Chandrashekhar Bavankule Sarkarnama
महाराष्ट्र

Nagpur Teacher Constituency : अपयश आल्यानंतर बावनकुळे म्हणतायत; आम्ही तर तेथे लढलोच नाही...

Chandrashekhar Bavankule : नागपूरातून भाजप लढलं असतं तर चित्रं वेगळं असतं

सरकारनामा ब्युरोे

Nagpur Teacher Constituency : नागपूर शिक्षक मतदार संघातून नागोराव गाणार हे अपक्ष आणि महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गाणार यांना भाजपने पाठिंबा दिला होता. ते यापूर्वीही दोन वेळा या मतदार संघातून निवडून आले होते. त्यावेळी त्यांना भाजपने समर्थन दिले होते. आता गाणार यांचा पराभव झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तेथे आम्ही लढलोच नाही, असे म्हणत पराभवाची जबाबदारी झटकली आहे.

नागपूर शिक्षक मतदार संघातून मागील वेळी भाजप समर्थीत नागोराव गाणार (Nagorao Ganar) आणि राजेंद्र झाडे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी गाणार यांनी निवडून येत सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला होता. त्यावेळी गाणार यांना एकूण १२ हजार ३९ मते मिळाली होती, तर राजेंद्र झाडे सात हजार १९९ मते मिळली होती. आता गाणार यांचा अडबाले यांनी पराभव केला आहे.

यावेळी नागपूर शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले (Sudhakar Adabale) यांनी भाजप समर्थित तसेच बारा वर्षांपासून या जागेचे प्रतिनिधीत्व करणारे गाणार यांचा पराभव केला आहे. पहिल्या फेरीअखेर २८ हजार मतांपैकी अडबाले यांना १४ हजार ६९ मते मिळाली होती. तर भाजप समर्थित गाणार यांना सहा हजार ३६६ मते, राजेंद्र झाडे यांना दोन हजार ७४२ आणि राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सतीश इटकेलवार यांना ६० मते मिळाली. तर एक हजार ९९ मते अवैध ठरली आहेत.

या निकालाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपली जबाबदारी झकल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बावनकुळे म्हणाले, "नागपूर शिक्षक मतदार संघातून भाजपचा उमेदवार लढलाच नाही. येथे भाजपने कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळं येथून भाजपचा पराभव झाला, असं म्हणण्यात काही तथ्य नाही."

यासह येथून भाजपचा अधिकृत उमेदवार लढला असता तर चित्रं वेगळं दिसलं असतं, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले. ते म्हणाले, "नागपूरात पराभव झाला ती जागा भाजप लढली नाही. याला काही भाजपंच अपयश म्हणता येणार नाही. कोकणमध्ये भाजपचा विजय झाला आहे. सत्यजीत तांबे यानांही भाजपने पाठिंबा दिला असून ते आघाडीवर आहेत. मराठवाड्यात मोठी मते भाजपने घेतलीत. आमरावतीच्या फेऱ्या बाकी आहेत. तसेच नागपूरची जागा भाजपने लढविली असती तर चित्रं वेगळं असतं," असंही बावनकुळे यांनी वक्तव्य केलं.

यावेळी बावनकुळे यांनी जुन्या पेन्शनबाबत तत्कालीन आघाडी सरकारवर निशाना साधला आहे. बावनकुळे म्हणाले, "प्रचारावेळी ९० टक्के मतदार जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही होते. त्यांचा रोष सध्याच्या सरकारवर होता. मात्र ही पेन्शन कोणी बंद केली? १ नोव्हेंबर २००५ रोजी आघाडी सरकारच्या काळात अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुनी पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT