

Mumbai News: महायुती सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणं सक्तीचं करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यभरात या निर्णयाची येत्या 1 मेपासून कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही सरनाईक यांनी दिले आहेत. या निर्णयाचं तंतोतंत पालन होतंय की नाही, किंवा पालन न करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आता या निर्णयाविरोधात 4 मे पासून राज्यातील 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान,आता सरनाईकांच्या आदेशावरुन शिवसेनेतच वादाचा भडका उडाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी खासदार संजय निरुपम यांनी रिक्षा चालकांसाठीच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला कडाडून विरोध करत थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा सरकारला दिला आहे.याबाबत निरुपम यांनी १ मे पासून होणाऱ्या या मराठी सक्तीमुळे रिक्षा-टॅक्सी चालकांचे परवाने धोक्यात आल्याचा दावा करत त्यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महायुती सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियन या रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेनं एल्गार पुकारला आहे.राज्यभरातील 15 लाख रिक्षाचालक व टॅक्सी चालक येत्या 4 मे पासून राज्यातील 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय निरुपम सारख्या दिग्गज नेत्यानंही मराठी सक्तीला विरोध दर्शवल्यामुळे आता मंत्री सरनाईक आणि महायुती सरकार आपल्या मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधावर ठाम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार १ मे (महाराष्ट्र दिन) पासून राज्यातील सर्व रिक्षा,टॅक्सी,ओला, ऊबर आणि ई-बाईक टॅक्सी चालकांना मराठी येणं बंधनकारक असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही वाहन परवान्यासाठी संबंधित चालकांची मराठी भाषेची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात जे चालक अनुत्तीर्ण होतील त्यांचा परवाना किंवा बॅज जप्त केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले,महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयामुळे मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये तीव्र भीती निर्माण झाली आहे. तसेच मराठी सक्तीच्या निर्णयावरुन रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उसळण्याची शक्यताही निरुपम यांनी बोलून दाखवली.
निरुपम म्हणाले, राज्यातील सर्व रिक्षा-टॅक्सी चालकांची 1 मे पासून मराठी भाषेची परीक्षा घेतली जाणार असून जे या परीक्षेत पास होणार नाहीत, त्यांचे परवाने किंवा बॅज जप्त केला जाईल,ही सरकारने केलेली घोषणा अन्याय असल्याचं त्यांनी म्हटलं.
शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी यावेळी मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधात आपण स्वतः परिवहन मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.पण जर सरकारने मराठी भाषेच्या सक्तीसंदर्भातला निर्णय बदलला नाही,तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल,असा इशाराही निरुपम यांनी दिला.
रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रवाशांशी बोलण्यापुरती प्राथमिक मराठी येणं ठीक आहे,पण त्यांनी चालकांनी मराठी लिहिण्या-वाचण्यात आणि बोलण्यात एकदम पारंगत असावं,ही अपेक्षा करणं चुकीचं आणि अन्यायकारक असल्याची टीकाही निरुपम यांनी केली आहे.सरकारचा महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे आणि सर्वांनी मराठी बोलली पाहिजे,या आग्रहाचा आम्ही आदर करत असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले,राज्यासह देशभरात 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांवर कोणत्याही प्रकारचा मानसिक,सामाजिक किंवा प्रशासकीय त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी कोणतीही बेकायदेशीर, संविधानविरोधी किंवा कायद्याविरोधी विधाने व कृती करणे ही गंभीर बाब असल्याचा आरोप केला आहे.
तसेच महाराष्ट्रात भाषेच्या नावाखाली कोणत्याही नागरिकास किंवा कामगारास त्रास दिला जाणार नाही ही मूलभूत अपेक्षा व्यक्त केली आहे.भाषा हा संवादाचा विषय असून, ती दडपशाहीचे साधन बनविणे हे संविधानाच्या तत्त्वांना बाधक आहे, असे सदावर्ते यांनी नमूद केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.