महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला आहे. माहीम मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा गुलाल उधळला आहे. शिवसेनेच्या फूटीनंतर येथील विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे माहिमच्या लढतीतही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी महत्त्वाची होती. या पराभवानंतर अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे…आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो.
गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो.
मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे.
माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती… कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची - जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं.
आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी २४ तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे.
ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही. मी वचन देतो - तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू!
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.