Amravati Teacher MLC Election | Mahayuti and MVA Sarkarnama
महाराष्ट्र

Amravati Teacher MLC Election : महायुती अन् महाविकास आघाडीचाही उमेदवार अडचणीत? बंडखोरांना वाढवली धडधड; अमरावती शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट!

Amravati Teachers Constituency Election news : महायुती अन् महाविकास आघाडीत बंडखोरीचा स्फोट झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणामुळे कोणाचे गणित बिघडणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Sachin Waghmare

Amravati News : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होत आहे. पाचही मतदारसंघात चुरशीच्या लढत होत आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वीच अमरावती शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट पाहवयास मिळत आहे. महायुती अन् महाविकास आघाडीत बंडखोरीचा स्फोट झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणामुळे कोणाचे गणित बिघडणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. एकेकाळी हा मतदारसंघावर शिक्षक संघटनांचे वर्चस्व होते. त्यामुळे हा मतदारसंघ शिक्षक संघटनेचा बालेकिल्ला राहिला होता अलीकडच्या काळात या मतदारसंघावर राजकीय प्रभाव दिसू लागला आहे. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीपुढे मित्रपक्षांमधील बंडखोरीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे या निवडणुकीत बंडखोरी मोडून काढण्याचे आव्हान असणार आहे.

२०२० च्या निवडणुकीत आमदार किरण सरनाईक यांनी अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता. यावेळी त्यांना या पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. पण, भाजपमधील बंडखोर उमेदवारांनी त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे, भाजपचे बंडखोर चंद्रशेखर भोयर, सुमित पवार यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. ही बंडखोरी मोडून काढण्याचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.

वाशिम जिल्ह्यातील किरण सरनाईक यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. २०२० च्या निवडणुकीत मतदारांना पैठणी आणि रोख रक्कम वाटप केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. त्यानंतर ‘पैठणी पॅटर्न’ हा शब्द राजकीय चर्चेत आला होता. किरण सरनाईक यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार व माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. सरनाईक यांना १५ हजार ६०६ तर देशपांडे यांना ९ हजार १९१ मते पमिळाली होती. यावेळी माजी आमदार प्रा. देशपांडे देखील रिंगणात उतरले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती, पण त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. सरनाईक यांना भाजपमधील बंडखोरांसह पक्षांतर्गत बंड शांत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

महायुतीमधील सस्पेन्स वाढला

महायुतीचे उमेदवार म्हणून किरण सरनाईक प्रचार करीत असले, तरी भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते त्यांच्या सोबत आलेले नाहीत. त्यात महायुतीचा घटक असलेल्या आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षानेही रिंगणात उडी घेतल्याने वेगळाच संघर्ष पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार प्रा. दिलीप कडू यांच्या प्रचार सभेला उपस्थित राहून ‘सस्पेन्स’ वाढवला आहे.

महाविकास आघाडीतही बंडखोरी झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने बुलढाणा जिल्ह्यातील दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी बहाल केली होती. त्यांनी प्रचारही सुरू केला होता. दुसरीकडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या अदिती पोहरे यांचा काही दिवसांपुर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला, लगेच त्यांना उमेदवारीही जाहीर केली. पण, त्यामुळे महाविकास आघाडीतील विसंवाद समोर आला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या जाळ्याचा फायदा अदिती पोहरे यांना होईल, असा काँग्रेसच्या नेत्यांचा कयास आहे, पण २०१४ च्या निवडणुकीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अरूण शेळके यांना पराभव पत्करावा लागला होता. या दोन पक्षांमध्ये मैत्रिपूर्ण लढत ही अटळ मानली जात आहे.

मतदारसंघात 31 उमेदवार रिंगणात

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रा. दिलीप कडू यांच्यासह विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. प्रशांत विघे, ‘शिक्षक भारती’चे प्रा. सुरेश देवकर, ‘मेस्टा’चे किरण चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे गाजी मोहम्मद जाहेरोश यांच्यासह ३१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी किती जण माघार घेतात हे शुक्रवारी समजेल. राजकीय कारकीर्द घडवून आणण्यासाठी या मतदार संघाचा वापर होणार का, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT