Latur News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी मराठवाडयाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी औसा येथील सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे लोहारा येथील सभेला जाण्यासाठी निघाले असता त्यांना हवाई उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली. पीएम नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे परवानगी नाकारल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटांकडून करण्यात आला.
शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आले होते. यावेळी प्रचार सभा झाल्यानंतर ते हेलीकॉप्टरने उमरगा तालुक्यातील लोहारा येथील सभेसाठी निघाले होते. यावेळी पीएम नरेंद्र मोदींच्या हवाई उड्डाणामुळे इतरांना हवाई उड्डाण करण्यास निर्बंध घालण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे कारने औसावरून लोहाऱ्याकडे रवाना झाले.
मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे यांना हवाई उड्डाणं करण्यास परवानगी मिळाली नाही. औसा येथील सभा संपल्यावर उद्धव ठाकरे लोहारा येथील सभेसाठी हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र, पंतप्रधान मोदी सोलापूरला येणार असल्यामुळे हवाई उड्डाण करण्यास परवानगी नाकारली.
त्यानंतर उद्धव ठाकरे लोहारा येथील सभास्थळी कारने दाखल झाले. येथील महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होत आहे. उद्धव ठाकरे यांची शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या मतदारसंघात सभा होत आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचा प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. राज्यात ते तब्बल 36 सभा घेत आहेत. यासाठी सभास्थळी वेळेत पोचण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हवाई मार्गाच्या वापरावर भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची हेलिकॉप्टरने हवाई उड्डाणे सुरू आहे.
सलग दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे. लागोपाठ दोन दिवस बॅगांची तपासणी झाल्याने उद्धव ठाकरेंनी काहीसा संताप व्यक्त केला. सोमवारी वणी येथे बॅगांची तपासणी करण्यात आल्यानंतर मंगळवारी लातूर जिल्ह्यातील औसा येथे त्यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी करण्यात आली. या सर्व प्रकाराची उद्धव ठाकरे यांनी रेकॉर्डिंग केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.