आणि शेतकरी आंदोलनासाठी उतरले. 'गोळ्या घाला, पण जमीन देणार नाही. आमच्या काळजाचा तुकडा असलेली शेती सोडणार नाही,' असा आक्रोश यावेळी ऐकायला मिळाला.
शुक्रवारी (ता. २७) पहाटे साडेपाच वाजल्यापासून कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाकरे येथे हे ठिय्या आंदोलन सुरू झाले. खुपिरे, शिंदेवाडी, साबळेवाडी, वाकरे आणि कुडित्रे परिसरातील शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने शेतात जमल्या होत्या. शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी करण्यासाठी अधिकारी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आधीच आंदोलनाची तयारी केली होती.
या आंदोलनात महिलांच्या हातात चटणीच्या बरण्या होत्या, तर शेतकऱ्यांनी उसाचे बुडके आणि चाबूक आणले होते. मोजणीसाठी अधिकारी आले तर त्यांना विरोध करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. सकाळपासून दुपारी बारापर्यंत शेतकऱ्यांनी शेतातच ठिय्या मांडला होता. मात्र, दुपारी बारापर्यंत मोजणीसाठी कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही.
या आंदोलनातील सर्वात काळीज पिळवटून टाकणारा क्षण म्हणजे शंभर वर्षांच्या इंदुबाई करपे यांचा आक्रोश. वयाची शंभरी पार केलेल्या इंदुबाईंनीही आंदोलनात सहभागी होत सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला. आयुष्यभर ज्या जमिनीच्या जीवावर कुटुंबाचा संसार उभा केला, तीच जमीन हिरावून घेतली जाण्याची भीती त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.
'आम्हाला पोलिसांचा धाक नको, कायद्याचा धाक नको. शेती आमच्या हक्काची आहे. शंभर वर्षे जगलो; पण असं संकट कधी पाहिलं नाही. मुलाबाळांची लग्नं होईनात, आता शेतीच काढून घेतली तर आम्ही जगायचं कसं? आता माझं मढंच शासनाने घेऊन जावं,' असे म्हणताना इंदुबाईंच्या शब्दांतून वेदना आणि हतबलता व्यक्त झाली.
शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकार आमची हक्काची जमीन काढून घेत असल्याचा आरोप करत, प्रसंगी रक्तपात झाला किंवा जीव गेला तरी चालेल; मात्र शेती सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
शेती म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही, तर पिढ्यानपिढ्यांचा संसार, कष्ट आणि जगण्याचा आधार आहे, अशी भावना या आंदोलनातून व्यक्त झाली. शक्तिपीठ महामार्गासाठी कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असा निर्धार करत करवीरमधील शेतकरी आणि महिलांनी सरकारला ठाम विरोध दर्शवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.