Manipur Violence News Sarkarnama
देश

Manipur Violence News : नव्या वर्षाच्या सुरुवातीला मणिपूरात हिंसाचार; तिघांची गोळी झाडून हत्या, संचारबंदी लागू!

Violence in Manipur Three shot dead curfew imposed : हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी तीन गाड्या पेटवून दिल्या.

Chetan Zadpe

Manipur News : मागील वर्षाच्या मे महिन्यापासून मणिपूरध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन समाजात हिंसाचार घडून आले होते. यामुळे मणिपूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही काळानंतर हिंसाचाराची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत होते. मात्र आता पुन्हा एकदा हिंसाचाराने मणिपूर हादरले आहे.

देशभरात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराने पेटले आहे. काल सोमवारी सायंकाळी (1 जाने.) थौबल जिल्ह्यात तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात अकरा जण गंभीर जखमीही झाले आहेत. यानंतर मणिपूरच्या पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

राज्याच्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेतील हल्लेखोरांची अजूनही ओळख पटलेली नाही. हल्लेखोरांनी लिलोंग चिंगजाओ या भागात येऊन, स्थानिक लोकांवर हल्ला केला. इथल्या लोकांवर त्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकूण अकरा जण गंभीर जखमी झाले आहेत.

या हल्ल्यातील जखमींना स्थानिक प्रशासनाकडून तात्काळा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी तीन गाड्या पेटवून दिल्या. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. हिंसाचार आणखी वाढू नये यासाठी, या घटनेनंतर थौबल, इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम आणि बिष्णुपूर जिल्ह्यात पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी एका व्हिडिओद्वारे निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, "ज्यांनी ही घटना घडवली त्यांचा शोध घेऊन त्यांना पकडले जाईल. आम्ही या घटनेची गंभीरपणे दखल घेत आहोत. मणिपूर पोलीस आरोपींना पकडण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. मी मणिपूरच्या सर्व जनतेला आणि विशेषत: लिलोंगवेच्या लोकांना आवाहन करतो की, कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सरकार तुम्हाला देत आहे."

पोलिसांवर हल्ला -

या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी शनिवारी (30 डिसें) रात्री झालेल्या हल्ल्यात मणिपूर पोलिसांचे तीन कमांडो जखमी झाले होते. ही घटना मणिपूरच्या मोरेह सीमावर्ती शहरात घडली. मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 180 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये हा हिंसाचार झाला. राज्यात सुमारे 53% मैतई आहेत तर नागा आणि कुकी समुदाय सुमारे 40% आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT