West Bengal election news update TMC vs BJP Sarkarnama
देश

West Bengal Election: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 'रेकॉर्ड ब्रेक' मतदान,भाजप किती जागा जिंकणार? सुवेंदू अधिकारींनी सांगितला TMC ला धडकी भरवणारा आकडा

BJP Vs TMC: भाजपनं पश्चिम बंगालमधील या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तीन टर्मच्या सरकारला सुरुंग लावण्यासाठी मोठी ताकद पणाला लावली आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांची फौज बंगालमध्ये कित्येक महिन्यांपासून तळ ठोकून होती.

Deepak Kulkarni

West Bengal News: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी (ता.23) पार पडलं आहे. यावेळी बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात मतदारांनी दाखवलेल्या प्रचंड उत्साहामुळे 152 जागांसाठी रेकॉर्ड ब्रेक मतदानाची नोंद झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंतच 78.77 टक्के मतदान झाले होते. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा आकडा 90 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील या विक्रमी मतदानानंतर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्यानं ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला धडकी भरवणारा आकडाच सांगितला आहे.

भाजपनं पश्चिम बंगालमधील या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तीन टर्मच्या सरकारला सुरुंग लावण्यासाठी मोठी ताकद पणाला लावली आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांची फौज बंगालमध्ये कित्येक महिन्यांपासून तळ ठोकून होती. गेल्या पंचवार्षिकला भाजपनं 2 वरुन तब्बल 77 जागांवर मुसंडी मारल्याचं दिसून आलं होतं. आता यावेळी भाजप नेत्यांकडून बहुमताचा आकडा गाठत पश्चिम बंगालमध्ये सत्ता काबीज करणार असल्याचा दावा केला जात आहे.

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेनंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहिल्या टप्प्यातील 152 पैकी 125 जागा भाजप जिंकणार असल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानावरही भाष्य करताना दुसरा टप्पा आमच्यासाठी कठीण नसल्याचं सांगितलं आहे.

सुवेंदू अधिकारी म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये शांततापूर्ण निवडणूक घेण्यात निवडणूक आयोगाला यश आलं आहे. सुमारे पहिल्या टप्प्यात राज्यात 90 टक्के मतदान झालं असून 152 पैकी 125 जागांवर भाजपचा विजय होणार आहे. तसेच यावेळी मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण आधीच झालं होतं. मात्र, या निकालांनंतर 85 टक्के हिंदू मतदार भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याचं तुम्हाला दिसणार असल्याचं विधानही अधिकारी यांनी केलं आहे. तसेच भाजपसाठी दुसरा टप्पा कठीण नसल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

पश्चिम बंगालमधील 152 जागांवर गुरुवारी(ता.23) सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदानासाठी लांबच लांब रांगा दिसून आल्या. मतदारांनी उन्हाचं तडाखा सहन करत उत्साहानं मतदान केलं. यावेळी मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती.

बंगालमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तब्बल 2 लाख सुरक्षा दलाच्या जवानांसह पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तरीही मुर्शिदाबाद, कूचबिहार, सिलिगुडी आणि मालदा यांसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाद, हिंसाचाराच्या घटना घडल्यानं मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. पण या काही घटनांचा अपवाद वगळता बंगालमधील पहिल्या टप्प्यातील मतदान जवळपास शांततेतच पार पडल्याचं पाहायला मिळालं.

पण पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपुरच्या कुमारगंज विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सुवेंदु सरकार यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी जोरदार हल्ला चढवला. बूथ जॅमिंगची माहिती मिळताच भाजप नेते सुवेंदु सरकार हे आपल्या टीमसोबत विशेष बूथवर दाखल झाले होते.त्याचवेळी तृणमूलच्या हल्लेखोर समर्थकांनी सरकार आणि त्यांच्या टीमवर लाठी काठ्यांनी हल्ला केला. यावर त्यांनी पोलिसांसमोर टीएमसीच्या गुंडांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT