Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीला सहा महिन्याचा कालावधी झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत एकूण 4 नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक, एका राष्ट्रवादी काँग्रेस सदस्याचा तर दोन MIM चे नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. त्यातच शुक्रवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. बुशरा या नवाब मलिक यांची पुतणी असून कप्तान मलिक यांच्या कन्या आहेत.
जात पडताळणी समितीकडून बुशरा मलिक यांची सदस्यता नेमक्या कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आली, याची माहिती सविस्तर अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या कागदपत्र पडताळणीसंदर्भातील एकूण 89 प्रकरणे प्रलंबित असून, त्यापैकी 19 प्रकरणे जात प्रमाणपत्राशी संबंधित आहेत. त्यामुळे नेमके कारण समजू शकले नाही.
मुंबई पालिकेतील गोवंडी येथील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या AIMIMच्या नगरसेविका रोशन शेख यांची सदस्यता रद्द केली आहे. जात पडताळणी समितीने त्यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर ही कारवाई केली. महापालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने 27 एप्रिल 2026 रोजी रोशन शेख यांचे ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरवले. हे प्रमाणपत्र नोव्हेंबर 2025 मध्ये जारी करण्यात आले होते.
रोशन शेख यांनी 2026 च्या बीएमसी निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागेवरून विजय मिळवला होता. मात्र, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 16(1C)(a) अंतर्गत त्यांची सदस्यता आपोआप रद्द करण्यात आली. अधिसूचनेनुसार, 27 एप्रिल 2026 पासूनच त्यांची सदस्यता संपुष्टात आले आहे.
याआधी AIMIM चे नगरसेवक शमीर रमजान पटेल यांना ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सदस्यत्व गमवावे लागले होते. जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध घोषित केल्यानंतर बीएमसीच्या सर्वसाधारण सभेत महापौर रितू तावडे यांनी ते आता नगरसेवक राहिले नसल्याची घोषणा केली होती. शमीर पटेल हे गोवंडीतील प्रभाग क्रमांक 137 मधून ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आले होते.
यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक दीपक सावंत यांची सदस्यता ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे रद्द करण्यात आली होती. दीपक सावंत हे भांडुपच्या एस विभागातील प्रभाग क्रमांक 111 मधून ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आले होते. मात्र, काही महिन्यांमध्येच त्यांना पद गमवावे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.