Dharashiv News : राज्यातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. त्यानंतर उमेदवारी जाहीर केली जात आहे. धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपचा उमेदवार ठरला आहे. काँग्रेसमधून आलेल्या माजी मंत्र्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून भाजपचे निष्ठेने कार्य करणाऱ्या निष्ठावंत नेत्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. येत्या काळात याठिकाणी काँग्रेसविरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातुन इच्छुक असलेल्या चार नेत्यांची नावे दिल्ली दरबारी पाठविण्यात आली होती. त्यामध्ये माजी मंत्री व लातूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष बसवराज पाटील, धाराशिव जिल्हा भाजप (BJP) अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील-निलंगेकर व बीड जिल्ह्यातून सीएम फडणवीस यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक व विश्वासू सहकारी ओमप्रकाश शेटे या चार जणांची नावे दिल्ली दरबारी पाठविण्यात आली होती. त्यापैकी रविवारी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून (Congress) आलेल्या माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी दिल्याने गेल्या अनेक दिवसापासून भाजपचे निष्ठेने कार्य करणाऱ्या निष्ठावंत नेत्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपकडून ही नाराजी कशाप्रकारे दूर केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.
येत्या काळात याठिकाणी काँग्रेसचे महेश देशमुख विरुद्ध भाजपचे बसवराज पाटील अशी लढत होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विशेषतः दोन्ही उमेदवार हे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील असल्याने यावेळेस धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा आमदार हा धाराशिव जिल्ह्यातील असणार हे निश्चित झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहता याठिकाणी महायुतीचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे याठिकाणी महायुतीमधून पुन्हा भाजपला उमेदवारीची संधी मिळणार आहे. धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघात एकूण ९०४ मते आहेत. त्यामध्ये भाजप 301, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 68, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 138 असे एकूण 537 सदस्य महायुतीचे आहेत तर काँग्रेस 155, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 32, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 54 असे एकूण 241 सदस्य महविकास आघाडीचे आहेत. त्याशिवाय अपक्ष 25, छोटे पक्ष व विविध आघाडीचे 78 मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे याठिकाणी महायुतीचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.