Sarkarnama
कोल्हापूर

Lok Sabha Election 2024 : हातकणंगलेत उमेदवारांची 'लपवाछपवी'

Hatkanangale Constituency : 'महायुती'चे कळेना आणि महाविकास आघाडीचे जमेना, महागोंधळ सुरूच

Rahul Gadkar

लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. असे असताना हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून कोणतीच हालचाल नसल्याचे दिसून येत आहे. इतर ठिकाणी भाजपने दंड थोपाटले असताना या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा निर्णय होत नाही. तर महाविकास आघाडीचे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 'तुझं माझं जमेना..' अशी अवस्था झाली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देण्याचे दावे केले जात आहेत. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले किंवा कोल्हापूर यापैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपला द्यावा, अशी मागणी केलेली आहे. भाजपच्या या मागणीमुळे या दोन्ही मतदारसंघातील राजकीय चित्र पालटू शकते. हातकणंगले मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तरीही हा मतदारसंघ भाजपच्या वाटेला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या तरी सर्वजण सावध पावले टाकत आहेत.

महायुतीकड़न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेला पुन्हा उमेदवारी व विकासकामंसाठी कोट्यवधींचा निधी, आणि भाजपच्या इतर नेत्यांच्या पाठिंबाची बेरीज व अटी घालून शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार सांगत आहेत. तर दुसरीकडे राज्यस्तरीय आणि केंद्रीय पातळीवरून जे सर्व्हे केलेत, त्यानुसार मंडलिक-माने यांची उमेदवारी बदलली जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मतदारसंघात संपर्क न ठेवणे, फुटीर गटात गेल्याची नाराजी अशी प्रमुख कारणे या सर्व्हेत आहेत. भाजपला कोणत्याही परिस्थितीत आपल्या आणि मित्रपक्षांची जागा गमवायची नाही. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक हालचाल बारकाईने केली जात आहे. त्यामुळे सध्या तरी महायुतीकडून उमेदवार कळेना, अशी परिस्थिती हातकणंगले मतदारसंघात झाली आहे. जर विद्यमान खासदारांबाबत नाराजी असेल तर भाजपकडून ऐनवेळी आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे, आमदार विनय कोरे, गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक यांची नावे चर्चात येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीचीही या मतदारसंघाबाबतची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. एकीकडे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली जात असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर फटका बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आता कुबड्यांची गरज नाही, अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांची आहे. आम्ही कोणाच्याही दारात जाणार नाही किंवा महायुती आणि महाविकास आघाडीने आमच्या दारात येऊ नये, अशी भूमिका शेट्टी यांची आहे. मात्र स्वाभिमानीसाठी महाविकास आघाडी सोयीस्कर भूमिका ठेवून राजकीय पटलावर काम करत असल्याचेही बोलले जात आहे. 'तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखे करतो' अशीच भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांची आहे की काय, अशी शंका आता उपस्थित होत आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे महाविकास आघाडीकडे सक्षम चेहरा हातकणंगले मतदारसंघात नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला छुपा पाठिंबा दिला तर शेट्टी यांच्या विजयाची खात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटते. जर स्वाभिमानी शेतकरी संघटना, महायुती आणि महाविकास आघाडी यांचे स्वतंत्र उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले तर त्याचा सर्वाधिक फटका स्वाभिमानी आणि महाविकास आघाडीला बसेल, असा अंदाज राजकीय जाणकारांचा आहे. म्हणून भाजपला फायदा होण्यापेक्षा महाविकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी ही जागा सोडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT