Raju Shetti  Sarkarnama
कोल्हापूर

Raju Shetti Protest : राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या हिताचे की तोट्याचे? उसासोबत स्वप्नही करपताहेत...

Rahul Gadkar

Kolhapur News : हंगाम सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला तरी अजूनही कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत ऊस कारखाने बंद आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या मागील हंगामात तुटलेल्या उसाला ४०० रुपये आणि या हंगामात ३५०० रुपये देण्यावरून आंदोलन सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत मागे न हटण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे, तर कारखानदारांनीदेखील मागील ४०० रुपये देणे नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. (Latest Marathi News)

मागील २० दिवसांनंतरही ऊस न तुटल्याने दुष्काळी भागात ऊस करपल्याचे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या हिताचे की तोट्याचे? असा सवाल आता दुष्काळी भागातील शेतकरी करताना दिसत आहेत. त्यामुळे कारखानदारांनीदेखील आपला तोटा न होता शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक पाऊल मागे येण्याची गरज आहे, तर शेट्टी यांनादेखील आंदोलन न ताणवता शेतकऱ्यांचे नुकसान न होण्याची खबरदारी घेण्याची गरज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील गोर-गरीब शेतकऱ्यांचा आर्थिक गाडा हा सहकारावर अवलंबून आहे. दूध संस्था असो व साखर कारखाने, शेतकऱ्यांना दामाचे मोल देण्यासाठी नेहमीच सहकारी संस्थांचा हातभार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत चालला आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

उसाला दर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नेहमीच लढत असतात. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा घामाचा योग्य भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चार अधिकचे पैसे मिळत आहेत, पण यावर्षी कमी पावसामुळे या दोन जिल्ह्यांत जवळपास ३० % उसाचे उत्पादन कमी झाले आहे. मागील वर्षी साखरेला चांगला दर मिळाला असला तरी यंदा उसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच शेट्टी यांनी आपल्या भूमिकांवर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर यंदाचा हंगाम अडचणीत सापडला आहे.

त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तीन बैठका निष्फळ ठरल्या. शिवाय नेमलेल्या जिल्हाधिकारी समितीनेदेखील कारखानदारांना मागील पैसे देणे शक्य नसल्याचा अहवाल दिल्याने आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. एकीकडे कारखानदार त्यांच्या सोयीसाठी ठाम, तर दुसरीकडे शेट्टी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी ठाम असल्याची चर्चा आहे.

ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या कारखान्याचे कौतुक केले. त्यावर बोट ठेवून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील कारखानदारांनी शेतकऱ्यांना मागील हंगामातील चार पैसे अधिक द्यावेत, असा हेतू शेट्टी यांचा आहे. शेतकऱ्यांनादेखील त्याचा फायदा आहे. मागील हंगाम १६० दिवस चालल्याने उत्पादन खर्च कमी आला. कारखान्याच्या मुख्य सूत्राप्रमाणे कारखाने सुरू असल्याने सभासदांचादेखील फायदा होत आहे.

मात्र, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील कारखानदार हेच आमदार, खासदार यांच्याच ताब्यात आहे. आपली राजकीय सोय साधून त्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांची कारखान्यात अनावश्यक भरती केली आहे. त्यांच्या पगारातच कारखान्याचा नफा जात असल्याने शेतकऱ्यांना कर्ज काढून एफआरफी द्यावी लागत आहे. त्यामुळे मागील हंगामातील पैसे देणे शक्य नसल्याची भूमिका कारखानदारांची आहे.

शेट्टीच्या आंदोलनाचा कर्नाटकातील कारखानदारांना फायदा -

पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांवर स्वाभिमानीचा मोठा प्रभाव आहे. मागणी मान्य झाल्याशिवाय उसाला कोयता लावू न देण्याची भूमिका शेट्टी यांनी घेतल्यानंतर कारखानदारांनी अजूनही कारखाने बंद ठेवलेत. ज्यांनी कारखाने सुरू करण्याचे प्रयत्न केले आहेत, त्यांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून वाहने जाळण्याचे प्रकार घडवले आहेत. त्यामुळे गेल्या २० दिवसांपासून कारखाने बंद आहेत. त्याचाच फायदा आता शेजारील कर्नाटकातील कारखानदारांनी घेतला आहे.

कर्नाटकातून येणारा ऊस पूर्णपणे थांबला असून, सीमाभाग महाराष्ट्रातील ऊस कर्नाटकातील कारखानदारांनी ज्यादा दर देऊन पळवण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांच्या गळीत हंगामावर होणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कमी ऊसगाळप होणार असल्याचे चित्र आहे.

पाण्याअभावी ऊस करपतोय, शेतकरी हवालदिल -

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, राधानगरी, कागल, गारगोटी, भुदरगड आणि शाहूवाडीतील काही भाग वगळता अनेक ठिकाणी ऊसवाढीला पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहेत. हातकणंगले व शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी ऊस वाळत असल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यात हे सर्व तालुक्यात चित्र आहे. शेट्टी यांच्या आंदोलनाने चार अधिकचे पैसे मिळतील अशी भावना शेतकऱ्यांची असल्याने अनेक ठिकाणी ऊसतोड थांबवली आहे, पण अनेक ठिकाणी पुढच्या पाच- दहा दिवसांनंतर पाण्याअभावी ऊस वाळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ऊसतोड लवकर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. उसासोबत आमची स्वप्नेही करपत असल्याची भावना शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीतील ऊस उत्पादक शेतकरी बोलून दाखवतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित बघणाऱ्या राजू शेट्टी यांनीही कुठे तरी दोन पावले मागे येऊन तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी करताहेत. ऊसतोड करावी यासाठी आज शेट्टी यांच्या विरोधात आंदोलन सुरू होणार आहे.

...अन्यथा सहकार अडचणीत येईल -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठाम भूमिका घेतल्याने यंदाचा ऊस गळीत हंगाम २० दिवस लांबणीवर गेला आहे. यंदा उसाचे उत्पादन कमी असल्याने कारखाने ९० दिवस चालतील. कारखाने १८० दिवस नाही चालले, तर वर्षभराचा देखभालीचा खर्च, कामगारांचा खर्चाचा बोजा कारखानदारांवर पडत असतो. मात्र, यंदा हंगाम ९० दिवसांचा असल्याने कारखानदारांवर आर्थिक भार पडणार आहे. त्यातून कारखानदारांना त्यासाठी कर्ज उचलावे लागणार आहे. त्यात शेट्टीच्या भूमिकेमुळे कारखाने बंद आहेत. उसाला तुरे फुटल्यानंतर त्याची गुणवत्ता कमी होणार आहे. जर वेळीच मार्ग न निघाल्यास सहकाराचा कणा मोडू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलनामागे शेट्टीचे लोकसभेचे गणित आणि कारखानदारांची एकजूट -

राजू शेट्टी यांच्या या भूमिकेमागे लोकसभेचे गणित आहे, असे सांगितले जाते. आंदोलन कोणत्या क्षणी हातात घ्यायचे आणि कोणत्या क्षणी मागे घ्यायचे यात शेट्टी यांचा हातखंडा आहे. आगामी लोकसभा डोळ्यांसमोर शेट्टी यांनी ही मागणी घेऊन, ५२२ किलोमीटरची पदयात्रा काढून, दोन मतदारसंघ पिंजून काढले. मागणीसोबत कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पेरणी केली. जर आंदोलनामुळे शेतकऱ्यांना ज्यादा पैसे मिळाले, तर त्याचा लोकसभेला शेट्टी यांना फायदा होणार आहे. पण फूल ना फुलाची पाकळी मिळावी, यासाठी शेट्टीदेखील दोन पावले मागे येण्याच्या तयारीत आहेत.

मागील दोन लोकसभेचा विचार केल्यास प्रत्येक वेळी शेट्टी यांनी दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. २०१४ च्या लोकसभेत भाजपच्या पाठिंब्यावर ते निवडून आले, तर २०१९ च्या निवडणुकीत त्यांना आघाडीचा पाठिंबा घेऊनही पराभवाला सामोरे जावे लागले. दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने कारखानदारदेखील त्यांच्या पराभवाची स्वप्ने पाहत आहेत.

युती-आघाडीच्या कारखानदारांनी आता एकत्र येऊन शेट्टी यांना कोंडीत पकडले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावरच निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे यंदा शेट्टी यांनी त्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने ठेवली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT