Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंनी पहिल्यांदाच मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार; नेमकं कारण काय?

Abhijeet Dipke Thanks To PM Modi:अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'थँक्यू मोदीजी' म्हणत आभार मानले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून कॉकरोच जनता पार्टी पुन्हा आक्रमक झाली आहे.
Abhijeet Dipke Thanks To PM Modi
Abhijeet Dipke Thanks To PM ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur News: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावर शांत असलेले अभिजीत दिपके यांनी आता पुन्हा आंदोलनाचा सूर लावला आहे.

विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. 'इतिहासात आमचे नाव लिहिले जाणार आहे, त्याबद्दल थँक्यू मोदीजी,' अशा शब्दांत त्यांनी मोदींचे आभार मानले.

नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला पोलिस परवानगी देणार की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी अखेर रॅलीला परवानगी दिली. याचदरम्यान दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा आपल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला.

विमानातून अटक केल्याचा उल्लेख करत काय म्हणाले दिपके?

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP ने आंदोलन पुकारले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही पक्षाने कार्यकर्त्यांना दिल्लीत पोहोचण्याचे आवाहन केले. त्यानंतर अभिजीत दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका हे मुंबईहून विमानाने दिल्लीला रवाना झाले.

विमान दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या, तसेच काही बॉण्डवर सह्याही घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेचा संदर्भ देत दिपके यांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या कारवाईवर भाष्य केले.

'मी, आशु आणि सौरभ हे देशाच्या इतिहासातील असे व्यक्ती आहोत, ज्यांना थेट विमानातून अटक करण्यात आली. कोणाला विमानातून उचलल्याची घटना आठवते का? इतकी भीती होती की विमानातून उतरवल्यानंतर पुढे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. इतिहासात आमच्या नावाचा उल्लेख होईल, त्याबद्दल थँक्यू मोदीजी,' अशा आशयाचे विधान त्यांनी केले.

नीट पेपरफुटी प्रकरणातही CJP चे आंदोलन

कॉकरोच जनता पार्टीने यापूर्वी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही आक्रमक आंदोलन केले होते. जंतरमंतरवर मोठ्या संख्येने तरुणांना एकत्र करत पक्षाने आंदोलन पुकारले होते. त्यानंतर आंदोलकांनी थेट संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धरपकड झाली होती. देशाच्या विविध भागांतून तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते.

आता पुन्हा एकदा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून CJP ने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र, दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाला परवानगी नाकारल्याने पक्षाचा नियोजित कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यानंतर नागपुरातील रॅली आणि अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदींचे मानलेले आभार यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.