Mumbai Political News : अँटॉप हिल येथील बंगालीपुरा परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या पक्ष कार्यालयांवर म्हाडाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अतिक्रमणावर कारवाई करण्यास विरोध नाही, मात्र कारवाईपूर्वी पुरेसा वेळ देणे आणि सर्वांना समान वागणूक देणे आवश्यक होते, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.
भाजपचे सायन-कोळीवाडा विधानसभा महामंत्री संतोष भगत यांनी कारवाईच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. अतिक्रमण असेल तर कारवाई झालीच पाहिजे, मात्र काल नोटीस देऊन आजच कारवाई करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालयातील मौल्यवान वस्तू आणि साहित्य बाहेर काढण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे होते.
मात्र, भाजपच्या कार्यालयावर सर्वप्रथम कारवाई करताना आपल्याला आणि कार्यकर्त्यांना बाजूला खेचून बाहेर काढण्यात आले. कार्यालयातील साहित्य काढण्यासाठीही वेळ दिला नाही, असा आरोप त्यांनी केला. इतरांना दोन ते तीन तासांचा वेळ देण्यात आला, मात्र भाजपच्या कार्यालयाबाबत वेगळी भूमिका घेतल्याने भेदभाव झाल्याचा दावाही त्यांनी केला. ज्या लोकांची दुकाने आणि कार्यालये उदरनिर्वाहाचे साधन होती, त्यांना पर्यायी जागा किंवा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
दुसरीकडे, शिवसेना पदाधिकारी सिद्धार्थ भास्कर ढगे यांनीही म्हाडाच्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. सुमारे महिनाभरापूर्वी कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार अनेकांनी कागदपत्रे जमा केली. मात्र, त्यानंतरही संबंधितांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले नाही. कोणतीही सुनावणी न घेता अचानक तोडक कारवाईची नोटीस लावून दुसऱ्याच दिवशी कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला आर्थिक मोबदला नको, तर घराच्या बदल्यात घर, दुकानाच्या बदल्यात दुकान आणि कार्यालयाच्या बदल्यात कार्यालय किंवा पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवसेनेच्या विधानसभा समन्वयक भारती भास्कर ढगे यांनीही या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात वास्तव्य असून, त्यांचे कार्यालय आणि दोन दुकाने येथे होती. म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडे दोन दिवसांची मुदत मागूनही ती देण्यात आली नाही. थेट दुकान आणि कार्यालयावर हातोडा चालवण्यात आला, असे त्यांनी सांगितले. या कार्यालयातून बालवाडी, रुग्णालय आणि इतर सामाजिक कामे केली जात होती. मात्र, आता आपल्याच कार्यालयावर कारवाई झाल्याने रस्त्यावर येण्याची वेळ आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या कारवाईमुळे परिसरातील स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्येही नाराजी आहे. आजूबाजूच्या दुकानदारांसह दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनीही कारवाईबाबत संताप व्यक्त केला. अचानक कारवाई झाल्याने व्यवसायावर परिणाम झाला असून, आपले साहित्य बाहेर काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवताना स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचाही विचार करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एकीकडे अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना, दुसरीकडे बाधित रहिवासी, दुकानदार आणि पक्ष कार्यालयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने कारवाई करताना सर्वांना समान संधी दिली का आणि बाधितांना पर्यायी जागा किंवा दिलासा मिळणार का, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.